बेळगावचा धाडसी पत्रकार आणि तो १६ डिसेंबरचा स्मरणीय दिवस…sudhir mutalik

पत्रकारीता हे व्रत म्हणून किंवा किमान जबाबदारी म्हणून किती पत्रकार स्विकारतात हा अलीकडे नकारात्मक चर्चेकडे नेणारा विषय असू शकतो.  पत्रकारितेचे सामर्थ्य विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियातील बहुचर्चित पत्रकारीतेमुळे प्रश्नचिन्हांकित बनले आहे. पण तरीही एका पत्रकाराच्या लेखणीमध्ये किती प्रचंड सामर्थ्य असते याची आठवण करून देणारा दिवस आहे – १६ डिसेंबर. विशेषतःभरतखंडाचा ईतिहास आणि भूगोल देखील बदलविण्याचे महाकाय काम एखाद्या पत्रकाराची लेखणी करू शकते हे कदाचित आज अविश्वनीय वाटू शकेल. पण होय, पण हे वास्तव आहे. एका पत्रकाराच्या लेखणीने १३ जुन १९७१ रोजी एक प्रचंड मोठा हादरा दिला आणि १६ डिसेंबर रोजी भारतीय खंडातील एका देशाचे दोन तुकडे केले. 
अँथनी मस्करेन्हस बेळगांवचे. बेळगावच्या एका रोमन कॅथॉलिक कुटुंबात १० जुलै १९२८ रोजी अँथनीचा जन्म झाला. शिक्षण कराचीमध्ये. १९४८ साली वयाच्या विसाव्या वर्षी अँथनी मुंबईमध्ये रॉयटर्स या वृत्तसंस्थेमध्ये आपल्या पहिल्या नोकरीसाठी रुजू झाले. ४८ साली पाकिस्तान हा नुकतेच जन्माला देश होता. अँथनी यांना कराचीचा अनुभव होता. त्यामुळे वृत्तसंस्थेने त्यांना पाकिस्तानात मधला कारभार सांभाळण्यासाठी पाठवीले. अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि तळमळीचा पत्रकार असल्यामुळे अँथनी यांचा पाकिस्तानात तुलनेने लवकर जम बसला. आपल्याकडे जशी पीटीआय आहे तशी पाकिस्तानात प्रेस असोसिएशन ऑफ पाकिस्तान ही प्रमुख संवाद समिती आहे. या समितीच्या स्थापनेमध्ये अँथनी यांचा प्रमुख सहभाग होता. त्याकाळी पाकिस्तनात कराची टाइम्स हे अग्रणी वृत्तपत्र होते१९५८ साली अँथनी या कराची टाइम्सचे उपसंपादक झाले. १९६५ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध छेडले गेले. त्यावेळी अँथनी आणि त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकारने तीन महिने स्थानबद्ध करून ठेवले होते. पुढे १९७० मध्ये त्यांनी कराची टाइम्सची नोकरीही सोडली आणि आता ते संडे टाइम्स या १९६६ सालीच सुरु झालेल्या पण तगडया वृत्तपत्रामध्ये नोकरी करू लागले. संडे टाइम्सची सुरुवातीपासून शोध पत्रकारिता हीच ख्याती आहे
अँथनी आता पाकिस्तनातल्या नावाजलेल्या पत्रकारांमध्ये गणले जाऊ लागले होते. पाकिस्तानातली राजकीय स्थिती भीषणच होती. १९६९ च्या सुमारास याह्याखान पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते. त्यांनी संविधान रद्द केले होते आणि देशात मार्शल लॉ आणला होता. राज्य लष्कराचे होते. त्यात याह्याखाननी निवडणुका घेतल्या खऱ्या पण बहुमत मिळालेल्या पूर्व पाकिस्तानातल्या आवामी लीगकडे ते सत्ता सुपूर्द करायला तयार नव्हते. त्यामुळे मार्च १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानात गडबड सुरु झाली. पूर्व पाकिस्तनातल्या बंगाली वंशाच्या बहुसंख्य जनतेला आपल्यावर पाकिस्तानातले राजकारणी आणि लष्कर अन्याय करते आहे अशी भावना भडकू लागली होती. त्यातून पूर्व पाकिस्तानातील तिथले रहिवाशी, बिहारी जनता आणि हिंदू यांच्या हत्या होऊ लागल्या. बंगाली पाकिस्तानी नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या आवामी लीगला आता पाकिस्तान पासून फारकत हवी होती. त्यामुळे आवामी लीगने पाकिस्तानी व्यवस्था, लष्कर यांच्याबरोबर असहकार पुकारायचे ठरवीले. आवामी लीगला आता स्वतःचे सरकार स्थापन करायचे होते. पूर्व पाकिस्तानात हिंसा शिगेला पोहोचली होती. त्यामुळे याह्याखानांच्या लष्कराने पूर्व पाकिस्तानातले आंदोलन आणि कारवाया बळजबरीने चिरडायला सुरुवात केली. विद्यापीठे चिरडली. विद्यार्थी शिक्षक यांच्या खांडोळ्या केल्या. हजारो हिंदूंचे हत्याकांड केले आणि बंगाली लोकांचा अमानुष सफाया सुरु केला.याह्याखानना काही कालावधी नंतर असे वाटले की आपण पूर्व पाकिस्तानातले बंड आता यशस्वीपणे मोडून काढले आहे. त्यामुळे जगाला आता याची बातमी आपल्याला हव्या त्या पद्धतीने द्यायला हरकत नाही. आपल्या लष्कराचा झालेला महान विजय त्यांना जगाला कळू द्यायचा होता. पण पूर्वा पाकिस्तानातून विदेशी पत्रकारांना कधीच पिटाळून लावले गेले होते. स्थानिक पत्रकारांचा खातमा केला गेला होता. त्यामुळे याह्याखानानी पाकिस्तानातून आठ तगड्या आणि आपल्या विश्वासातल्या पत्रकारांची निवड केली. आणि त्यांना पूर्व पाकिस्तानातील आपले कतृत्व दाखविण्यासाठी ढाक्याला पाठवायचे ठरवीले. त्या आठ पत्रकारांमध्ये होते अँथनी मस्करेन्हस !
त्या आठही पत्रकारांना दहा दिवस पूर्व पाकिस्तानात फिरण्याची मुभा दिली. लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बोलू दिले. या सगळ्यांनी यथोचित माहिती गोळा केली. आठ पैकी सातांनी पाकिस्तानी सर्वेसर्वाना हवी तशीच माहिती प्रसिद्ध केली. आवामी लीगने किती भीषण थयथयाट केला होता आणि पाकिस्तानच्या सैन्याने कारवाई करून पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती कशी सुरळीत केली याची वर्णने छापून आली. अँथनीचा रिपोर्ट मात्र बाकी होता. अँथनीनी जे पाहीले , ऐकले त्यातून ते हादरून गेले होते. त्यांची पत्नी इव्हाना म्हणाली की अँथनीला मी इतके उखडून गेलेले कधीच बघितले नव्हते. इतके उदास, निराश आणि पराभूत झालेले कधीच बघितले नव्हते. अँथनीला सगळ्या जगाला सत्य सांगायचे होते. पण खरे बोलण्याची लिहिण्याची किंमत त्यांना माहिती होती. ते, त्यांची पत्नी आणि पाच मुले यांना तत्काळ यमसदनाला पाठवीले गेले असते हे त्यांना माहिती होते. पण आपल्या पत्नीला ते म्हणाले की जे बघितले आहे ते मी लिहिले नाही तर त्यानंतर मी एकही अक्षर लिहू शकणार नाही. माझ्यातला पत्रकार संपून जाईल. त्यामुळे अँथनीनी लिहिण्याचे धाडस सुरक्षितपणे करायचे ठरवीले. बहीण अत्यवस्थ आहे असे कारण सांगून ते – एकटेचलंडनला गेले. लंडनला पोहोचताच. संडे टाइम्सच्या कार्यालयात तत्कालीन मुख्य संपादक हॅरोल्ड इव्हान्स यांना भेटून सांगितले की मी ऐकले बघितले ते सत्य मला लिहायचे आहे. सुमारे तीस लाख लोकांचे लष्कराने केलेले क्रूर हत्याकांड, ज्यामध्ये मुख्यत्वे बंगाली मुसलमान आणि हिंदू होते. त्यांच्या घरादाराची, शाळा, महाविद्यालयांची केली गेलेली राख रांगोळी. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या स्वरातील तो दर्प – “हाच अंतिम मार्ग आहे.’ हे सगळं जगाला सांगायचे आहे. हॅरोल्ड  यांनी हादरलेल्या अवस्थेत पूर्व पाकिस्तानातल्या परिस्थितीचे वर्णन ऐकले आणि म्हणाले की आपण छापू पण हे सगळे तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या जीवावर बेतेल याची कल्पना तुला आहे हे मी गृहीत धरतो. हा तुझा रिपोर्ट छापण्याने संपूर्ण जगात हाहाकार माजेल. पाकिस्तानशी आजीवन शत्रुत्व स्विकारावे लागेल. अँथनी त्यांच्या निर्णयावर ठाम होतेछापायचा निर्णय झाल्यावर हॅरोल्डनी मग सांगितले की आधी कुटुंबाच्या सुरक्षिततेची व्यवस्था कर. त्याची तयारी अँथनी यांनी पाकिस्तानातून निघायच्या आधी केली होतीचपत्नी इव्हानाशी ठरल्याप्रमाणे, कुठे संशयाला वाट फुटू नये म्हणून लंडनहुन अँथनी यांनी तिला एक तार केलीऍनचे ऑपरेशन यशस्वी झाले
कराचीमध्ये भल्या पहाटे तीन वाजता इव्हानाच्या घराच्या खिडकीवर कुणीतरी टकटक करीत असल्यामुळे इव्हानाला जाग आली. तार देणारा इसम होता. तार वाचताच तार देणाऱ्या इसमा देखतच इव्हाना मुलांकडे बघून किंचाळली “अरे देवा, आपल्याला  तातडीने लंडनला जावे लागणार आहे.” काही अवधीने अँथनी कराचीत दाखल झाले. आपण लंडनमध्ये असताना कुटुंबियांना देखील बोलावून घेतले यातून काही संशय निर्माण व्हायला नको असे अँथनीना वाटत होते. अँथनी घरी येताच पत्नी आणि मुले हातात एक एक बॅग घेऊन जितके जमेल ते त्यात कोंबून आपले कराचीतले घर – जवळपास सगळेच तिथे सोडूनलंडनला निघून गेले. खरेतर कायमचे. अँथनीना आता देशाबाहेर जाणे सहज शक्य नव्हते. कारण बाहेर देशी जाण्यासाठी विमानात बसण्याची एका वर्षात एकदाच परवानगी त्या काळी पाकिस्तानात दिली जायची. पण पत्नी मुले लंडनला पोहोचल्यावर पाकिस्तानातून त्यांना बाहेर तर पडायचे होते. मंडळी पोहोचताच अँथनी पाकिस्तानची हद्द ओलांडून अफगाणिस्तानात पोहोचले आणि तिथून लंडनला.  आणि १३ जून १९७१ रोजी संडे टाइम्सने खरोखरच आख्ख्या जगाला हादरा दिला. “नरसंहारअशा मथळ्याखाली संडे टाइम्सने पाकिस्तानी लष्कराकडून पूर्व पाकिस्तानात होणाऱ्या भीषण कत्तलीची माहिती अँथनीच्या लेखामधून जगा पुढे मांडली. तीस लाख बंगाली मुस्लिम, हिंदू जनतेच्या हत्याकांडाची बातमी वाचून आख्खे जग खरंच हादरून गेलेपाकिस्तान सकट. संडे टाइम्सने अँथनी यांचा संपूर्ण तीन पानी वृत्तांत छापला. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना देखील तो वृत्तांत वाचून प्रचंड धक्का बसल्याचे त्यांनी मुख्य संपादक हॅरोल्ड यांच्याकडे बोलून दाखविले. तो रिपोर्ट वाचताच रशियासह युरोपीय देशांशी तातडीने संपर्क साधून आपण पूर्व पाकिस्तानमध्ये ताबडतोब लष्करी हस्तक्षेप करणे किती आवश्यक आहे हे श्रीमती गांधी यांनी वेळ दवडता पटवून दिले. आणि मग पूर्व पाकिस्तानच्या भूमीवर पाकिस्तानच्या लष्करावर डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्याने कडाडून हल्ला चढवला. भारतीय रणनीती आणि प्रत्यक्ष युद्ध या पुढे निष्प्रभ ठरलेल्या पाकिस्तनाला भारतापुढे अवघ्या तेरा दिवसात शरणागती पत्करावी लागलीतो दिवस होता १६ डिसेंबर १९७१ ! पुढे स्वतंत्र बांगलादेशची यातूनच निर्मिती झाली
साहजिकपणे अँथनी यांना पाकिस्तानने गद्दार मानले, आज ही मानतात. पाकिस्तानची काळी कृत्ये अँथनी यांनी प्रचंड धाडसाने जगापुढे आणल्यामुळे त्यांची जगभर नाचक्की तर झालीच, पण त्यामुळे देशाची दोन शकले झाल्याची पाकिस्तानची जखम आज ही भळभळते आहे
अँथनी आणि त्यांचे कुटुंब यांना पुढे पाकिस्तान थारा देणे शक्यच नव्हते. इंग्लंडने देखील त्यांना नागरिकत्व देण्याचे नाकारले. त्यामुळे अँथनी वास्तव्याला भारतात आले. शोध पत्रिकेमध्ये माहीर असणाऱ्या या दिग्गज पत्रकाराने १९७९ साली पाकिस्तान विषयी आणखी एक धक्का जगाला १९७९ मध्ये दिला हे प्रथमच जगाला सांगून की पाकिस्तानने अणुबॉम्ब बनविला आहे
©SudhirMutalik

2 Comments

Filed under Uncategorized

2 responses to “बेळगावचा धाडसी पत्रकार आणि तो १६ डिसेंबरचा स्मरणीय दिवस…sudhir mutalik

  1. Excellent writeup Sudhir sir
    I never Knew about this History 🙏

  2. Pramod Kulkarni's avatar Pramod Kulkarni

    Excellent..

Leave a reply to advsuyogshah Cancel reply