बेळगावचा धाडसी पत्रकार आणि तो १६ डिसेंबरचा स्मरणीय दिवस…sudhir mutalik

पत्रकारीता हे व्रत म्हणून किंवा किमान जबाबदारी म्हणून किती पत्रकार स्विकारतात हा अलीकडे नकारात्मक चर्चेकडे नेणारा विषय असू शकतो.  पत्रकारितेचे सामर्थ्य विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियातील बहुचर्चित पत्रकारीतेमुळे प्रश्नचिन्हांकित बनले आहे. पण तरीही एका पत्रकाराच्या लेखणीमध्ये किती प्रचंड सामर्थ्य असते याची आठवण करून देणारा दिवस आहे – १६ डिसेंबर. विशेषतःभरतखंडाचा ईतिहास आणि भूगोल देखील बदलविण्याचे महाकाय काम एखाद्या पत्रकाराची लेखणी करू शकते हे कदाचित आज अविश्वनीय वाटू शकेल. पण होय, पण हे वास्तव आहे. एका पत्रकाराच्या लेखणीने १३ जुन १९७१ रोजी एक प्रचंड मोठा हादरा दिला आणि १६ डिसेंबर रोजी भारतीय खंडातील एका देशाचे दोन तुकडे केले. 
अँथनी मस्करेन्हस बेळगांवचे. बेळगावच्या एका रोमन कॅथॉलिक कुटुंबात १० जुलै १९२८ रोजी अँथनीचा जन्म झाला. शिक्षण कराचीमध्ये. १९४८ साली वयाच्या विसाव्या वर्षी अँथनी मुंबईमध्ये रॉयटर्स या वृत्तसंस्थेमध्ये आपल्या पहिल्या नोकरीसाठी रुजू झाले. ४८ साली पाकिस्तान हा नुकतेच जन्माला देश होता. अँथनी यांना कराचीचा अनुभव होता. त्यामुळे वृत्तसंस्थेने त्यांना पाकिस्तानात मधला कारभार सांभाळण्यासाठी पाठवीले. अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि तळमळीचा पत्रकार असल्यामुळे अँथनी यांचा पाकिस्तानात तुलनेने लवकर जम बसला. आपल्याकडे जशी पीटीआय आहे तशी पाकिस्तानात प्रेस असोसिएशन ऑफ पाकिस्तान ही प्रमुख संवाद समिती आहे. या समितीच्या स्थापनेमध्ये अँथनी यांचा प्रमुख सहभाग होता. त्याकाळी पाकिस्तनात कराची टाइम्स हे अग्रणी वृत्तपत्र होते१९५८ साली अँथनी या कराची टाइम्सचे उपसंपादक झाले. १९६५ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध छेडले गेले. त्यावेळी अँथनी आणि त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकारने तीन महिने स्थानबद्ध करून ठेवले होते. पुढे १९७० मध्ये त्यांनी कराची टाइम्सची नोकरीही सोडली आणि आता ते संडे टाइम्स या १९६६ सालीच सुरु झालेल्या पण तगडया वृत्तपत्रामध्ये नोकरी करू लागले. संडे टाइम्सची सुरुवातीपासून शोध पत्रकारिता हीच ख्याती आहे
अँथनी आता पाकिस्तनातल्या नावाजलेल्या पत्रकारांमध्ये गणले जाऊ लागले होते. पाकिस्तानातली राजकीय स्थिती भीषणच होती. १९६९ च्या सुमारास याह्याखान पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते. त्यांनी संविधान रद्द केले होते आणि देशात मार्शल लॉ आणला होता. राज्य लष्कराचे होते. त्यात याह्याखाननी निवडणुका घेतल्या खऱ्या पण बहुमत मिळालेल्या पूर्व पाकिस्तानातल्या आवामी लीगकडे ते सत्ता सुपूर्द करायला तयार नव्हते. त्यामुळे मार्च १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानात गडबड सुरु झाली. पूर्व पाकिस्तनातल्या बंगाली वंशाच्या बहुसंख्य जनतेला आपल्यावर पाकिस्तानातले राजकारणी आणि लष्कर अन्याय करते आहे अशी भावना भडकू लागली होती. त्यातून पूर्व पाकिस्तानातील तिथले रहिवाशी, बिहारी जनता आणि हिंदू यांच्या हत्या होऊ लागल्या. बंगाली पाकिस्तानी नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या आवामी लीगला आता पाकिस्तान पासून फारकत हवी होती. त्यामुळे आवामी लीगने पाकिस्तानी व्यवस्था, लष्कर यांच्याबरोबर असहकार पुकारायचे ठरवीले. आवामी लीगला आता स्वतःचे सरकार स्थापन करायचे होते. पूर्व पाकिस्तानात हिंसा शिगेला पोहोचली होती. त्यामुळे याह्याखानांच्या लष्कराने पूर्व पाकिस्तानातले आंदोलन आणि कारवाया बळजबरीने चिरडायला सुरुवात केली. विद्यापीठे चिरडली. विद्यार्थी शिक्षक यांच्या खांडोळ्या केल्या. हजारो हिंदूंचे हत्याकांड केले आणि बंगाली लोकांचा अमानुष सफाया सुरु केला.याह्याखानना काही कालावधी नंतर असे वाटले की आपण पूर्व पाकिस्तानातले बंड आता यशस्वीपणे मोडून काढले आहे. त्यामुळे जगाला आता याची बातमी आपल्याला हव्या त्या पद्धतीने द्यायला हरकत नाही. आपल्या लष्कराचा झालेला महान विजय त्यांना जगाला कळू द्यायचा होता. पण पूर्वा पाकिस्तानातून विदेशी पत्रकारांना कधीच पिटाळून लावले गेले होते. स्थानिक पत्रकारांचा खातमा केला गेला होता. त्यामुळे याह्याखानानी पाकिस्तानातून आठ तगड्या आणि आपल्या विश्वासातल्या पत्रकारांची निवड केली. आणि त्यांना पूर्व पाकिस्तानातील आपले कतृत्व दाखविण्यासाठी ढाक्याला पाठवायचे ठरवीले. त्या आठ पत्रकारांमध्ये होते अँथनी मस्करेन्हस !
त्या आठही पत्रकारांना दहा दिवस पूर्व पाकिस्तानात फिरण्याची मुभा दिली. लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बोलू दिले. या सगळ्यांनी यथोचित माहिती गोळा केली. आठ पैकी सातांनी पाकिस्तानी सर्वेसर्वाना हवी तशीच माहिती प्रसिद्ध केली. आवामी लीगने किती भीषण थयथयाट केला होता आणि पाकिस्तानच्या सैन्याने कारवाई करून पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती कशी सुरळीत केली याची वर्णने छापून आली. अँथनीचा रिपोर्ट मात्र बाकी होता. अँथनीनी जे पाहीले , ऐकले त्यातून ते हादरून गेले होते. त्यांची पत्नी इव्हाना म्हणाली की अँथनीला मी इतके उखडून गेलेले कधीच बघितले नव्हते. इतके उदास, निराश आणि पराभूत झालेले कधीच बघितले नव्हते. अँथनीला सगळ्या जगाला सत्य सांगायचे होते. पण खरे बोलण्याची लिहिण्याची किंमत त्यांना माहिती होती. ते, त्यांची पत्नी आणि पाच मुले यांना तत्काळ यमसदनाला पाठवीले गेले असते हे त्यांना माहिती होते. पण आपल्या पत्नीला ते म्हणाले की जे बघितले आहे ते मी लिहिले नाही तर त्यानंतर मी एकही अक्षर लिहू शकणार नाही. माझ्यातला पत्रकार संपून जाईल. त्यामुळे अँथनीनी लिहिण्याचे धाडस सुरक्षितपणे करायचे ठरवीले. बहीण अत्यवस्थ आहे असे कारण सांगून ते – एकटेचलंडनला गेले. लंडनला पोहोचताच. संडे टाइम्सच्या कार्यालयात तत्कालीन मुख्य संपादक हॅरोल्ड इव्हान्स यांना भेटून सांगितले की मी ऐकले बघितले ते सत्य मला लिहायचे आहे. सुमारे तीस लाख लोकांचे लष्कराने केलेले क्रूर हत्याकांड, ज्यामध्ये मुख्यत्वे बंगाली मुसलमान आणि हिंदू होते. त्यांच्या घरादाराची, शाळा, महाविद्यालयांची केली गेलेली राख रांगोळी. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या स्वरातील तो दर्प – “हाच अंतिम मार्ग आहे.’ हे सगळं जगाला सांगायचे आहे. हॅरोल्ड  यांनी हादरलेल्या अवस्थेत पूर्व पाकिस्तानातल्या परिस्थितीचे वर्णन ऐकले आणि म्हणाले की आपण छापू पण हे सगळे तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या जीवावर बेतेल याची कल्पना तुला आहे हे मी गृहीत धरतो. हा तुझा रिपोर्ट छापण्याने संपूर्ण जगात हाहाकार माजेल. पाकिस्तानशी आजीवन शत्रुत्व स्विकारावे लागेल. अँथनी त्यांच्या निर्णयावर ठाम होतेछापायचा निर्णय झाल्यावर हॅरोल्डनी मग सांगितले की आधी कुटुंबाच्या सुरक्षिततेची व्यवस्था कर. त्याची तयारी अँथनी यांनी पाकिस्तानातून निघायच्या आधी केली होतीचपत्नी इव्हानाशी ठरल्याप्रमाणे, कुठे संशयाला वाट फुटू नये म्हणून लंडनहुन अँथनी यांनी तिला एक तार केलीऍनचे ऑपरेशन यशस्वी झाले
कराचीमध्ये भल्या पहाटे तीन वाजता इव्हानाच्या घराच्या खिडकीवर कुणीतरी टकटक करीत असल्यामुळे इव्हानाला जाग आली. तार देणारा इसम होता. तार वाचताच तार देणाऱ्या इसमा देखतच इव्हाना मुलांकडे बघून किंचाळली “अरे देवा, आपल्याला  तातडीने लंडनला जावे लागणार आहे.” काही अवधीने अँथनी कराचीत दाखल झाले. आपण लंडनमध्ये असताना कुटुंबियांना देखील बोलावून घेतले यातून काही संशय निर्माण व्हायला नको असे अँथनीना वाटत होते. अँथनी घरी येताच पत्नी आणि मुले हातात एक एक बॅग घेऊन जितके जमेल ते त्यात कोंबून आपले कराचीतले घर – जवळपास सगळेच तिथे सोडूनलंडनला निघून गेले. खरेतर कायमचे. अँथनीना आता देशाबाहेर जाणे सहज शक्य नव्हते. कारण बाहेर देशी जाण्यासाठी विमानात बसण्याची एका वर्षात एकदाच परवानगी त्या काळी पाकिस्तानात दिली जायची. पण पत्नी मुले लंडनला पोहोचल्यावर पाकिस्तानातून त्यांना बाहेर तर पडायचे होते. मंडळी पोहोचताच अँथनी पाकिस्तानची हद्द ओलांडून अफगाणिस्तानात पोहोचले आणि तिथून लंडनला.  आणि १३ जून १९७१ रोजी संडे टाइम्सने खरोखरच आख्ख्या जगाला हादरा दिला. “नरसंहारअशा मथळ्याखाली संडे टाइम्सने पाकिस्तानी लष्कराकडून पूर्व पाकिस्तानात होणाऱ्या भीषण कत्तलीची माहिती अँथनीच्या लेखामधून जगा पुढे मांडली. तीस लाख बंगाली मुस्लिम, हिंदू जनतेच्या हत्याकांडाची बातमी वाचून आख्खे जग खरंच हादरून गेलेपाकिस्तान सकट. संडे टाइम्सने अँथनी यांचा संपूर्ण तीन पानी वृत्तांत छापला. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना देखील तो वृत्तांत वाचून प्रचंड धक्का बसल्याचे त्यांनी मुख्य संपादक हॅरोल्ड यांच्याकडे बोलून दाखविले. तो रिपोर्ट वाचताच रशियासह युरोपीय देशांशी तातडीने संपर्क साधून आपण पूर्व पाकिस्तानमध्ये ताबडतोब लष्करी हस्तक्षेप करणे किती आवश्यक आहे हे श्रीमती गांधी यांनी वेळ दवडता पटवून दिले. आणि मग पूर्व पाकिस्तानच्या भूमीवर पाकिस्तानच्या लष्करावर डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्याने कडाडून हल्ला चढवला. भारतीय रणनीती आणि प्रत्यक्ष युद्ध या पुढे निष्प्रभ ठरलेल्या पाकिस्तनाला भारतापुढे अवघ्या तेरा दिवसात शरणागती पत्करावी लागलीतो दिवस होता १६ डिसेंबर १९७१ ! पुढे स्वतंत्र बांगलादेशची यातूनच निर्मिती झाली
साहजिकपणे अँथनी यांना पाकिस्तानने गद्दार मानले, आज ही मानतात. पाकिस्तानची काळी कृत्ये अँथनी यांनी प्रचंड धाडसाने जगापुढे आणल्यामुळे त्यांची जगभर नाचक्की तर झालीच, पण त्यामुळे देशाची दोन शकले झाल्याची पाकिस्तानची जखम आज ही भळभळते आहे
अँथनी आणि त्यांचे कुटुंब यांना पुढे पाकिस्तान थारा देणे शक्यच नव्हते. इंग्लंडने देखील त्यांना नागरिकत्व देण्याचे नाकारले. त्यामुळे अँथनी वास्तव्याला भारतात आले. शोध पत्रिकेमध्ये माहीर असणाऱ्या या दिग्गज पत्रकाराने १९७९ साली पाकिस्तान विषयी आणखी एक धक्का जगाला १९७९ मध्ये दिला हे प्रथमच जगाला सांगून की पाकिस्तानने अणुबॉम्ब बनविला आहे
©SudhirMutalik

2 Comments

Filed under Uncategorized

नाशिक – आयटी क्षेत्राची धुंदी !

भारतात आयटी क्षेत्रातला सेवा उद्योग बराच आधी म्हणजे १९६७ साली मुंबईत टाटांनी सुरु केला असला तरी तो चर्चेत आला आर्थिक उदारीकरणानंतरच. १९९१ ते ९४ या तीन वर्षाच्या कालावधीत तत्कालीन सरकारने काळाचा ओघ ओळखून अतिशय वेगाने पावले उचलली हे कौतुकास्पदच. त्यातही सगळ्यात महत्वाची कार्यवाही सरकारने केली ती सॉफ्टवेअर पार्क्सची निर्मिती. मुंबई, बेंगलोर, पुणे, कलकत्ता, हैदराबाद, चेन्नई अशा देशातल्या अनेक महत्वाच्या शहरात या पार्क्समधून अब्जवधी रुपयांच्या सॉफ्टवेअर्सची आणि आयटी सेवांची निर्यात सुरु झाली, लाखो लोकांना या नव्याने निर्माण झालेल्या क्षेत्रात भल्यामोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या आणि संपूर्ण देशाचे अर्थकारणच बदलून गेले. पुढे बदललेल्या अर्थकारणातून भारतीय समाजजीवन बऱ्याच अंशांनी बदलून गेले. जगण्याचे बहुतेक संदर्भ बदलले आणि दृष्टिकोनही बदलला. त्यामुळे प्रत्येक शहराला आता आयटी पार्क हवा होता. आयटी उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येक गावाला, शहराला बदलायचे होते, ‘समृद्ध’ व्हायचे होते. जनतेच्या या हव्यासाचा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारांनी उपयोग करून घेतला.

नाशिकलापण आयटी शहर होण्याचे डोहाळे सुरु झाले. त्यात गैर काहीच नाही. नाशकात मोठाले आयटी उद्योग यावेत आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा असे स्वप्न बघण्यात किंवा तशी तीव्र इच्छा असण्यात काहीच चुकीचे नव्हते. त्यामुळे २००२च्या सुमारास महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नाशिकातल्या एका कार्यक्रमात जाहीर घोषणा केली की पुण्यानंतर आता महाराष्ट्रात नाशिक माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे केंद्र होणार. नाशिककर हुरळला. मोहरला. ज्या समृद्धीचे स्वप्न आपण पहात होतो ते साकार करण्याचे आश्वासन दस्तूरखुद्द राज्याच्या मुख्यमंत्रांकडूनच आयते मिळत होते. वातावरण चैतन्यमय झाले. तातडीने काही दिवसात तिडके कॉलनीमध्ये एका मुंबईच्या बांधकाम व्यावसाय समूहाचे होर्डिंग लागले, “नाशिक, नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन.” ….

हा हा म्हणता सुरुवातीला नाशिक नाशकातच गाजू लागले. साडेसहाशे रुपये प्रतिचौरस फूट किमतीचा फ्लॅट खरेदी करण्याची तजवीज गेली दोन तीन वर्षे करणारा नाशिककर गरजवंत प्रत्यक्ष खरेदी करायला इथल्या बांधकाम व्यावसायिकाकडे गेला तर त्याला काहीबाहीच ऐकून परतावे लागले. त्याच फ्लॅटचा दर अचानक काहीच कारण नसताना तोच व्यावसायिक अकराशे रुपये प्रति चौरस फूट सांगू लागला. योगायोगाने एका वर्ष भरात कोल्हापूरच्या वास्तव्यात तशीच एक आरोळी ऐकू आली आणि साताठ महिन्यात शिवाजी विद्यापीठाच्या मागच्या बाजूला टोलेजंग घरकुलाच्या योजना तयार झाल्या. कोल्हापूरकरांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती असा दर – प्रति चौरस फुटाला तीन हजार !!

घोषणा झाल्यावर बारा पंधरा वर्षांनी नाशिक आज तरी आयटी डेस्टिनेशन वगैरे झाले नाही. गेल्या पंधरावर्षात देशभरात बहुतेक ठिकाणी झाले तेच नाशकातही झाले. जागांचे भाव वाढवून बांधकाम व्यवसायात तेजी निर्माण झाली आणि आज मितीस ती विझली. आजही काही संस्था आणि गटांना नाशिक सिलिकॉन व्हॅली होणार असल्याचे स्वप्न पडते. आयटी व्यवसायाच्या भरभराटीच्या पंधरावर्षात नाशकात आयटी व्यवसाय का बहरला नाही याचे सिंहावलोकन करताना मात्र नाशिककर दिसत नाहीत.

आयटी हा फक्त मनुष्यबळावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. एका आयटी कंपनीचा एकूण व्यवसाय हा त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक डोक्याने केलेल्या कामाचे आर्थिक मुल्याकंन असते. त्यामुळे अशी हजारो, लाखो डोकी महत्वाची आहेत. पुण्याला आयटी आयती मिळाली नाही. देशातली पहिली सॉफ्टवेअर कंपनी मुंबईत स्थापन झाल्यावर चारच वर्षांनी १९७२ साली नरेंद्र पटणी नामक अमेरिकेमध्ये कॉम्प्युटर उद्योगात काम करणाऱ्या एका उद्योजकाने आपल्या व्यवसायाचे एक कार्यालय मायदेशात भारतात थाटायचे ठरविले. आख्या देशात त्यांनी आपल्या व्यवसायासाठी पुण्याची निवड केली कारण पुण्यामध्ये असलेला आणि वाढत चाललेला औद्योगिक माहोल.

या व्यवसायाला सर्वात महत्वाचे असणारे मनुष्यबळ पुण्यात मिळणार याची खात्री असल्यामुळे स्वाभाविकपणे पुण्याची निवड झाली. पटणींनी त्यांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या उद्योगासाठी एका उमद्या तरुणाची निवड केली त्याचे नाव होते नारायण मूर्ती. पुढे नारायण मूर्तींनी त्यांच्या सहकाऱ्यांची कंपनीसाठी निवड केली ते होते गोपालकृष्णन, शिबूलाल, नंदन निलकेणी, के दिनेश, अशोक अरोरा वगैरे. पटणी कम्युटर सर्व्हिसेस या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या होती फक्त २०. पण आज भारतातल्या ज्या आयटी उद्योगाची आपल्याला साधारणपणे ओळख आहे त्या उद्योगाचे उगमस्थान ही क्रांतिकारी कंपनी आहे ज्यांनी अमेरिकेतल्या उद्योगांना भारतातून सेवा पुरविण्याचा उद्योग सुरु केला. पुढे सुमारे १९८० साली नारायण मूर्ती आणि त्यांनी निवडलेले सर्व सहकारी यांनी पटणी कंपनी एकत्रित राजीनामे देऊन मोकळी केली आणि पुण्यातच मॉडेल कॉलनी मध्ये स्वतः;ची तशीच सेवा देणारी इन्फोसिस नावाची कंपनी उभी केली. या इतिहासाची उजळणी करताना महत्वाच्या दोन मुद्यांकडे लक्ष दिले पाहिजे : एक तर भारतातला आयटी उद्योग अचानक एकदोन लाख लोकांचा झाला नाही. अतिशय हुशार आणि कर्तबगार उद्योजकांनी वीस पंचवीस लोकांना घेऊन सुरु केला आणि काही दशकांनी तो मोठा केला. दुसरी सर्वात महत्वाची बाब आयटी उद्योगाला आवश्यक असणारे मनुष्यबळ जिथे उपलब्ध आहे तिथेच तो सुरु झाला आणि बहरला. या पार्श्वभूमीवर नाशिकला आयता आयटी उद्योग का सुरु व्हावा ? आज नाशकात एकूण सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध असणारे मनुष्यबळ आहे सुमारे दीड लाखाच्या घरात. या दीड लाखात कामगार, अधिकारी, अभियंते इत्यादी सगळे आले. एकट्या इन्फोसिस कंपनीमध्ये पुण्यात काम करणाऱ्या लोकांची संख्या आहे चाळीस हजार ! ज्या आयटी डेस्टिनेशनचे स्वप्न नाशिककर बघत आहेत त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ गुणात्मक किंवा संख्यात्मक दृष्ट्या नाशकात पुरेसे नाही. नागपूर हल्ली वाढण्यासाठी किती धडपडते आहे आणि त्यासाठी असणारे पाठबळ किती आहे याचा इथे उहापोह करायची गरज नाही. पुण्यातल्या एका नामांकित आयटी कंपनीने नागपूरमध्ये आपला पसारा वाढविण्याचा निर्णय करून तिकडे आपले कार्यालय थाटले. स्वतःच्याच कंपनीतल्या हजारो लोकांना नागपूरमध्ये काहींनी विस्थापित व्हावे असे आवाहन केले, किमान कंपनीतले नागपूरकर त्या आवाहनाला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा होती. पण दीडदोन वर्षानंतर कसेबसे खच्चून पाचशे लोक तिथे आज काम करतात. तीच गोष्ट गोव्यासारख्या आकर्षक ठिकाणाची. पुण्यासारख्या ठिकाणी काही दशकांच्या तपश्चर्येने आयटी उद्योगाला आवश्यक असणारे मनुष्यबळ आज उपलब्ध आहे. त्यामुळे तिथे एकाचे चार आयटी उद्योग उभे राहू शकतात. शिवाय या उद्योगांना पूरक असणारे बाकी काही उद्योग प्रचंड मोठ्याप्रमाणात पुण्यात आहेत.

एखाद्या आयटी उदयोगाला एखाद्या नवीन प्रकल्पाची संधी मिळाली की तातडीने विशिष्ट क्षेत्रातले हजार बाराशे अभियंत्यांची आवश्यकता भासते. ते मनुष्यबळ पुरवण्याची क्षमता आज पुण्यासारख्या शहराने कमावली आहे. नाशिकने या पार्श्वभूमीवर आपली पायरी ओळखली पाहिजे आणि आपल्या आयटी डेस्टिनेशन या स्वप्नाला वास्तवाचा बांध घातला पाहिजे. नागपूर किंवा अहमदाबादला देखील बलाढ्य राजकीय पाठबळ असून देखील आयटी डेस्टिनेशन अजुनी होता नाही आले. दुर्दैवाने आयटी उद्योगाला आवश्यक असणाऱ्या सुविधांचा आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचे असणाऱ्या मनुष्यबळाचा आणि आयटी उद्योगाला आवश्यक असणाऱ्या एकूण भावविश्वाचा विचार नाशिककरानी आयटीचे स्वप्न बघताना केला नाही. फक्त विस्तृत प्रमाणावर जागा उपलब्ध असणे ही आयटी उद्योगाची गरज नाही.

नाशिकने आयटी उद्योगासाठी आकर्षक बनण्यासाठी किमान आठ दहा वर्षे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. विशेषतः मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीजचा फैलाव अधिक तगडा करावा लागेल. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ देशभरातून आकर्षित करावे लागेल. देशात आणि परदेशात सुद्धा नाव लौकिक असणाऱ्या शेक्षणिक संस्था ही पुण्याची जमेची बाजु आहे. दोन वर्षांपूर्वी IIMs ची संख्या वाढवणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला एक मिळणार असे स्पष्ट नमूद केले होते. औरंगाबादकरांनी सह्यांची मोहीम राबवली, निवेदने दिली, प्रचंड धडपड केली. पण ती घोषणा नाशिककरांच्या खिजगणतीत ही नव्हती. अशा अनेक संधीसाठी टपून बसावे लागेल. उत्तम मनुष्यबळ उभे करण्यासाठी उद्योगांनी नाशकातल्या शैक्षणिक संस्था दत्तक घाव्या लागतील. फक्त पदवीदानाचे व्यावसायिक कार्य न करता त्यांना उद्योगांना आवश्यक असणारे कुशल विद्यार्थी घडविण्याचे सामाजिक कामही करायला भाग पाडावे लागेल. छोटे आयटी उद्योग प्रयत्नपूर्वक रुजवावे लागतील त्यातूनच कदाचित उद्याचा इन्फोसिस किंवा विप्रो सारखा एखादा उद्योग जन्माला येईल. नाशिकला आयटी आयता मिळणार नाही.
©सुधीर मुतालीक,नाशिक.

Leave a comment

Filed under Uncategorized

आमचं मॉडेलच गंडलंय…..

सत्ता तुझी माझी आहे. अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे गंडलेत.
पोरांची हुशारी मार्कावरून ठरविणारा आमचा समज गंडलाय
एकुणच विकासाची संकल्पना गंडलीय.
ज्याचा पगार ज्यास्त तो अधिक हुशार – कस्काय ???
आमचा लोकशाहीचा अर्थ गंडलाय
विकास चीन मधून उचकटलेल्या कंपन्या इकडे येण्यामुळे होईल हा समज गंडलाय….
तरीपण सोन्याचा धूर कसा काढणार ??? :

कोरोनाचा धुमाकुळ सुरु झाल्यापासून माणसांच्या जगण्याचे अनेक – जवळ जवळ सगळेच – संदर्भ बदलले. विश्वास, आत्मविश्वास, आनंद, समाधान, समज, सुख, काळजी, गरज वगैरे सगळ्यालाच एक नवीन संदर्भ जोडला जातो आहे. कोरोनाने मानवी जीवनाला खिंडीत गाठलेय. एकूणच जगण्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सरकला आहे. अगदी माणसांची एकमेकांशी असणारी मैत्री, नाती इत्यादी मानवी संबंध सामावून घेण्याइतपत बदलाची चौकट विस्तारली आहे. त्यामुळे भौतिक, उत्पादन साधनातील बदल हे अगदीच अपरिहार्य. . भविष्य अगदीच अनिश्चित वगैरे असल्याचा समज असण्याचे कारण नाही, पण भविष्याविषयीचे जुने आराखडे नवीन संदर्भात तपासून मात्र नक्की बघावे लागतील. त्यामुळे सध्याचा कालावधी हा चिंतनाचा, सिंहावलोकनाचा आणि मग काही ठोस ठरविण्याचा आहे, हे थोडे गंभीरपणे ध्यानात यायला पाहिजे.

व्यक्ती किंवा कुटुंब स्तरावर जसे बदल, चिंतन, सिंहावलोकन आणि योजना या टप्प्यांमध्ये जशी कार्यवाही करणे आवश्यक आहे तशीच एक समाज, राष्ट्र म्हणून देखील. समाज किंवा राष्ट्र म्हणून विचार करण्याची प्रक्रिया आपल्या पासून दूर कुठे तरी होते, त्यामुळे ती आपली जबाबदारी नाही, असा साधारणपणे विशेषतः भारतीय नागरीकांचा आज ही समज आहे. भारतीय लोक असे संबोधताना झोडायला सोपे आहेत म्हणून ठोका असा हेतू नाहीय. आपला इतिहास दुर्दैवाने तसा आहे. दोनेक हजार वर्षे सतत आक्रमण सहन करताना राष्ट्रीय धोरण म्हणून जे काही असते ते आक्रमकांची किंवा गेल्या शे दोनशे वर्षात साहेबाची जबाबदारी असते असाच समज आपल्या गुणसुत्रांवर लिहिला गेला आहे. रस्ते, इस्पितळे, शिक्षण पाणी आरोग्य इत्यादी जे काही करायचे ते साहेबाने करायचे किंवा तो करेल तेव्हा आपण उपभोगायचे. याचा अर्थ ते झाले नाही तर साहेबानी केले नाही म्हणून झाले नाही अशीच धारणा होती. ती कदाचित तत्कालीन परिस्थितीचा विचार करता स्वाभाविक असेलही.शिवाय जनतेला गुलामच ठेवायचे असल्याने विचार आणि कार्यवाही करण्याची मुभा देखील नव्हती. अगदी एखाद्याच्या शेतात पिकलेला माल कुठे कसा कोणत्या किमतीला विकायचा यावर ही बंधने होती. ( जी नंतर काल परवा पर्यंत सुरु राहिली.) त्यामुळे असेल हरी तर देईल खाटल्यावरी याच धारणेत वाढलेल्या समाजाला किंवा प्रत्येक व्यक्तीला एक राष्ट्र म्हणून माझी देखील काही जबाबदारी असु शकते ही कल्पनाच जणु अमान्य होती. दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील तत्कालीन सरकारने व्यवहारात साम्यवादी धोरण अवलंबले. जे काही करायचे ते सरकार करेल. सरकार मोठे कारखाने बांधेल, तुम्ही पदवी घ्या आणि त्या कारखान्यात कामाला लागा. वगैरे. आपला देश आता प्रजासत्ताक आहे. म्हणजे सत्ता प्रजेची आहे, म्हणजे आपलीच आहे – तुझी माझी ! हे अजुनी कळले नसलेला आपला समाज आहे. जे काही करायचे ते समाजाने करायचे. पण समाज मात्र लोकप्रतिनिधीला किंवा नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी असणाऱ्यांना, साहेबाचा प्रतिनिधी मानून आपण त्याच्या आश्रयाला जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. नागरी सुविधा पुरविणारा अधिकारी तर आपल्या लेखी सेवक नाहीच, तो साहेब होऊन बसलाय आणि त्यांना खुष ठेवण्यात किंवा त्यांची मर्जी संपादन करण्यांत आम भारतीय धन्यता मानतो. जे काही करायचे ते या साहेब लोकांनी करायचे अशीच आपली धारणा आजही आहे. सुसंगत राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत ही एक भीषणच अडचण आपल्याकडे आहे.

त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपला बोनसाय झाला आहे. आपली व्यक्ती, समाज आणि राष्ट्र म्हणून वाढ सामर्थ्याच्या मानाने खुजीच आहे. क्रिकेट सोडून आपल्याला काही खेळता येत नाही. म्हणजे स्पर्धेमध्ये अन्य कोणत्या खेळात आपल्याला फारशी चमक दाखवता आली नाही किंवा संशोधनांच्या क्षेत्रात नोबेल वगैरे पर्यंत पोहोचणारी भरीव कामगिरी करता आली नाही किंवा पाच हजार वर्षे जुनी संस्कृती असणाऱ्या आपल्याला काही भन्नाट आर्थिक विचार देता आला नाही वगैरे. कोरोनामुळे उघडी पडलेली साधी आरोग्य सेवा देखील देशांतर्गत उभी करता आली नाही. आपण कृषीप्रधान देश असून देखील रोज खाण्याच्या गोडे तेलाच्या पंच्याहत्तर टक्के तेलही आपल्याला आयात करावे लागते आणि एका रिलायन्सचा किंवा काही अंशी टाटा समूह यांचा अपवाद सोडला तर आपल्या बलाढ्य देशात तसे महाकाय उद्योग देखील उभे करता आले नाहीत. आपली विकासाची संकल्पनाच गंडली आहे. याचा एक उत्तम दाखला अलीकडे मिळाला. कोरोनाच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर चीनमधले उद्योग आता आपण उचकटून अन्य देशात विस्थापित करणार अशा जपान, अमेरिका किंवा युरोपातून बातम्या यायला लागल्या, त्यावेळी गांवोगांवी, वेगवेगळ्या लोक समूहांमध्ये याची चर्चा व्हायला लागली ती आपल्याकडे, आपल्या गांवात यातले किती उद्योग येतील, कसे आणता येतील वगैरे !

अर्स्ट शुमाकरला सुसंगत तंत्रज्ञानाचा जनक जग का मानते कोण जाणे ! या शूमाकराचा जन्मच १९११ सालातला. त्याला सुसंगत तंत्रज्ञानाची गरज वाटली खुप पुढे १९५५च्या आसपास. इंग्लंडमध्ये कोळसा प्राधिकरणात काम करताना शूमाकरला ब्रह्मदेशच्या तत्कालीन सरकारने आर्थिक सल्लागार म्हणून तीन महिने बोलावले आणि तिथल्या नागरिकांचे रहाणीमान बघून त्याला काही साक्षात्कार झाले. त्या साक्षात्कारांना शुमाकरने “बौद्ध अर्थव्यवस्था” असे नाव दिले. पारंपरिक तंत्रज्ञानावर जोर दिला पाहिजे. Mass Production च्या ऐवजी Production by masses महत्वाचे, विकेंद्रित व्यवस्था आवश्यक आहे आणि खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत ! या सगळ्या संज्ञा आणि संकल्पना तर भारतीयांना ओळखीच्या किंवा पाठ्यपुस्तकात आपल्या म्हणून परिचित असतील. बरोबर आहे कारण १९२१ साली – शुमाकरच्या आधी तीस वर्षे – रवींद्रनाथ टागोरांनी खेडयांचे पुनर्निमाण करण्याच्या उद्देशाने श्रीनिकेतन नावाची संस्था उभी केली होती. ते म्हणायचे “पाश्चात्य संस्कृती शहर केंद्रित आहे. ती विटा आणि लाकूड यांनी उभ्या केलेल्या शहरांमध्ये सामावली आहे. भारतीय जीवनाचे सर्वस्व शहरांपासून दूर निसर्गाजवळ ग्रामीण भागात फुलते. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीची प्रेरणाच मुळात खेडी विकसीत करणाऱ्या ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यातून उगम पावलेली, पारंपरिक तंत्रज्ञानाला उभारी देणारी, विकेंद्रित व्यवस्था मजबूत करणारी. खेडी स्वयंपूर्ण झाली पाहीजेत. गांधीजी म्हणायचे ” देव करो की भारतीयांनी पाश्चात्यांची औद्योगिक संकल्पना उचलायला नको.” सुसंगत तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण गांधीजींच्या स्वदेशी चळवळीमध्ये होते. स्वतंत्र भारतात मात्र या विकासाच्या संकल्पनेची गोचीच झाली. मोठे उद्योग विकासाच्या केंद्रस्थानी आले, विकास आराखड्याचे आकर्षण बनले. पारंपरिक तंत्रज्ञानाला न्यूनगंड आला. सगळे काही ‘इंपोर्टेड’ आले. व्यवस्थापनाची आणि अभियांत्रिकीची पुस्तके इंग्लंड अमेरिकेतल्या शोधांचेच गोडवे शिकवू लागली. ती वाचून आपले युवक आहे त्यांच्या गावखेड्यापासून दूर आणखी मोठ्या गावात, शहरात, महानगरात किंवा परदेशात जाण्याचीच स्वप्ने बघू लागले. समस्त शिक्षित युवकाला खेडयांकडे पाठ फिरवून शहरांचेच डोहाळे लागले. स्वदेस नामक फारतर सिनेमा होऊ शकतो आणि त्यातल्या शाहरुखमुळे फारतर तो सिनेमा आवडू शकतो. पण देशात एकूणच आपली विकासाची संकल्पना गंडली.

सोव्हिएत रशियाने मुळातच तगडे आहेत म्हणून शेतात काम करणारी पोरं दरादरा ओढत आणून फॅक्टरीत मशिन्सवर जुंपली. आणि शेवटी विघटित झाले. ते आम्ही बघितले की नाही कोण जाणे. चीनने आधी शेती आणि त्यावर आधारित उद्योग मजबूत केले. तिकडे आपले लक्ष गेले की नाही कोण जाणे. स्वतंत्र झाल्यावर आम्ही आधी इंग्लंड अमेरिकेतून मोठाली मशिन्स आणली आणि कारखाने थाटले. रशियातून काही तंत्रज्ञान घेतले आणि पाणबुडी, विमाने, अणुद्योग उभे केले. आर्थिक उदारीकरणानंतर चीनमधून सेझची कल्पना जशीच्या तशी आणली. मुंबईचे शांघाय वगैरे करण्याच्या घोषणा झाल्या. त्याचवेळी आयटीला आपली औद्योगिक क्रांती मानले.

या सगळ्यात सुसंगत तंत्रज्ञान ठार चिरडून गेले.आपल्या म्हणजे भारतीय प्रकृतीला साजेसा विकास कुठे होतो आहे ? भारतीय नागरिकांची म्हणून काही गुणवैशिष्टये असतील या विषयी आपल्या नियोजन मंडळींना विश्वास नाहीय का ? ज्या कोणत्या विकासाच्या मॉडेलच्या आधारे आपली रहाटी सुरु आहे त्याचा आज दृष्य परिणाम काय ? पारंपरिक तंत्रज्ञान म्हणूनच त्यामुळे गुदमरले. आम जनता उत्तम पदवी घेऊन, उत्तम नोकरी मिळवून, उत्तम घर घेऊन, उत्तम लग्न करणे या पलीकडे सरकत नाहीय. आमची यशस्वितेची व्याख्या देखील गंडली आहे. गुणा: पुजा स्थानं अशी ओळख असलेल्या भारतीय समाजात लोकांचा बुद्ध्यंक किती पगार मिळवतो यावर ठरतो. किती मार्क्स पडले यावरून आम्ही आमच्या युवकांची हुशारी ठरविण्याचा गुन्हा करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे खेडीप्रधान देशातली आमची खेडी रस्ताहीन झाली. सोन्याचा धूर निघायचा त्या कालावधीचा – विशेषतः सन १७५० च्या आधीच्या भारताचा आज समस्त भारतीयांना अभिमान वाटतो. तसे दिवस पुन्हा येणार अशी स्वप्ने आपण बघतो, घोषणा देतो. त्या समाजाचा कणा होता इथले छोटे उद्योग.

चीन मधून येऊ द्या इकडे उद्योग. युरोप अमेरिकेला इथे थाटू त्यांचे कारखाने. त्यांना नाकारणे बरोबर नाही. पण आपला आर्थिक विकास या बाहेरून येणाऱ्या उद्योगांवर अवलंबून आहे अशी कुणा अर्थ तज्ज्ञाची कल्पना असेल तर ती भाबडी आहे, फसवी आहे. ज्या चीनचे गोडवे गाणारे किंवा चीनशी स्पर्धा करू वगैरे फुशारक्या मारणाऱ्या तज्ज्ञांनी आज चीनची काय परिस्थिती आहे, याचा आढावा नक्की घ्यावा. कोरोना सारख्या फुटकळ विषाणूने युरोप अमेरिकेतल्या कंपन्यांनी चीनच्या कारखान्यावर ठेवलेल्या ऑर्डर्स एका रात्रीत रद्द केल्या. काल पर्यंत ज्या कारखान्यात धडाधड मशिनी चालायच्या आणि हजारो कामगार काम करायचे तिथे स्मशान शांतता आहे. कामावर आलेल्या लोकांना गेटवरूनच घरी परत पाठवले, कायमचे. गेल्या चार पाच महिन्यात तिथे बेकारी प्रचंड वाढलीय. आपल्या नागरीकांचे त्यामुळे लोकांचे मन विचलीत करण्यासाठी चीन भारत. म्यानमार इत्यादी सारख्या देशांच्या सीमेवर विनाकारण क्रूर टिवल्याबावल्या करतो आहे. अशा चिनी स्टाईलचा विकास आपल्याला नको आहे. मुळात आम्हाला कुणाशी स्पर्धा करत विकासच करायचा नाहीय. आमची स्पर्धा आपल्याशीच असायला पाहीजे. आधी आम्हाला गोडे तेला सारख्या जीवनावश्यक पदार्थासाठी स्वावलंबी व्हावे लागेल. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची आयात थांबवावी लागेल. अशा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक वस्तू ज्या वापरतो, त्या इथे इथल्या लोकांनी बनवायचा सपाटा चालविला पाहीजे. मोठे कारखाने नसतील तरी चालेल. इथल्या लोकांनी, भारतीयांनी त्यांच्या कुवतीनुसार छोटे छोटे कारखाने सुरु केले पाहीजेत. मोठे कारखाने ही अमेरिका आणि रशिया यांच्या कडून आलेल्या भानगडी आहेत. त्या छोट्या छोट्या कारखान्यात जे जे बाहेरून घेतो ते ते सगळं इथे आपल्या लोकांनी बनविले पाहीजे. उद्योजकतेचा फैलाव झाला पाहीजे. उदाहरणार्थ इगतपुरी – नाशिक -सिन्नर असा एकत्र छोट्या उद्योगांचा पार्क वसवीला पाहीजे. सातारा कराड कोल्हापूर कागल अशा भागात देखील एकत्र छोट्या उद्योगांचा पार्क. १३० करोड लोकांच्या देशात खच्चून सहा लाख उद्योग आहेत ! त्यातले ९५ % छोटे उद्योग आहेत. शक्य तितक्या लवकर पन्नास लाख उद्योग उभे राहीले पाहीजेत. छोटे छोटे. या छोट्या उद्योगात विमाने बनविण्याचे देखील कसब असू शकते या विषयी शंकाकुशंका आणि चर्चा करणे व्यर्थ आहे. आम्हाला आमचा विकास चीनमधून उचकटलेल्या उद्योगांवर किंवा इंग्लंड अमेरिकेतून येणाऱ्या उदयोगांवर नव्हे इथे आम्ही उभे केलेल्या उदयोगांवर निर्धारित करायचा आहे. आम्हाला आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे.
अर्थात देशाला आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी उद्योजकांपेक्षा ग्राहकाची अधिक आहे. युनिलिव्हरचे केचप खाणाऱ्या जिभेला हे समजवावे लागेल की ते केचप बनविताना युनिलिव्हर दर वर्षी सहाशे करोड रुपयांची खरेदी चीन कडून करतो आणि नफा इंग्लंडला पाठवतो. ते स्वस्त देतात किंवा दर्जा चांगला असतो, असली टोमणेबाजी इथल्या ग्राहकांनी बंद करायला पाहीजे. आपण इथे बनविलेला माल वापरतो आहोत. त्याची किंमत अधिक असेल तरी नफा देशातच राहतो आहे याचे भान ठेवावे लागेल. दर्जा सुधारण्यासाठी आधी खप वाढू द्यावा लागेल. खप वाढू देण्याची जबाबदारी ग्राहकांची आहे. एकशे तीस करोड जनसंख्येचा देश आहे. प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. कितीही बनविले तरी इथेच खपेल, घेणार्यांनी मन घट्ट केले तर ! हे वास्तवात आले तर आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनू. आम्हाला चीन किंवा अन्य देशातल्या उद्योगांची ज्या दिवशी गरज भासणार नाही त्या दिवशी सोन्याचा धूर आपोआप निघेल.© सुधीर मुतालीक

Leave a comment

Filed under Uncategorized

Nashik News: समस्या नव्हे, आव्हान समजा – problems, not a problem | Maharashtra Times

Nashik: म टा प्रतिनिधी, नाशिकजेव्हा ध्येयप्राप्ती होते, तेव्हा कोणताही व्यक्ती अशक्त होते…
— Read on m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/problems-not-a-problem/articleshow/69803070.cms

Leave a comment

Filed under Uncategorized

नाशिकच्या भाजपमध्ये आता बदल हवाय !

नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाला घसघशीत यश मिळाले पण त्याचा फायदा करून घेण्याची संधी स्थानिक भाजप नेत्यांनी वाया घालवली. पहिला धक्का दिला तो महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीने. सध्याच्या महापौर आणि उपमहापौरांवर वैयक्तिक टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. पण इतक्या भक्कम जनाधाराचा नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांना उपयोग करून घेता नाही आला. जुन्या पुराण्या राजकारणातच ही मंडळी पूर्ण अडकलेली दिसत आहेत. मुळात देशाच्या नकाशात आता नाशिक उठून दिसेल असे काहीतरी भरीव करून दाखवू असे स्वप्नतरी यांनी बघितले असेल का याची शंका वाटते.

नवा भारत, नवे जग, युवा पिढीच्या आकांक्षा, संतुलित विकास किंवा अन्य काही विषयांची जाण तरी यांना असेल की नाही कोण जाणे. पहिल्या वर्षातच नाशिकच्या विकासाचे एखादे आकर्षक मॉडेल तयार करून ते नाशिककरांसमोर ठेवायला हवे होते. त्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी नाशिककरांना आपल्या भजनी लावायला हवे होते. त्यासाठी नाशिकमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नागरिकांच्या अनेक बैठका घ्यायला पाहिजे होत्या. ते उद्दिष्ट नाशिककरांच्या गळी उतरविण्यासाठी अखंड मेहनत घ्यायला पाहिजे होती जेणे करून पुढील चार वर्षे प्रत्येक नाशिककर त्या उद्दिष्टपूर्ती साठी वैयक्तिक पातळीवर देखील झटायला उद्युक्त झाला असता. हे सगळं फार पुस्तकी वाटत असले तरी समर्थनेतृत्वाने हेच करायचे असते. आपल्याला आज अशी काही कार्यवाही पुस्तकी वाटते हाच सद्य नेतृत्वाचा पराभव आहे. अब्राहाम लिंकन म्हणायचे “एखादा रचनात्मक मुद्दा शोधून लोकांच्या भल्यासाठी लोकांना त्या मुद्यामध्ये गुंतवून ठेवणारी व्यक्ती उत्तम लोकनेता असते.” नाशिक विषयीच्या कोणत्या अशा मुद्यामध्ये नाशिककर मनोमन गुंतले आहेत ?

मी स्वतः उद्योजक आहे. नाशकात गेली तेवीस वर्षे उद्योग करतो. मला तरी महापौर किंवा उपमहापौर यांच्या उद्योजकांबरोबर बैठका झाल्यात आणि त्यामध्ये काही महत्वाच्या मुद्यांविषयी विचार मंथन सुरु आहे असे दिसले नाही. शेतकरी, कामगार, वकील, डॉक्टर, शिक्षक, शिक्षण संस्थाचालक, चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी, इत्यादी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये गटागटाने आणि वारंवार काही विचार मंथन किंवा नाशिकच्या विकासाची चर्चा, किंवा अन्य काही जनहिताच्या चर्चा असे होताना दिसत नाही वा ऐकिवात नाही. नाशिकमधल्या किती नागरिकांना आपल्या महापौर किंवा उपमहापौरांविषयी आपुलकी आहे – त्यांचे कार्यकर्ते सोडून ? पक्षीय राजकारण सोडून ? नाशकातल्या किती युवकांना, महिलांना, नागरिकांना आपल्या महापौर आणि उपमहापौरांविषयी अभिमान वाटतो ? वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात काम करणारी मंडळी अभ्यासासाठी, व्यवसायासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी अन्य देशातल्या एखाद्या शहराच्या महापौराला नक्की भेटली असतील. बैठकीमध्ये त्या शहरात गुंतवणुकीसाठी वगैरे त्या महापौराने अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन केले असेल. त्यावर चर्चा केली असेल. अशी अपेक्षा नाशिककर आपल्या महापौरांकडून करू शकतील का ? अन्य देशातून येणाऱ्या एखाद्या शिष्टमंडळांसमोर एखादा विषय अभ्यासपूर्ण मांडू शकतील काय ? आलेल्या मंडळींमध्ये नाशिकविषयी कुतूहल निर्माण करू शकतील काय ?

स्मार्ट सिटीच्या उद्दिष्टांमध्ये नाशिकचे नागरिक कुठे आहेत ? स्मार्ट सिटीचे काय चाललंय, काय होणार हे किती नागरिकांना माहिती आहे ? स्मार्ट सिटी म्हणजे काय हे तरी किती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला आहे ? या अवाढव्य प्रकल्पामध्ये प्रत्येक नागरिकाची काही जबाबदारी आहे अशी जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची ? जाणीव -कोणतीही- जवळच्या नातलगामध्ये तरी चार सहा महिने प्रयत्न करता येते का ?

स्मार्ट सिटीचे थोडे बाजुला ठेवूया, तो भविष्यातला प्रकल्प आहे. भविष्यात जे होईल ते होईल. आजच्या नाशिकच्या समस्यांच्या बाबतीत नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरांचे कार्यवाहीचे आराखडे कसे आहेत ? उदाहरणार्थ सातपूर अंबड सारख्या संपूर्ण जगाला परिचित असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पन्नास वर्षात सांडपाण्याची निर्मिती होते हेच महानगरपालिकेला कदाचित माहिती नसावे. आश्चर्य वाटेल पण स्मार्ट होऊ बघणाऱ्या नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये इतिहासातल्या इसवी सन 2019 सालापर्यंत तरी सांडपाण्याचे विल्हेवाट लावायची सोय नाही. म्हणजे ड्रेनेज सिस्टीम नाही. इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी सांडपाण्याची विल्हेवाट लावायची व्यवस्था मोहेंजदरो आणि हडप्पामध्ये होती ! कॉलेज रोड सारख्या झगमगीत भागात रस्त्यावर फुटपाथ नाहीत. तिथे पायी चालणारी जनता फिरकतच नाही आणि सगळेच गाड्या घेऊन फिरतात असा काहीसा समज आपल्या महानगरपालिकेचा असावा. मोठ्या उत्साहाने नाशकात वेगवेगळ्या वसाहतींमध्ये महानगरपालिका बागा तयार करते. सहा सात महिन्यानंतर किती बागा या बाग म्हणून जिवंत राहतात ? नाशकातल्या अशा शेकडो समस्या नक्की सांगता येतील. पण त्या नागरिकांच्या मनात आणि वैयक्तिक चर्चेमध्ये आहेत. त्या शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी कुणाची ?

एकाच पक्षाचे सगळे – म्हणजे तीनही आमदार भाजपचे असताना आणि महापालिकेत दणदणीत बहुमत मिळून संपूर्ण सत्ता असताना, भाजपचा महापौर आणि उपमहापौर असताना देखील नाशिकमध्ये काहीच भव्यदिव्य होताना का दिसत नाहीय ? आपले नाशिक सर्वांगसुंदर करण्याचे प्रयत्न का होत नाहीत? नाशिक आपल्याआपण नैसर्गिकपणे – कदाचित पूर्वी सारखेच – का चाललंय ? इतकं सगळं नागरिकांनी भाजपला देऊन मग फायदा काय ? आजही महापालिकेच्या कामकाजाबाबत नाशिककर निरिच्छ का बरे राहतो ? की नाशिकरानी तिकडे काय चालले आहे हे बघूच नये अशीच अपेक्षा आजही आहे ? महानगरपालिका आणि नाशिककर रेल्वेचे रुळासारखे का आहेत ? भाजपमधल्या स्थानिक नेते मंडळींना हा दुरावा दूर करून लोकसहभाग तेवत ठेवावा असे का नाही वाटत ? की अजुनी नागरिक हे फक्त मतदारच आहेत असे वाटते ?

२०१४ सालानंतर देशात संपूर्ण वेगळ्या धाटणीचे राजकारण सुरु झाले आहे. आता कुठे देशात सामान्य प्रजेचे राज्य आहे असे वाटते आहे. खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक झाल्याचा फील येतो आहे. दिल्लीतला एकही मंत्री एकही पैसा न खाता देशाची सेवा करण्यासाठी काम करतो आहे अशी खात्री आता देता येऊ लागली आहे. पण दुर्दैवाने नाशकातली स्थानिक भाजपची मंडळी अजुनी जुन्याच स्टाईलच्या राजकारणात अडकली असल्याचे दिसते आहे. ज्या पद्धतीचे महापौर आणि उपमहापौर नाशिकसाठी दिले त्यावरून ते सिद्ध होतेच आहे. लोकांनी दिलेल्या जनादेशाचा काडीमात्र विचार न करता नव्या भारताला साजेसे नेतृत्व न देता अँटीचेंबर मध्ये बसून आपापल्या सोईची मंडळी पुढे केली आहेत. पुरावे जाऊ द्या. पण महानगरपालिकेत चिरीमिरी न देता घेता आपले लोकप्रतिनिधी काम करतात असे किती नाशिककर ठामपणे सांगू शकतात ?

नाशिक महानगपालिकेत स्वच्छ कारभार चालतो याची ग्वाही देणारा महापौर आम्हाला पाहिजे. नाशिककरांमध्ये तसा विश्वास निर्माण करणारा महापौर आम्हाला पाहिजे. नाशिकमध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे स्वप्न बघणारा महापौर आम्हाला पाहिजे. स्वप्नातले ते नाशिक उभी करण्याची क्षमता असलेला महापौर आम्हाला पाहिजे. नव्या भारताला साजेसा, उच्चशिक्षित महापौर आम्हाला पाहिजे. बाहेर देशीचे पाहुणे गुंतवणुकीचे प्रपोजल घेऊन आल्यावर त्यांच्याबरोबर समर्थपणे चर्चा करणारा महापौर आम्हाला पाहिजे. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन, गरीब श्रीमंत हा भेद न ठेवता समस्त नाशिककरांना आपलेसे करणारा महापौर आम्हाला पाहिजे. विज्ञानाची कास धरणारा महापौर आम्हाला पाहिजे. नाशिककरांनी अभिमानाने मिरवावा असा महापौर आम्हाला पाहिजे.

हे स्वप्न बघताना आम्हाला भाजपशी बंडखोरी नाही करायची. राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र यांचेच नेतृत्व अधिकाधिक बळकट करायचे आहे. पण या दोघांना साजेसे नेतृत्व – महापौर, उपमहापौर आणि वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले तीन ही आमदार – नाशकात असावे अशी माफक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होई पर्यंत प्रामाणीकपणे, संवादाच्या माध्यमातून झटू. आता आम्हाला बदल हवाच आहे.

Leave a comment

Filed under Uncategorized

आपण नालायक नाही !

एका पर्यावरणवादी संस्थेने आता औद्योगिकरणाच्या आधीचे जीवनमान माणसाने जगायला सुरुवात केली पाहिजे, पैसे आणि मशिन्स ह्या जगायला अनावश्यक बाबी आहेत असे समजवणारी चळवळ सुरु केली आहे.

मला हे खुप आततायी वाटतं. अतिरेक आहे हा. पर्यावरणवाद्यांचा रोख चुकतोय. बऱ्याचदा अतिरेकी होतोय. औद्यगिकरण झालच नसतं तर काय स्थिती असती हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. म्हणजे उदाहरणार्थ इसवी सन १७००. या सुमारास अनेक आजार ज्यावर आज सहज उपाय आहेत किंवा जे आजार आज किरकोळ वाटतात त्या आजारांनी एखादा लोक समूह वा आख्खा देश गारद व्हायचा. उदाहरणार्थ हगवण. स्वीडन मधले ९०% लोक हागवणीमुळे हालहाल होऊन या सुमारास मेले. माणसाने कावळे चिमण्या हत्ती वाघ यांच्या प्रमाणे समस्त सृष्टीचा एक घटक म्हणून जीवन व्यतीत केले असते तर सृष्टीच्या नियमानुसार ” *Lifelessness is a rule, life is an accident* ” अशी परस्थिती निर्माण झाली असती. ९०% वनस्पती जन्मून लगेच न वाढता मरण पावतात वगैरे. सिंधू संस्कृती लुप्त झाली त्यावेळी कुठे औद्योगिकरण झाले होते ? ती लुप्त होण्यामागे कारण पर्यावरणाचेच होते – अनेक वर्षे दुष्काळ ! हजारो माणसे मेली. औद्योगिकरणाने खरेतर अशा समस्यांवर उपाय शोधले. क्वचित पाऊस पडणारे किंवा पाण्याचे स्रोत दुर्मिळ असणारे लोकसमूह आज समृद्ध जीवन जगतात. एका बाजुला पर्यावरणाचा माणसाकरवी विध्वंस होतो हे मान्यच आहे. त्याला माणसातली त्याच्या उत्पत्तीपासून तगून राहिलेली रानटी वृत्ती कारणीभूत आहे. ती खूप मोठ्याप्रमाणात खरीतर शमली आहे – ते ही औद्योगिकरणामुळेच. माणसाला माणूस म्हणून जगण्याची आणि जगवण्याची मुभा यांत्रिकीकरणा नंतर जोमाने फोफावली. कारण उद्योगातून अर्थ निर्मिती करण्याची संधी मिळाली. पैसा हे विनिमयाचे साधन माणसाने शोधून नसते काढले तर गुलामगिरी नाहीशी नसती झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी आणि वितभर कपड्यासाठी पोरीबाळी माणसे आजही माणसांनीच जनावरासारखी वापरली असती. औद्योगिककरणानंतर श्रमाचे मूल्य देऊन वस्तू खरेदीकरण्याची मुभा निर्माण झाली आणि आम माणसाला माणूसपण बहाल झालं. धोके माणसातल्या आजही उरलेल्या रानटीपणामुळे आहेत. पर्यावरणाला औद्योगिकरणामुळे धोका निर्माण झाला ही ओरड काही अंशी बरोबर असली तरी त्याचे उत्तर आणि उपाय माणूस अखंड शोधतो आहे, काही शोधांमुळे त्यातले बरेच धोके टळले आहेत. इथूनपुढेही टळतील. आता माणुस हरण्यासाठी जन्माला येत नाही. जगून काही भलं करण्यासाठी जगतो. डायनासोर नाहीसे झाले ते माणसामुळे नाही. आणखी कुठले प्राणी जे आज अस्तित्वात नाहीत ते खूप पूर्वी औद्योगिकरणाच्या पूर्वी नाहीसे झाले. पण आजचा प्रगत मानव वाघ नाहीसे होऊ नयेत म्हणून अतोनात प्रयत्न करतो ना ? कुत्री आजारी पडली की पदरचे पैसे खर्च करून दवाखान्यात नेतो ना ? गेल्या अडीचशे वर्षात माणसातला माणूस जागा झालाय. छान जगायचं. मजा करायची. आपण नालायक नाही.

©सुधीर मुतालीकq

Leave a comment

Filed under Uncategorized

उध्वस्त इराक…

*उध्वस्त इराक* sudhir mutalik

२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली. १९ मार्च २०१३ रोजी म्हणजे अमेरिकेने इराकवर “इराकी जनतेला मुक्त करण्यासाठी” केलेल्या हल्ल्याला बरोबर दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या लष्कराला “इराकी जनतेला मुक्त केल्याबद्दल” सलाम ठोकला. इराकी जनतेच्या आजच्या जीवनमानाचे वास्तव काय आहे ? गेल्या वर्षी नाशिक मध्ये माझ्या ऑफिसमध्ये आलेला आणि गेली काही वर्षे परिचित असलेला एक अत्यंत कर्तबगार उद्योजक “मी आणि माझ्या कुटुंबीयांना इराकमध्ये परमेश्वराने जन्माला घालण्याऐवजी अन्य कोणत्याही देशात कुत्र्याचा जन्म दिला असता तरी चालले असते” असे धक्कादायक आणि काळीजाचा थरकाप उडवणारे विधान करताना अतिशय हताश झालेला मी बघितला. सात आठ वर्षापूर्वी अतिशय वैभव संपन्न आणि सुखासीन आयुष्य जगणा-या कुटुंबांतला हा इसम ” रोज सकाळी उठल्यावर आणि परमेश्वराच्या कृपेने उठलो तर आज झोपे पर्यंत दिवसभर सुरक्षित जगायचे एवढेच आम्ही कुटुंबीय ठरवू शकतो. अमेरिकेला आम्हाला मुक्त करायचे होते. २००३ सालच्या आधी आम्ही मुक्त नसू कदाचित पण सुरक्षित नक्की होतो. आता मुक्त झालो की नाही माहिती नाही पण आम्ही सुरक्षित नक्की नाही ! ” अमेरिकेने २००३ साली इराकमध्ये घुसखोरी केल्या नंतर इराक गेल्या दहा वर्षांत संपूर्ण उध्वस्त झालंय. या विधानात सर्वात महत्वाची बाब अशी आहे की इराक युद्धामुळे उध्वस्त झालेलं नाही. इराक, युद्धानंतर अमेरिकेने आपल्या ताब्यात ठेवल्यानंतर बेचिराख झालंय.


जवळ जवळ सदतीस हजार इराकी जनता तुरुंगात डांबली गेली आहे ज्यांच्यावर काय आरोप आहे हे कुणाला माहिती नाही किंवा कित्येक जणांवर काहीच आरोप नाही. अबू घरिब इथला तुरुंग तर छळ छावणी आहे. इथल्या बंदिवानांवर कुत्री सोडणे, बेदम मारहाण, विवस्त्र अवस्थेत ठेवणे,लैंगिक अत्याचार असे प्रकार नियमित होत आहेत. अबु घरिब मधली थरकाप उडवणारी छायाचित्रे संपूर्ण जगाने पाहिल्यावर जी खळबळ उडाली ती बघून अमेरिकेचे तत्कालीन संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफिल्ड यांनी अमेरिकी काँग्रेस समोर झालेले अत्याचार मान्य केले होते आणि आवश्यक ते बदल इराक मध्ये करू अशी ग्वाही दिली होती. अर्थात त्याचा वास्तवावर आजतागायत फरक पडला नाही आणि अत्याचार सुरूच आहेत – अमेरिकेचे लष्कर तिथून निघाले असले तरी. या ग्वाही नंतर बंदिवानांच्या तोंडात प्लास्टिकचा पाईप आत मध्ये खोचून मारहाण असे नवीन प्रकारच्या तक्रारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात प्रसिद्ध केल्या आहेत. या सुमारे सदतीस हजार बंदिवानांपैकी अर्ध्या महिला आहेत आणि त्यांची परिस्थिती आणखी भीषण आहे. हे बंदिवान आहेत कोण ? त्यांचा गुन्हा काय असतो ? चोर, डाकू , देशद्रोही , अतिरेकी ? नाही. सबाह हसन हुसेन नावाची एकेचाळीस वर्षाची महिला पत्रकार आपल्या नातेवाइकाची चोरीला गेलेली गाडी परत आणण्यासाठी गेली असता तिला २९ फेब्रुवारी २०१२ रोजी अटक झाली. तिची रवानगी तीक्रीतच्या तुरुंगात केली. सबाहची २३ जानेवारी २०१३ रोजी निर्दोष मुक्तता झाली पण तरीही तिला २८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत तुरुंगात ठेवले होते. सबाह बाहेर आली ती संपूर्ण उध्वस्त होऊन. तिच्या शरीरभर सिगरेटचे चटके होते. प्रचंड मारहाणीच्या खुणा शरिरभर होत्या. तिला विवस्त्र करून पुरुष पोलिसांसमोर उभे केले जायचे. बर्फाच्या पाण्याचा मारा तिच्यावर व्हायचा.
इराकबरोबरचे युद्ध सुरु झाल्यापासून एका महिन्याच्या आतच खरेतर संपले होते. पण युद्ध संपल्यानंतरचा नरसंहार अभ्यासला तर एक देश पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या प्रयत्नांच्या खुणा नक्की सापडतील. बहुदा इराकच्या मध्यम वर्गाला जो शिक्षित आहे, बुद्धिवादी आहे आणि व्यावसाईक आहे अशा पूर्ण वर्गाला नेस्तनाबूत करण्याचे वेगवेगळे प्रकार इराक मध्ये आजही चालु आहेत हे दिसते. विशेषत:शिक्षण क्षेत्रात आणी वेगवेगळ्या विद्यापीठांशी संबंधित काम करणा-या मध्यम वर्गीयांना उध्वस्त करणारी आकडेवारी अंगावर शहरा आणणारी आहे. हत्या करण्यात आलेल्यात ५०% प्राध्यापक आहेत, १२% डीन आहेत, २% कुलगुरू वा उपकुलगुरू आहेत, ६% अन्यान्य विभाग प्रमुख, ६% सह प्राध्यापक आणि १३% शिक्षण क्षेत्राशी संबंधित बुद्धिवंत आहेत. शिक्षण क्षेत्रच मोडकळीला आणण्याचा एक कट दिसतो. २००३ सालच्या आधी इराक मधली १००% मुलं शाळेत जायची युद्ध संपल्यावर तीन वर्षे उलटून गेल्यावर म्हणजे २००६ साला पासून पस्तीस लाख मुलांपैकी खच्चून ३०% मुलं प्राथमिक शाळेत जातात. सतरा वर्षावरील सुमारे २५% युवा विद्यार्थी परीक्षा देऊ शकले. २००३ सालानंतर सुमारे ७०० प्राथमिक शाळा बॉम्ब फेक करून उध्वस्त केल्या गेल्यात, २७०० शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, ७४% शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय आजही नाही.

इराकची आजची एकूणच आरोग्य व्यवस्था भयानक आहे. नोंदणीकृत सुमारे १८ हजार डॉक्टरां पैकी सुमारे २५% डॉक्टर गेल्या दहा वर्षात इराक सोडून निघुन गेले. उर्वरित पैकी २५० डॉक्टरांना पळवून नेण्यात आले आहे आणि त्यांचा आजतागायत पत्ता नाही. अल जझीराचा जगप्रसिद्ध पत्रकार दहेर जमाईल याने इराकचा प्रवास करून आल्यावर १५ मार्च २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात प्रत्यक्षात युद्ध संपले असले तरी युद्धाने इराकला तहहयात रुद्र तांडव करणा-या अनेक जीवघेण्या बाबींचा शाप दिला आहे असे म्हटले आहे. कॅन्सर हा एक अत्यंत खतरनाक शाप. युद्धात प्रचंड मोठ्या प्रमाणात विषारी अस्त्रे वापरली गेली त्यातही मुख्यत: डीप्लीटेड युरेनियम आणि व्हाईट फॉस्फरस हे अत्यंत विषारी आणि दूरगामी परिणाम करणारे पदार्थ वापरले गेले. त्यांचा परिणाम हिरोशिमा आणि नागासाकी पेक्षा कितीतरी भयानक आहे. इराकच्या फ़ल्लुजह भागात झालेले आणि
होणारे जनुकीय नुकसान हे आजवर मानवी जीवनात झालेले सगळ्यात ज्यास्त नुकसान आहे. मिशिगन विद्यापीठात संशोधन करणा-या डॉ मोहघन बाईंचे म्हणणे आहे की बॉम्बिंग आणि गोळीबाराचा अति वापर झालाय इराक मध्ये त्यामुळे पारा, युरेनियम आणि शिसे या विषारी धातूंचा प्रचंड फैलाव बसरा आणि फ़ल्लुजह झालाय. पण लोक पुन्हा त्याच भागात आपले बस्तान बसवायचा प्रयत्न करत आहेत. आज या भागात कॅन्सरचे प्रमाण चाळीस पटीने वाढलंय. महिलांमध्ये प्रचंड गर्भपाताचे प्रमाण वाढलंय. शारीरिक विकृती असलेली संतती जन्माला येण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढलंय. या भागात सहाशे करोड विषारी गोळीबारूद ओतले गेले आहे !

गेल्या दहा वर्षात पंधरा लाख इराकी जनता मारली गेली. त्यात सुमारे निम्म्या स्त्रिया आणि जवळ जवळ पाच लाख लहान मुले मारली गेली. इराक मध्ये सुस्थितीत जगणा-या कुटुंबाना रेशनचे धान्य मिळवण्यासाठी आज मारामारी करावी लागते. प्रत्यक्ष हल्ल्याच्या आधी पंधरा दिवस ६ मार्च २००३ रोजी बुश साहेबांनी मोठी आरोळी ठोकली होती की इराकी जनतेच्या अन्नपाण्याची आणि औषधाची जबाबदारी अमेरिकेची असेल, आम्ही त्यांना सर्वकाही पुरवु. पण प्रत्यक्षात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज आणि मलनिस्सारण व्यवस्था या बाबी इराण मध्ये आज स्वप्नवत आहेत. नोकरी करणा-यां पेक्षा नोकरी नसलेली जनता जास्त आहे. एके काळी बघदादच्या रस्त्यावरून स्वत:च्या गाडीतून फिरणा-या महिलेचे उर्वरीत सगळे कुटुंब आणि मालमत्ता उध्वस्त झाल्यामुळे जगण्याचे साधन म्हणून तिला वेशा व्यवसाय करावा लागतो. महिलांना घरात सुद्धा सुरक्षित रहाता येत नाही. आधी आम्ही फक्त सद्दामचा मुलगा उदयला घाबरायचो. आज प्रत्येकाची भीती वाटते असे तिथल्या महिलांचे म्हणणे आहे. घटस्फोट आणि बाल विवाहांचे प्रमाण प्रचंड वाढलंय. इराक आज विधवांचा आणि घटस्फोटीतांचा देश आहे.एकूण महिलांच्या दहा टक्के महिला युद्धामुळे झालेल्या विधवा आहेत. एसटी बस सारख्या चाके असलेल्या घरांमध्ये या विधवांना एकत्रित कोंबून आपले दैनदिन जीवन कंठावे लागते. २००८ साली बुश साहेबांवर बुट फेकणारा पत्रकार ” मी हा मारा इराकी विधवांच्या वतीने करतो आहे” असे ओरडला होता. त्या पत्र्याच्या गाडी मध्ये राहणारी नोरीया खलफ़ म्हणते “मला काही ही करून लग्न करायचे आहे. मला नवरा हवा आहे आणि माझ्या मुलाला बाप !”

सुधीर मुतालीक

Leave a comment

Filed under Uncategorized

नही, इंडियन !

…. रझाने मला  लॉबीसमोर हॉटेल च्या मेन गेट जवळ सोडलं आणि गाडी पार्क करायला गेला. त्याची ही सवय आहे. गाडी पार्क करून पुन्हा परत येतो. आतमध्ये लिफ्ट पर्यंत येतो आणि तिथे गुड नाईट म्हणुन परत जातो. त्यामुळे गाडीतून उतरून त्याची वाट बघत थांबलो. आजूबाजूला आज प्रचंड संख्येने गाड्या लागल्या होत्या. त्यात पुष्कळ गाड्या पोलिसांच्या आणि त्याहून थोड्या कमी काळ्याशार चकचकीत मर्सिडीज ! मर्क्स वर सात आठ वेगवेगळ्या देशांचे छोटे झेंडे लावलेले. मला अंदाज आला, आज काहीतरी मोठा कार्यक्रम हॉटेल मध्ये असणार. …. आज सकाळीच जाताजाता रझाला मी म्हटलं होतं की पाचशे रूम्सचे एवढं टोलेजंग हे हॉटेल आहे.  पण काल अगदी सुनसान होतं. फारसे लोक दिसले नाहीत. त्याआधी बऱ्यापैकी गर्दी होती, पण काल अचानक सगळी जनता गायब. रझा गाडी पार्क करून तेवढ्यात येताना दिसला. मी  लॉबीकडे जायला निघालो. मेनगेट मधून किंचित आत सरकताना रझाला ऐकू जाईल एवढ्या आवाजात किंचाळलोच ! … Reza, what the hell is this ? आत जाताना प्रचंड सिक्युरिटी !!! बाय द वे, रझा माझा इथला म्हंजे इराणमधला सगळा व्यवसाय सांभाळतो. इराणी जनता सॉलिड प्रेमळ. कष्टाळु. आजकाल जरा भेदरलेली. रझा एकदम गुणी बाळ आहे…… नशीब त्या सिक्युरिटीवाल्यांनी अंगावरचे कपडे तेव्हढे बाकी ठेवले. झाडून सगळे चेक करत होते. सामान सुमानासह बेल्ट, बूट, पाकीट आदी सगळं एक्स रे केलं ! आत रझाने चौकशी केली. आणि मला सांगितलं. उद्या रविवारी त्यांचे नवे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांचा शपथविधी कार्यक्रम आहे. त्यासाठी आलेल्यातले आठ देशांचे राष्ट्राध्यक्ष आज हॉटेल मध्ये उतरले होते. पाकिस्तानचे झरदारी ही त्यात होते. त्यांच्या बरोबर त्यांचा सगळा लवाजमा. म्हटलं बोंबला. जातायेता हे अंगावरनं हात फिरवत राहणार आणि हॉटेलमध्ये मोकळेपणाने फिरूही  देणार नाहीत.

रूममध्ये निवांत झाल्यावर मेलामेली करावी म्हणुन आयपॅड उघडले, पण वायफाय ची मुदत संपली होती. इथे वायफायचे कुपन घ्यायला हॉटेलच्या आयटी विभागात प्रत्यक्ष जावे लागते. कुढत गेलो. शिक्कुरीटी मेली होतीच. इकडूनच जा. तिकडून नको. वगैरे. आयटी डीपा. मध्ये एकजण त्याच्या कॉम्प मध्ये गुगल सर्च उघडायचा प्रयत्न करत होता. त्याच्या बरोबर एका टेबल भोवती आणखी दोघे बसले होते. कुठल्यातरी अवघड पण हिंदी मध्ये ते संभाषण करत होते. मी माझे कुपन घेतले आणि आणि परतायला निघालो. जाताना मला त्यांची गुगल उघडण्याची केविलवाणी धडपड बघवली नाही. मी त्यांच्या जवळ गेलो आणि सरळ ऑफर दिली.

” क्या मै आपकी कुछ मदद करू ? ”

एक बोला ” हा, यारा ये ग्गुगल नई, ओपण होरा ”

लग्गेच दुसऱ्याने प्रश्न फेकला ” क्या आप भी पाकीस्ताण से हो …?”

” क्या मै आपको पाकिस्तान का लगता हुं ?…. ( माझी ती ही थोडी किलकिली जागी झाली होती, अस्मिता !)

कुणीच काही बोललं नाही. ते तिघे किंचित अवघडल्या सारखे.

त्यांची कुचंबणा डुबवण्यासाठी मी थोडं हसत ” आपका नेबर हु ”

“इंडिया से हो आप” हा झरदारी साहेबांच्या विडीयोवर त्याच्या कॉम्पवर काहीतरी काम करत होता .

“आप हमीद अन्सारी साहब के साथ आये हो क्या …? भारतचे उपराष्ट्रपतीही आल्याचे समजले !

मी मुद्याला हात घातला ” इराण में गुगल नही चलता. यहां गुगल पुरी तरहसे बंद है. जीमेल भी नही चलेगा  ”

तिघे ही एकदम ढूस झाले.

एकजण दुसऱ्याला ” अब फिर …?”

मै बोला ” आपको सर्च मारना है तो, याहू देखो ना. ”

मी त्याना याहू उघडून दिलं. त्याना जे सर्च मारायचं होतं ते मिळालं.

तिघे जाम खूष.  ” दो घंटे से लगे हुए थे जनाब. मसला हल नई हो रहा था. आपणे हमे हल्का कर दिया ” उपकृत झाल्याचा  भाव तिघांच्या चेहऱ्यावर .

“आप हमीद अन्सारी साहब के साथ आये हो क्या …इंडियन डेलिगेशण  के साथ ? पुन्हा तोच प्रश्न.

“नही. मै धंदे के लिए आया हु.कुछ दिनोके लिए हॉटेल मे रुका हु ” त्यांना एकदा सांगून टाकले.

“हम जी पाकीस्ताण टीवी से आये है. पि टीवी. हमारे प्रेसिडेंट साहब के साथ आये है”

” आपका स्टाईल बडा चंगा है जी. मत्थे के बाल उडाये हो और बड्डी काली मुछछे … ” हा आता उतराई होण्याचा थोडा प्रयत्न एकाने केला, जो आत्ता पर्यंत बोलला नव्हता. मी हसलो.

आणखी एक प्रयत्न …. “अच्छा आपको मंत्री साहब भी आये है, उनके साथ फोटो निकलवाणी है ?

इंटरेस्टिंग. मै बोला ” कैसे ?”

अरे साहब, आपके दूरदर्शनवाले आये है, वो अपने जिगर है. वो खुशिसे मदद करंगे जी.

मै बोला ” काघज  और कलम है आपके पास ?”

( त्यांच्या स्टाईलने अगदी घशाच्या खाली जाऊन अन्ननलिकेतून कागज मधला “ग” काढताना  बाहेर येई पर्यंत त्याचा “घ” झाला होता. पण ठीक आहे. पाकिस्तानच्या  “ध” चा “मा” करण्याच्या वृत्ती पुढे हे काहीच नव्हते. )

” हांजी” खरच एक जण कागद पेन घेऊन सरसावला.

“हा लिखिए” मी सुरु झालो. ” रूम नंबर 1402″

“इतने उपर रहते है आप ?” पी टीवी

मै बोला ” हा, सबसे उप्पर ”

हसला.

“अब मेरा नाम लिखिए सुधीर मुतालीक ”

“हांजी, मिस्टर सुधीर …. ”

“जी नही, मिस्टर नही …”

“क्या जी …? क्यो जी …… ?

“मिस्टर नही, श्री सुधीर मुतालीक, ऐसे लिखो ”

तो बुचकळ्यात. मला समजले. त्याला मी “श्री” लिहून दिलं.

” ओक्केजी, आपको मेसेज भिजवा देंगे आपके रूम मे, कब निकलवा सकते है आप फोटो ”

फिर मारा मैने धोबी पछाड. मै बोला,

“जी मुझे मेसेज मत दिजिए.”

तो पुन्हा बुचकळ्यात

“मेसेज हमारे मिनिस्टर साहब को दिजिए. भारत का एक उद्योजक श्री सुधीर मुतालीक यहां आये है, इराण में. इराण में आके वो आपणा धंदा करते है. अगर मिनिस्टर साहब को श्री सुधीर मुतालीक के साथ फोटो निकलवानि है, तो वो अपने रूम में आज शाम के साडे सात बजेसे साडे आंठ बजे तक उपलब्ध होंगे …… ”

“वल्ला, क्या आटूडुट है जी, सरकार ” एकजण  वेडा झाला होता.

मै बोला ” अटीट्युड नही, इंडियन !”

Leave a comment

Filed under Uncategorized

बायकांचे करिअर !!

 
                                                 पन्नास टक्क्याचे आरक्षण हा विषय कधी सुरु झाला हे मला माहिती नाही. कदाचित खुप जुना असेल. पण जोरदार चर्चा व्हायला लागली तेव्हा समजला. पण वैयक्तिक मी माझ्या साठी माझ्या कंपनी मध्ये हा निर्णय खुप आधी म्हणजे हा निर्णय ऐरणीवर येण्या आधी करून टाकला होता. हा निर्णय सामाजिक बांधिलकी मधून वगैरे अजिबात आला नव्हता, हे कबुल करतो.  व्यवसायाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी, मुलांबरोबर काही मुली मुलाखतीला आल्या. तुलनेने चांगल्या म्हणजे सबंधित कामासाठी आवश्यक सर्व गुण असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याना संधी मिळाली. काम उत्तम करू लागल्या. आणखी काही मुली कंपनी मध्ये आल्या. मुले ही आली. काही वर्षांनी जाणवण्या इतका फरक दिसायला लागला. ” स्कोर काय झालाय ? सचिनच्या किती ? किती मतांनी आपला उमेदवार पुढे आहे ? शुक्रवारी कुठे ‘बसायचे’ ?  पक्याची “लाईन” लाऊन देण्यासाठी खलबत कधी करायची ? ……..वगैरे असल्या भानगडी मुलींच्या बाबतीत नव्हत्या. हे जाणवायला लागलं. हेही जाणवायला लागलं की अवलंबून किंवा विसंबून  राहू शकू अशा कंपनीतल्या व्यक्तिंमध्ये मुली अग्रक्रमाने पुढे आहेत. माझ्या डोक्यात आजवर नसलेला लिंगभेद असा घुसला. आणि काही पदांसाठी फक्त मुलीच घ्यायच्या असा निर्णय कंपनीच्या फायद्या साठी घेतला गेला. त्यामुळे आज करोडो रुपयांची खरेदी, करोडो रुपयांचा हिशोब, करोडो रुपयांच्या प्रकल्पांची तांत्रिक बाजू तपासून त्यांचे विक्रीच्या किमती ठरविणे, आलेल्या अश्या ऑंर्डेर्सचे अचूक अंदाज पत्रक तयार करून प्रकल्प संपेतो पर्यंत त्यातल्या नफ्याकडे बारीक लक्ष्य ठेऊन नफा मिळविणे – खरेतर अंदाजापेक्ष्या ज्यास्त नफा कंपनीला मिळवून देणे अशी अनेक म्हंजे तंत्रज्ञान आणि अर्थ या सारख्या सर्वात महत्वाच्या खात्यांमध्ये माझ्या कंपनीत बायका नेतृत्व करतात. सर्वात महत्वाचे सत्य असे की माझा वारू बेफाम अन्यान्य ठिकाणी उधळलेला असतो, उदाहरणार्थ असे लेख वगैरे लिहायला मला वेळ मिळतो कारण माझ्या कंपनीची दुसरी संचालक माझी बायको आहे. कॉस्ट अकौंटंट आहे. त्यामुळे व्यवसायाची आर्थिक बाजू प्रचंड क्षमतेने आणि अचूक ती सांभाळते. त्यामुळे मला व्यावसाईक टेन्शन गेले अनेक वर्षे अक्षरश: शून्य. व्यवसायातल्या अनेक घडामोडीविषयी आवश्यक असणारा आर्थिक सल्ला मला आयता मिळतो, हवे तेव्हा. शेवटी व्यवसाय म्हणजे फक्त अर्थ, बाकी सगळे अर्थ उभारणी साठी !! त्यामुळे अर्थ खातेच जर पराकोटीच्या जबाबदारीने सांभाळले जात असेल तर माझा वारू उधळण्या व्यतिरिक्त करू काय शकतो ? 
                                                                कार्यस्थळी अफाट क्षमता असलेल्या बायकांच्या बाबतीत काही वेळा मात्र कधी कधी  विचित्र खरे तर मला भीषण चीड आणणारा अनुभव येतो आणि मी बायकांनाच त्या साठी जबाबदार धरतो. गेल्या वर्षी मला माझ्या व्यवसायातल्या एका विभागासाठी ‘General Manager’ पदासाठी उमेदवार हवा होता. महिला उमेदवार असावा अशी अट नव्हती. पण ज्या कंपनीने आमच्यासाठी काही उमेदवार निवडले त्यात दोन पुरुष आणि दोन महिला उमेदवार होत्या. त्यातल्या दोन महिला आणि एक पुरुष उमेदवारांशी मी प्रत्यक्ष्य अर्धा अर्धा तास फोन वर बोलून मुलाखत घेतली. त्यातून एक महिला आणि एक पुरुष निवडले. दुसऱ्या फेरीच्या मुलाखतीनंतर ती महिलाच पास झाली. तिच्याशी आणखी एक प्रदीर्घ गप्पा मारण्याचा निर्णय मी घेतला. एका आठवड्याने बाई आल्या. उत्तम प्रोफाईल होते. दणदणित शिक्षण. इंग्रजी वर प्रभुत्व.    वय सुमारे पंचेचाळीस. इंडस्ट्रीमध्ये मला आवश्यक असणा-या क्षेत्रात प्रदीर्घ आणि प्रचंड अनुभव. कामाच्या ठिकाणी नेतृत्व केल्याच्या खुणा. वगैरे. मी खुष. कारण मला हवा तसा उमेदवार मिळाला. सर्वात शेवटी मी त्या बाईंच्या पगारा विषयी अपेक्षा विचारल्या. त्यांनी मला जो आकडा सांगितला तो माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होता. त्यामुळे मी तीन मिनिटात मान्यता देऊन विषय संपविला. दोनेक दिवसात नेमणूकी संदर्भातील पत्र कंपनी कडून बाईना गेले. बाईंचा चार दिवसांनी फोन. भेटायला यायचे आहे. मला वाटले. पगाराविषयी त्यांचा अंदाज चुकला असणार. त्यामुळे पुन्हा बोलायचे असेल. बाई आल्या. केबिन मध्ये आल्या. बसायच्या आत त्यांनी मला सांगितलं मिस्टर आलेत आणि त्याना काही तुमच्या सोबत बोलायचे आहे. त्याना आधी मी बसायला सांगितलं. मग विचारलं. ” काय बोलायचं आहे त्याना ?” त्या म्हणाल्या हेच कामाविषयी !!! मी जबरी ओशाळलो. म्हटलं मला कामा विषयी जे बोलायचे आहे “ते गेल्या तीन भेटीत तुमच्याशी बोललो आहे, त्याचा तुमच्या नव-याशी काय संबंध ?”
” नाई सर. सगळं मान्य आहे. पण प्लीज. पाच मिनिटं वेळ द्या.
मी नाईलाजानं हो म्हटलं.
तो बाबा आला. नमस्कार चमत्कार झाला. तो काय करतो हे त्याने सांगितलं. कंपनी काय काय करते हे विचारलं. बाबा सल्लागार आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांना गुणवत्ते विषयी सल्ला देतो. पुढे तो बोलू लागला ” मला हिने सांगितले हिच्यावर मोठी जबाबदारी द्यायचे तुम्ही ठरविले आहे. आम्हाला आनंद आहे. पण मला काही बोलावे असे वाटले म्हणुन मी आलो. आमची ही जरा तापट आहे. शीघ्रकोपी आहे……….” मी कानाला खोटा खोटा मोबाईल लावला आणि माझ्याच केबिन मधून त्याची बडबड चालू असताना सटकलो. केबिन बाहेर बसलेल्या मदतनीसाने मी सांगितलेला निरोप त्याना दिला. ” साहेबांना तातडीचा फोन आलाय आणि दुस-या युनिटवर जावे लागले. तुम्हाला पुन्हा बोलावू. “
त्याच दिवशी बाईंची नेमणूक रद्द केल्याचे पत्र बाईना पाठवून दिलं.
                                                     गेल्या आठवड्यात मी एका पोर्टलवर एक आयटी संबधित वरिष्ठ उमेदवार शोधत होतो. नाशिकमध्ये नोकरीसाठी “आयटी” मधला कुणी उमेदवार ज्याला किमान पंधरा वर्षाचा अनुभव आहे असा मिळणं जरा अवघडच. पण मिळाला. बाई आहेत. सतरा वर्षे TCS मध्ये कामाचा अनुभव. सध्या वास्तव्य नाशिकमध्ये. नोकरी नुकतीच सोडलेली. जबरदस्त अनुभव. एकच मोबाईल नंबर होता, बायोडाटावर. लगेच मोबाईल वर फोन लावला. तो मोबाईल नंबर होता, बाबाचा. बाईंच्या नवरोबाचा. त्याला मी माझी ओळख करून दिली. फोन करण्याचे कारण सांगितले. बाईंचा बायोडाटा नेटवर पाहिल्याचे सांगितलं. त्याने मलाच दहा प्रश्न विचारले. तो फोन नंबर बाईंचा नव्हता. बाबाचा होता !! म्हणजे आधी हा सर्व ठीकठाक आहे का पाहणार आणि मग ठरविणार बायकोला तिकडे पाठवायचे की नाही ते! अहो त्या बाई आयटी इंजिनियर ! सतरा वर्षे इंडस्ट्री मध्ये काम केल्याचा अनुभव. त्याना कुठे नोकरी करायची याचा डायरेक्ट निर्णय घेता येत नाही ?
                                                 बायका असे वागतात ? मला इथे येणारे म्हंजे अंगावर धावून येणारे उत्तर माहिती आहे. ” त्या नाई अश्या वागत. त्यांचे नवरे, पुरुष त्यांना धाकात ठेवतात !!, वगैरे वगैरे तत्सम ….मला चीड याच उत्तरांची आहे. एव्हढं त्या नवऱ्याला घाबरण्यासारखं किंवा धाकात राहण्यासारखं त्यांच्यात म्हणजे नव-यात -काय असतं ?  इतक्या शिकलेल्या, अनुभव असलेल्या, कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात?  करिअरच्या बाबतीत त्याना स्वत:चे स्वातंत्र्य का अबाधित ठेवता येत नाही? शैक्षणिक, वैचारिक आणि आर्थिक क्षमता असणा-या बायका नव-या वर इतक्या अवलंबून का असतात ? सगळ्या नसतील. पण खूप संख्येने असतात. बायकांची करिअरची संकल्पना कुटुंबाला आधार अशीच असते का ? म्हणजे ज्याला आधार द्यायचा त्यालाच पहिली प्रायोरिटी असेच का असते ? असे असायला हरकत नाही पण कुटुंब अनेक जणांचे बनते ना ? ” रजा पाहिजे. मुलाची तब्येत ठीक नाही. पुन्हा सहा महिन्यांनी त्याच कारणासाठी पुन्हा हीच रजा घेते. या खेपी नवरा का नाही? परवा पुणे आकाशवाणीवर विविध भारती मध्ये कुणीतरी डॉ संजय उपाध्ये  गळा काढून एक अनुभव सांगत होते. एक आई मुलीला पाळणा घरात सोडून जात होती. मुलीचा केवीलवाणा चेहरा पाळणा घराच्या खिडकीतून यांना दिसला. जो ते कित्येक दिवस म्हणे विसरू शकले नाहीत. मुलीला आई पाहिजे होती. पण आई नोकरी करणारी. म्हणजे आई मुळे पोर केविलवाणी होते. पण यांनी बापाचा उल्लेख भाषणात नाही केला. म्हणजे बाबाने नोकरी करायची हे अध्यहृत! २०१२ साला मध्ये पुण्या सारख्या ठिकाणी आकाशवाणीवर अशी भाषणे लावतात कशी ? बरे त्यांच्या भाषणा आधी निवेदन एका बाईने केले होते, म्हणजे निवेदिकेने !!!   घरी प्रसंगी बंड करायचे धाडस कार्यालयात वाघीण असणा-या बायकां कडे नसते का? काही ठिकाणी तर नव-या पेक्षा ही ज्यास्त कमविते. पण तरी म्याव असते. माझी एक मैत्रीण आर्कीटेक्ट आहे. स्वत:चा व्यवसाय करते. यांचा व्यवसाय असा असतो की त्याना संध्याकाळी किमान आठ वाजे पर्यंत कार्यालयात चर्चे साठी थांबावेच लागते.  संध्याकाळी कंत्राटदार रिपोर्टिंग करायला येतात किंवा नोकरदार गि-हाइके सल्ले मागायला येतात वगैरे. हिची कमाई नव-या पेक्षा बक्कळ ज्यास्त आहे. नवरा नोकरी करतो. तो सात वाजता घरी येतो. ही साडे सहाला घरी. कारण नव-याला तव्या वरची गरम पोळी लागते !!! कमाईपेक्षा कौटुंबिक आनंद महत्वाचा, नाती महत्वाची, तो तिचा निर्णय आहे वगैरे  अशा टिपिकल चर्चा मला फडतूस वाटतात. त्यात किती खरे पणा असतो याची मला शंका आहे. बायकांनी करिअर विषयीची संकल्पना आता तरी बदलली पाहिजे असे वाटते.जमेल तितकी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नोकरी किंवा घरी बसुन  वेळ जात नाही म्हणुन टाइमपास करण्या साठी नोकरी याच्या पलीकडे जाऊन स्वत:चे व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, त्याला झळाळी देण्यासाठी, निर्मितीचा धोधो आनंद मिळविण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वत:च्या क्षमतेची ओळख होण्यासाठी …….. का नाई ?
 

                                           

1 Comment

Filed under Uncategorized

झेब्र्याने गिळले उंटाला !!!

जून महिना तेच छान पावसाचे दिवस आणि शाळेची खरेदी. दरवर्षीची जून महिन्याची अगदी ठरलेली सुरुवात आहे. अगदी आपल्या लहान पणा पासून. गणवेश, वह्या, पुस्तकं, बूट मोजे , कंपास पेटी या सगळ्या ठरलेल्या पदार्थांची खरेदी. कधी कधी याच सामना बरोबर रंग पेटी सुद्धा- बाबांचे बजेट असेल तर नाई तर सप्टेंबर चे आश्वासन घेऊन शांत व्हायचे. रंग पेटी वा अन्य एखाद्या मागणीवर शांत करायला आणखी छान उपाय वापरला जायचा तो कंपास पेटीच्या brand चा. कॅम्लिन ची कंपास पेटी घेऊ या. असे म्हणता क्षणी बाकीच्या मागण्या विरघळून जायच्या. कॅम्लिन ची पेटी तुलनेने इतर पेट्यापेक्षा महाग असायची, त्यामुळे सुरुवात दुस-या कोणत्यातरी पेटीच्या खरेदीने व्हायची. पण कॅम्लिन ची कंपास पेटी हे एक पदक असायचे . त्यामुळे शाळेत ती एक पदक म्हणूनच मिरावायचो. कॅम्लिनचा शालेय जीवना पासुनच मनावर एक खोलवर एक ठसा उमटुन गेलाय. तो कॅम्लिनच्याच खोडरबरने अशात:ही न पुसला जाण्यासारखा आहे. आता बाप झाल्यावर मुलांच्या शाळेच्या चर्चा करताना , त्यांच्या शालेय सामानाची खरेदी करताना साहजिकच पिवळ्या रंगावर केशरी पट्टा असलेल्या आणि उंटाचे चिन्ह असणाऱ्या कंपास पेटी कडेच वळायला होतं. आणखी एका कारणांनी कॅम्लिन हे पदक गेल्या काही वर्षापासू वाटायला लागलं होतं. कॅम्लिन उद्योग समूह म्हणून. एक उद्योजक म्हणुन मला स्वत:ला कॅम्लिन कडे बघताना अभिमान वाटायचा. अभिमान विशेषत: याचा की कॅम्लिन हा एक मराठी उद्योग समूह आहे . सुरुवातीच्या कालावधी मध्येच नव्हे तर स्थिरस्थावर झाल्यावरही मलाच काय सगळ्याच उद्योजकांना काही ना काही समर प्रसंगाना सामोरं जावं लागतं. या प्रसंगातून फक्त आणि फक्त स्वत:लाच मार्ग काढावा लागतो. अशावेळी काही उद्योगांचा जवळून केलेला अभ्यास उपयोगी पडतो. त्यामुळे case studies म्हणुन अभ्यास्याला कॅम्लिन वा किर्लोस्कर यांच्या सारखे उद्योग समूह अधिक जवळचे – मराठी म्हणुन. काकासाहेब दांडेकरांनी पोटापाण्यासाठी १९३१ साली सुमारे ऐशी वर्ष पुर्वी गिरगावातल्या एका चाळीत शाई बनवून विकण्याचा उद्योग चालू केला. त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ नानासाहेब दांडेकर ही होते. कॅम्लिन हा ब्रांड जन्माला आला १९९४५ साली. त्या नंतर हा व्यवसाय सतत वाढत गेला. दांडेकरांच्या तीन पिढ्यांनी या व्यवसायाचा भार बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलला होता. देशभरातल्या सहा कारखान्यांमार्फत त्यांची आगे कूच चालु होती. पण आता कॅम्लिनला जागतिकीकरणाच्या रेट्यात होणारे सोस कदाचित झेपत नसतील. विशेषत: मला कॅम्लिनची संशोधनाची बाजु कमकुवत वाटते. आज स्पर्धा जीवघेणी आहे. वर्षानुवर्षे संशोधन करून बाजारात आणलेल्या उत्पादनाचे बाजारातले आयुष्य एखादे वर्ष किंवा अगदी काही महिनेच असू शकते. त्यामुळे उद्योग जिवंत ठेवण्यासाठी अन्य उत्पादने वा बाजारातून नामशेष होणाऱ्या उत्पादनाची पुढची आवृत्ती लगेच वाजत गाजत उतरवावी लागते. किंबहुना आपले आजचेच उत्पादन उद्या आपल्या एका सुधारीत उत्पादनाने नामशेष करावे लागते. आपल्याकडून जर ही खबरदारी घेतली गेली नाही तर स्पर्धक त्याच्या खेळीनी आपले उत्पादन मारायला तयार असतोच. जशी ही प्रत्यक्ष्य स्पर्धेची तलवार सतत उत्पादकांच्या मानेवर असते तशी एक आणखी भीषण स्पर्धा हल्ली उत्पादकांना सतावत असते. ही स्पर्धा म्हणजे अंधारातली लढाई असते. समोर कोण असेल कशामुळे आणि कुठून घाव बसेल हे सांगताही येत नाही. उदाहरणार्थ सकाळी आपल्याला उठवणाऱ्या गजराची घड्याळे घ्या. एका घड्याळे बनविणाऱ्या ‘अ’ उत्पादकाने घड्याळेच बनविणाऱ्या “ब” उत्पादकाच्या घड्याळाहून वरचढ गुणवत्तेची घड्याळे सतत बाजारात आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले , पैसा खर्च केला तर “अ” घड्याळे ज्यास्त विकली जातील ही साधीसरळ प्रत्यक्ष स्पर्धा झाली. आता भीती अशा प्रत्यक्ष स्पर्धेची नाही. आज गजर लावायला घड्याळाकडे जातो कोण? आपण गजर mobile वर लावतो ना! आपल्याला स्पर्धक म्हणुन बाजारात mobile फोन वापरले जातील याची कल्पनाही घड्याळ उत्पादकांना आली नसेल. कॅमेराचे ही तसेच. जगात सगळ्यात ज्यास्त कॅमेरे mobile उत्पादक बनवितात !!!! लिखाणाच्या , स्टेशनरीच्या बाजारात अशीच भीषण स्पर्धा आहे आणि आता ती जागतिक स्तरावर आहे. या स्पर्धेमध्ये टिकाव लागण्यासाठी प्रचंड भांडवलाची ही आवश्यकता असते आणि त्याही पेक्ष्या अधिक प्रमाणात लागते ती टिकून राहण्याची विजीगिषु वृत्ती आणि प्रचंड हिम्मत. या तीनही बाबतीत कॅम्लिनने हार मानली हे मराठी उद्योगाचे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या कॅम्लिनचा बळी गेला असेल. कॅम्लिन ही कंपनी जपानच्या कोकुयो कंपनीला मे महिन्याच्या अखेरीस विकली गेली. एक सामान्य मराठी नागरिक म्हणुन ही बाब धक्कादायक आहे आणि एक उद्योजक म्हणुन मला खंतावणारी आहे. युरोप, अमेरिकेतल्या कित्येक कंपन्या शंभर वर्षे जुनी कंपनी, दीडशे वर्षे जुनी कंपनी अशी बिरुदावली छातीवर मिरवतात. आणि हजारो, लाखो कोटींची उलाढाल करतात. मोटारींपासून कोक पर्यंत अगदी जॉकीची अंतर्वस्त्रे बनविणाऱ्या कंपनी पर्यंत कित्येक उद्योग शंभराहून अधिक वर्षे जुने आहेत. उलाढालीमध्ये जरी नसेल पण वय आणि ब्रांड या दोनहीच्या स्पर्धेत कॅम्लिनसारखी एखादी जुनी कंपनी मराठी झेंडा हातात घेवून उभी असावी असे मनोमन वाटत असताना मध्येच त्यांनी आपले हात पाय गाळुन बसावे हे क्लेशदाईच आहे. पण कॅम्लिनवाले म्हणतील की कंपनी आमची, उत्पादने आमची आम्ही काय करायचे ते आमचे आम्ही ठरवू ना! बाकीच्यांनी वैयक्तिक मामल्यात लुडबुड करायचे काही कारण नाही. हेही खरच म्हणा. कायद्याने आम्हाला त्यांच्या निर्णयावर भाष्य करण्याचाअधिकार नाही .पण माणसाच्या आयुष्यात फक्त कायदाच नसतो ना. बालपणीच ज्या ज्या म्हणून कशात आपण गुंततो , ते सगळेच आयुष्य भर आपल्याबरोबर राहते, एक उबदार आठवण म्हणून. आणि प्रचंड भावनिक गुंतवणूक झालेली बाब विरळ वा अदृश्य होणे असह्य होते. जरा संतापजनक बाब आहे ती अशी की एका बाजूला स्वदेशीची कास धरत कॅम्लिन हा उद्योग एका परदेशी कंपनीच्या घशात घातला गेलाय. ज्या जपानी कंपनीला कॅम्लिन शरण गेली ती १०५ वर्षे वयाची जुनी कंपनी आहे. म्हणजे कॅम्लिन पेक्षा सुमारे पंचवीस वर्षे च जुनी. आदरणीय काकासाहेब दांडेकरांनी चाळीमध्ये शाई बनविण्याचा उद्योग सुरु केला तसाच कोकुयो कंपनीचे संस्थापक कुरोडा यांनी अगदी छोट्या स्तरावर त्यांच्या घरामध्ये फाईली बनवायला चालु केल्या होत्या. कॅम्लिन ची उलाढाल आज सुमारे साडेतीनशे कोटी रुपये असेल तर जपानी कोकुयो कंपनीची वार्षिक उलाढाल पंधराशे कोटी रुपये आहे. आज दांडेकर कुटुंबीय जरी चेअरमन आमचाच असेल असे सांगून भारतीयांचे सांत्वन करीत असले तरी त्यांचा वाटा अल्प आहे आणि चेयरमनची अवस्था ही लगान चित्रपटा मध्ये कुलभूषण खरवंदा यांनी रंगविलेल्या “राजा” सारखी असणार का अशी शंका आहे. एका वृत्तपत्राने स्पष्ट लिहिल्याप्रमाणे कोकुयो कंपनी त्यांचा झेब्रा ब्रांड बाजारात आणेल आणि कॅम्लिनचा उंट हळूहळू गायब होईल. काकासाहेबांनी आधी त्यांचे चिन्ह घोडा ठरविले होते असे म्हणत्तात. पण उंट जसा पाणी धरून ठेवतो तशी फौंटन पेन शाई धरून ठेवतो म्हणून कॅमेल ब्रांड हा पुढे आला. त्या पुढे Camel आणि Ink हे शब्द मिसळून त्यांनी Camlin हा ब्रांड तयार झाला. पण आता आगामी पिढ्या या समृद्ध आणि उद्योग समूहाची चर्चा करतील ती फक्त त्या उंटाच्या जीवाश्माच्या…आधारे, कारण काळाच्या ओघात कॅम्लिनचा उंट कदाचित विस्मृतीत गेला असेल.

Leave a comment

Filed under Uncategorized