बिल्लेकर

“….अप्पांनी खास तुमाला आमंत्रन द्याय सांगतलय. नक्की याच.”

सकाळी सकाळी अतुलराज चा फोन. जरा धक्काच. अप्पांच्या एकसष्ठीचा मोठा सोहळा करायचे ठरलंय. त्याचे आमंत्रण करत होता.
” अरे पण अप्पा तयार झाले कसे ? जरा आश्चर्यच वाटतंय. ”
“हा दादा, कमाल झाली खरी. गावाच्यानी या एळी पार हट्ट केला. शेवटी हुकमी एक्का गाठला. ताईसाकड गेले. ताईसा हो म्हणली. म्हणली करू. म्हणली मी मनौते अप्पास्नी.अप्पा म्हणले कुनी राजकारनी नको मंचावर तर तयार हुईल. ताईसा हो म्हणली. मग काय दिवाळीच.कारकान्याच्या मैदानवच ठुलाय पोग्राम. नक्की याव.”
ताईसा अप्पांची धाकटी मुलगी. वय असेल ३२ च्या आसपास. पण अख्ख्या गावची ताई. सोलापुरच्या मेडिकल मध्ये MBBS झाली. आणि पुण्यात बीजेला MD. लग्न ठरलं मुंबईच्या डॉक्टरशी. त्याला हिने पहिल्याच भेटीत अट घातली. मला गावाकडेच राहून लोकांची सेवा करायचीय. तिकडे येणार असाल तर लग्न करेन. अप्पाना तिने अशी अट घालणे आवडलं नव्हतं असं म्हणतात. पण मुलगा भला माणूस. मुंबई सोडली. तिच्या बरोबर गावात राहिला. दोघेही आज पंचक्रोशीतल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करत असतात. ताईसा अप्पांइतकीच सेवाभावी. कणभर सरसच. अप्पांचे अतिशय लाडकं कोकरू. अप्पांचा प्रचंड जीव तिच्यावर. अप्पा एक महान सहकारसम्राट. गावचा विकास हा एकमेव ध्यास. परिसराच्या विकासासाठी तीसेक वर्षापूर्वी आधी साखर कारखाना चालू केला. मग डेअरी, शाळा, बरच काही. राजकारण आणि राजकारणी यांच्या पासून पूर्ण अलिप्त. आता तर कारखान्याचे चेयरमनपदही सोडलंय. आत्ताचा चेयरमन भरतासारखा त्यांच्या खुर्चीवर न बसता कारखाना चालवतो. इतका मान. खरेदीच्या मिटिंग मध्ये माझे प्रेझेन्टेशन झाले. सहा सात वर्षे झाली असतील. पांढरे शुभ्र धोतर आणि कडक स्टार्च केलेली गांधी टोपी घातलेला हा इसम खाडखाड इंग्रजीत प्रश्न विचारात होता. आणि एकदम नेमके प्रश्न. उगीच शोमनशिप नाही.बेहद्द प्रेमात पडलो. तेव्हा पासून आज तागायत आमच्यात व्यावसाईक सबंधापलीकडले छान नाते निर्माण झाले. गेल्या तीनेक वर्षात गावाकडे येऊन भेटणे जमले नव्हते. आज छान योग जुळून आला. गाव इतकं छान नटल होतं की मीठ मोहरी फिरवून दृष्ट काढावी. रांगोळ्या, पताका, तोरणं. वाजंत्री. उत्सवच ! कार्यक्रम मस्तच झाला. अगदी देखणा. ताईसाच्या बोलण्याने सारा गाव हेलावला. तरुण वयात केवढी समज, केवढी प्रगल्भता! मांडवातच जेवणाच्या पंगती बसल्या. सुटातले, बुटातले सगळे मांडी घालून बसले. भात.मटकीची उसळ. गोडाला बुंदी. बेत एकदम फक्कड. अप्पानी सदरा काढला. बंडीवर बुंदीचा हारा घेऊन स्वत: आग्रहाने प्रत्येकाला वाढत होते. वाढताना प्रत्येकाला नावाने बोलत होते. ” कारे, बाईडीने सकाळी नुस्ते फोन वरच दंडवत घातलं. फुडल्या येळला पोरं अन तिला घेतल्या शिवाय याऊ नगो बर का.” मी म्हटलं ” हो अप्पा, नक्की.” सारे काही डोळ्याचे पारणे फेडणारे. हात धुतले. अप्पांचा, ताईसाचा, अतुलराजचा निरोप घेतला. जाताजाता कारखान्यावर चक्कर मारायची होती. निघालो. जितका अप्पांवर तितकाच कारखान्यावर माझा जीव. याच कारखान्याने पहिली ओर्डर दिली होती, उमेदवारीच्या दिवसात. त्यामुळे फुल्ल इमोशनल लागेबांधे. कारखान्यातल्या प्रत्येक माणसाशी सुद्धा. आज कारखान्यात कुणी फारसे दिसत नव्हतं. सगळे तिकडे उत्सवात दंग असणार ना!  कुणीच भेटलं नाही. डेरीकडच्या स्टोअर्सकडे जावे की नाही असा विचारच करत होतो. एकतर तिथे ही कुणी नसेल. आणि दुसरे, चालत जायला अंतर बरच होतं.  जेवण साधंच असलं तरी सॉलिड रुचकर असल्यामुळे चापून झालं होतं. त्यामुळे चढलं होतं. चालायचा कंटाळा आला होता. पण म्हटलं नको. एकतर तीनेक वर्षांनी आलोय. इथून गेल्यावर चुटपूट लागुन राहील. पुन्हा कधी यायला जमेल कोण जाणे. त्यातच अप्पांनी दम भरलाय. बाईडीला घेतल्या शिवाय येऊ नको म्हणून. त्यामुळे तिच्या बरोबर यायला कधी जमेल सांगता नाही येत. स्टोअर्सकडे जायला निघालो. इकडे नियमित यायचो तेव्हा हमखास स्टोअर्स मध्ये चक्कर व्हायची. त्यामुळे तिथले अनेक जण चांगले परिचित. आत मध्ये खरच सामसूम होतं. कुणी दिसत नव्हतं. स्टोअर्स खूप मोठ. अजस्त्रच. आत मध्ये फिरलो इकडे तिकडे. कुणी भेटतंय का शोधत. आजही तसंच राहिलंय हे. काही बदल नाही. अंधारलेलं. प्रचंड सIमान. इकडे तिकडे मशीन पार्टस. जुन्या मशिनरी. ” कोण ?” एक खोलगट, घोगरा आवाज आला मागुन. मागे चमकून बघितलं. डाव्या बाजूच्या जरा ज्यास्तच अंधारलेल्या कोपऱ्याजवळ  खोलीतून आला होता आवाज. मी झपझप पावले टाकत तिकडे गेलो. इथे तरी कुणी भेटेल. आत डोकावले तर बिल्लेकर. काम करत बसले होते. बिल्लेकरच आणि माझे एकदा चांगलंच वाजलं होतं. त्याच्यामुळे माझे एक सहा लाखाचं बिल अडकून पडलं होतं. त्याला क्वालिटी कंट्रोलची सही बिलावर पाहिजे होती  आणि क्वालिटी कंट्रोलचे काही तरी वेगळेच म्हणणे होते. माझा जीव कावला होता कारण माझे पैसे अडकले होते.
” नमस्कार, बिल्लेकर साहेब.”
“नमस्कार.” हो तोच खोलगट घोगरा आवाज.
“ओळखलं का.”
“आ, हो, या या.”
“अहो सगळी कारखान्यातली माणसं तिकडे सोहळ्यात आहेत आणि तुम्ही एकटे काय करताय इथे ?”
” हा हा हा हा ” बिल्लेकर नुसतेच हसले, मोठ्याने.
” झाली का आपांची भेट ”
मी हो म्हणालो.
” गेल्या आठवड्यात ते तुमचे मित्र आले होते. ”
” कोण हो ?” मी जरा त्रासून विचारले.
” ते हो, तुमच्या बरोबर पुण्याहून यायचे. पाईपा विकायचे ”
माझ्या चेहऱ्या वरचे भाव बदलले. कारण बिल्लेकरने थाप मारली होती.  त्याही वेळी तो मला ढोंगी वाटायचा. त्यामुळे आवडायचा नाही. पण मी आपला अडला नारायण ..
” हा तो झामरे ना ? ”
” हा, झामरे. बरोबर.तो आला होतं, गेल्या आठवड्यात.” पुन्हा साल्याने थाप मारली.
“कसं शक्य आहे, बिल्लेकर साहेब. झामरे गेल्या वर्षी नाई का दिवाळीत अपघातात वारला ?”
“नाई ओ, असं कसं ? मला कॅलेंडर देऊन गेला ना गेल्या आठवड्यात ” पुन्हा, पुन्हा माठ्याने सणसणीत थाप लगावली. मी भिंती वरती पाहिलं इकडे तिकडे. तर बिल्लेकरच्या खोलीत चक्क 2009 चे  कॅलेंडर  एका कोपऱ्यात लटकत होतं. मी मनाशीच म्हटलं याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. निघावं.
“येतो, भेटू पुन्हा”
हसला. भरल्या बादलीत तांब्या बुडवताना होणाऱ्या आवाजा सारखा हसला.
निघालो. हा बिल्लेकर अगदी तस्साच आहे हं अजुनी. कार्टून. काहीच फरक नाही. भिंगांचा चष्मा.कपाळावर भंडारा. अर्ध्याबाहीचा घाणेरडा मळका शर्ट. शर्ट ला दोन खिसे. दोन्ही खिसे चीठ्ठ्यांनी ठासुन भरलेले. बिल्लेकर खिश्यात फाईलींग कॅबिनेटच घेऊन फिरतो. मी त्याला चेष्टेने म्हणायचो. ” बिल्लेकर, येत्या दिवाळीला निरमाच्यावड्या देणार आहे, भेट वस्तु म्हणून. शर्ट धुवा पांडव पंचमी पर्यंत.” असं एकदा बोलल्यावर माझ्यावर जाम भडकला होता. पण फारसा बोलला नाई. गाडी आता चीफ केमिस्ट साहेबांच्या घराकड वळवली. गावाबाहेर त्यांच्या मळ्यात ते राहतात. छान टुमदार घर आहे. केमिस्ट काकुंशी आपली खास गट्टी होती. म्हंजे आहे. त्यांचा चहा मला फार आवडायचा. सर नाई भेटले तरी काकू भेटतीलच. बापरे, गावाबाहेर बरीच वस्ती वाढलीय. हा बंगलाही इथे नवीनच दिसतोय कुणाचा तरी. सोहळा पूर्ण संपलेला दिसतोय. मंडळी घरी परतताना दिसत होती. गाडी अंगणाशी थांबली तशी अंगणात खेळणारी एक सात आठ वर्षाची पोर घरी आत पळाली. केमिस्टकाकु बाहेर आल्या, त्या पोरी बरोबर.
” अरे, तु व्हय ! ये. कदी आलास ?”
“सकाळी. खास कार्यक्रमाला म्हणून आलो होतो. म्हटलं जाताना तुम्हाला भेटून जावं.”
“व्हय ! बरं झालं की. अन एकटा का ? सुनबाई कुटाय ?”
“नाई आली. पुढल्या खेपेस नक्की घेऊन येईन. ही पोर कोण ?”
” वळकलं न्हाईस ? अरं दादाची !”
” बापरे,  गिरीजा !  एव्हढी मोठी झाली ? ”
” व्हय”
” सर कुठायत ?”
” येत्यात, परसाकड गेल्यात. बस, च्या करते. ”
” हो ”
केमिस्ट काकुंचे  घर अगदी टापटीप. एकदम आरास मांडल्या सारखं. आजही तसंच. खुप शिस्तीच्या. सर रात्रंदिवस कारखान्यात. काकुने संसार, शेती आणि मुलं छान सांभाळले.
” हं, कायकाय आनी ?” सर आले.
“नमस्कार. मजेत आहे. तुम्ही कसे आहात ? तब्येत ?
” अजुनी धडधाकट आहे ”
” सकाळी दिसला नाहीत, सर, कार्यक्रमात ?”
” होतो की रे, फुडच्या बाजुला बस्लो हुतो. घे, च्या घे. ”
” हो. मी थोडा उशिरा पोचलो. कार्यक्रम संपल्यावर कारखान्यात गेलो होतो. चक्कर मारायला.”
” व्हय ?”
” हो, कुणीच भेटलं नाही”
” हा, सगळे हिकडच अस्नार, कार्यक्रमाला.”
” हो. डेरी कडच्या स्टोअर्स मध्ये पण गेलो होतो.”
” तिकडं आता स्टोअर्स न्हाई. ते बदललं लांब पडाय लागलं म्हुन. तिथ आता काई नाई ”
” आं .. !!
ओके. पण ते बिल्लेकर बसले होते काही काम करत. अजुनी वेडाच आहे तो. काही तरी थापा मारत होता.”
” बिल्लेकर नसेल रे, दुसरं कुनीतर असेल. पन तिथ कुनी नसल बी. ” सर थोडे वैतागून बोलल्यासारखे वाटले.
” नाई नाई,  बिल्लेकरच होता. मी ओळखतो ना त्यांना चांगला. भांडला होता तो माझ्याशी. ”
” अरे, बिल्लेकर दोनवर्षापूर्वी कारखान्यातच हार्ट फेल हून मेला. त्यो कसा ………….”

( खल्लास )

Leave a comment

Filed under Uncategorized

त्या “यो” !

काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला होणारा फायदा याचा विचार करून, ती यादी मला आधी कळवुन  वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होता. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर संबधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचलो. औपचारिकता आणि चहापान झाल्यावर मी आणि माझ्या सहका-यांनी धावत पळत जाऊन ट्रेनिंग रूम गाठली. ट्रेनिंग रूम झकपक आणि प्रचंड अद्ययावत होती. दिपुन टाकणारी!  माफक आणि निमंत्रीत लोकांनाच बसायला जागा. भराभर मी bag टेबलवर टाकुन आधी laptop काढला. भल्याभल्या ठिकाणी बहुतेक वेळेला प्रोजेक्टर, laptop आणि ऑडियो यांचा ताळमेळ न जुळल्यामुळे सुरुवातीचा वेळ ते सगळं जुळवून आणण्यात जातो आणि नंतरच्या धम्माल गतीला सुरुवातीलाच ब्रेक मिळतो. माझे सहकारी ट्रेनिंगरूम अधिका-याबरोबर वायरींची खोचाखोची करत असताना एक सुमारे पंचवीस सव्वीस वर्षाची जीन्स टी शर्ट घातलेली एकदम ” यो ” दिसणारी पोरगी हातात एक वही घेऊन धावत धावत धडकन रूम मध्ये घुसली. आल्याआल्या तिथे हजर असणा-या सगळ्यांना खाडकन प्रश्न केला –

 

Is the Program gonna start sharp at 2.30 ?

मी उत्तर दिलं. “Yes, it is,  Sharp at 2.30 !”

ट्रेनिंग अधिकारी पुढे जोडलं “Be on time”

विनवणीच्या स्वरात ती म्हणाली “ Sir, I am a mechanical engineer & I want to attend this training in any case !”

माझाशी तिचा संवाद मग सुरु झाला, मी विचारलं  “You work with which department?”

“Application Engineering, Sir”  

“Ok, if you are invited by your seniors & if your name appears in the list, you will attend.”

That’s what sir, I could not get an email to inform  about the training nor my name appears in the list displayed in the canteen.”

“Without  wasting time rush to your Department Head & convince him, if you can. I am not the person who can decide who should attend !” मी तिची बोळवण केली.

ती झपकन नाहीशी झाली. माझे सहकारी आणि तो ट्रेनिंग अधिकारी जुगाड करण्यात गुंतले होते. थोडेसे मला तिचे कौतुक वाटले. पुढे ते कौतुक वाटणे माझ्यातल्या विवेकी विचार गटांना मिळुन काही Positive चांगले तर्क काढायच्या आत माझ्या मनातील दुस-या म्हंजे अविवेकी विचार गटाने काही तयार  तर्क धडाधड पुढे करून तिची जीन्स, तिचा टी शर्ट, तिचे ते “यो” दिसणे असल्याच बाबींची टिंगल – मनातल्यामनात – केली. म्हणजे ” इतके दिवस झोपली होती का ” ” इथे काय Fashion Show  आहे का ” वगैरे ! पण मला फारसा वेळ नव्हता. तेव्हा तिचा विचार ४०-५० सेकंदानी लॉग आउट करून मी माझ्या कामाला लागलो. पहिल्या सात मिनिटात माझी ओळख आणि काही औपचारिक बाबी संपायच्या सुमारास ती “यो” धावत पळत आली. पंचविसात आठ मुली आधीच होत्या, एकत्रच बसल्या होत्या, त्यात हिने नववी बनून कसबसं स्वत:ला माववुन घेतलं. तिचं आत मध्ये येणं यापलीकडे मी फारसा विचलित झालो नाही. अगदी नकळत ‘प्रवेश मिळवला बुवा पाठ्ठीनं’ एवढंच जाणवलं. माझे बोलणे सुरु झाले, पहिल्या दीड दोन मिनिटात आभार वगैरे संपवुन विषय सुरु केला, दोनच तासांचा अवधी होता, मुद्दे बरेच होते. बेभान होऊन एकएक स्लाईड पुढे सरकवत होतो. प्रत्येक स्लाईडवर बोलत होतो. सुरुवातीच्या काही स्लाईडस संपल्यावर बोलण्याच्या ओघात जशी वातावरणातील भीड मी जाणीवपूर्वक चेपवली तसे एकएक जण माझ्याशी बोलु लागला.  सटासट प्रश्न येवु लागले होते. मला खूप धमाल येत होती. कधीतरी भानावर येवून घड्याळ बघितलं तर सुरु केल्याला पाउणे  तीन तास उलटून गेले होते. पुढल्या पंधरा    मिनिटात मी संपवले. प्रोग्राम संपल्यावरची आवरा आवर आणि भेटीगाठी वगैरेची जबाबदारी माझ्या सहका-यांवर सोपवुन मी सटकलो. भाषण संपवल्यावर किंवा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम संपवल्यावर बोलताना चढलेली ती झिंग मला जास्ती ज्यास्त अंगावर ल्यालेली आवडते. त्या बेभान अवस्थेत मला खुप वेळ राहायला आवडतं. विषयाशी संपूर्ण तादात्म्य पावल्यावर ऐकणा-यांनी त्यांची तंद्री  जर   माझ्या बोलण्याशी संपुर्ण मिळविल्याचे दिसले तर लहानपणी  निपाणीतल्या  समाधी मठात व्हायचे तसं होतं.   समाधी मठातल्या गाभा-यातला तो  ढामढीम  करणारा प्रचंड नगारा,  लहान मोठ्या त्या कित्येक घंटा आणि त्यातुनही  ऐकू येणारे आरतीचे कानडी स्वर  हे सगळे एकत्रित ऐकताना मी बेभान व्हायचो, दिवसेंदिवस रात्रोरात्र त्या आवाजांचे धोधो कोसळणे थांबू नये असे वाटायचे, खर तर त्यातल्या प्रत्येक स्वराचा उगम स्वतंत्र पणे ऐकला असता ना तर तो ओरबडणारा, चावरा असायचा. शास्त्रीय संगीताच्या अंगाने तपासाला तर प्रत्येक स्वर म्हणजे नाग-याचा, आरतीचा, घंटांचा , टाळ्यांचा  अगदी वेगवेगळ्या पट्ट्यांमधला असायचा. बेसूर वाटावा तसा. पण का कोण जाणे त्या सर्वांच्या एकत्रित आदळणा-या स्वरांनी माझी समाधीच लागायची. सॉलिड झिंग चढायची.  अगदी तशीच झिंग  असं एखादे  भाषण  दिल्यावर  येते. ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तर कहर होतो कारण सहभागी मर्यादित असतात. वीस. पंचवीस. फार तर फार तीस. चाळीस किंवा पन्नास किवा साठ डोळे आणि तितकेच कान अगदी जवळून  आपल्यावर सुरुवातीला त्यांच्या बंदुका रोखून उभ्या असतात. बंदुका अपेक्षांच्या, तिरस्काराच्या, उतावळेपणाच्या, कंटाळलेल्या वगैरे. आपला आवाज, देहबोली, माहिती, ज्ञान यांच्या माध्यमातुन त्या सगळ्या बंदुका  विरघळवून टाकण्यात आणि शेवटी समोरच्या सगळ्यांना भजनी लावण्यात भलती झिंग असते.  ती झिंग अंगावर चढते. आणि अशावेळी त्या समाधी अवस्थेत काही तरी दृष्टांत होतो. त्याच विषयातला किंवा काहीतरी  एकदम वेगळाच शोध  लागतो. किंवा लक्खकन एकदम  वीज चमकावी  तसे काही तरी सुचते, म्हणजे काहीही सुचते. अशा धोधो अवस्थेत मी लिफ्ट मध्ये उभा राहिलो. अगदी सुदैवाने एकटाच होतो. लिफ्ट चे  “G” दाबलं.  लीफ्ट खाली सरकायला लागली. आणि अचानक एक चेहरा डोळ्यासमोर चमकुन गेला.   मी मला थोडं, अगदी थोडंच भानावर आणुन समोर बघितलं. लिफ्ट तर पूर्ण बंदिस्त होती. काचेचे दरवाजे वा अन्य काही ज्यातून त्या त्या मजल्यावरचे दिसेलसे काही नव्हते.  कुणाचा तरी चेहरा मी बघीतला. डोक्यावरून पदर  असणारा. कोणाचा….? जाऊदे ना, मघाशी अचानक उपटला तसा एखादा अविवेकी  विचार  पुन्हा उसळी मारून वर आला असेल. या अविवेकी विचार गटांचा फार त्रास असतो बुवा. एकतर त्यांना काही चांगलंचुंगलं चालत नाही. विवेकीविचारगटांवरती यांची सतत दादागिरी चालते. आणि चांगल्या दृष्टीकोनाची प्रचंड नासधूस ते करतात. मला या अविवेकी विचारगटांचा फार त्रास होतो. आणि आगदी च्यायला नको त्यावेळी मनात उपटतात. झुरळ मारण्याचे कसं ते HIT वगैरे असते. तसं काही फुसफुस औषध पाहिजे. किंवा तशी एखादी मच्छरदाणी. जाऊदे. रेटा बाजुला जोर लावुन. झिंग उतरायला लागलीय.  तो चेहरा कुणाचा बरं ?   आणि असा अचानक समोर का आला असावा! वरती ट्रेनिंगरूम मध्ये त्या सगळ्या ललना अगदी  ” यो” होत्या. म्हंजे जीन्स, टी शर्ट वगैरे.  त्यात ही डोक्यावर पदर काय भानगड आहे  काही क्लु मिळेना त्यामुळे पुन्हा एकदा मी आपली डुबकी मारली. कैफ उतरल्यावर राहिला मात्र तो डोकीवरचा पदर. त्यात एक भर पडली होती ती कपाळावरल्या  लालबुंद मळवटाची! त्या तीन तासांची उजळणी करताना मध्येच कुठेतरी तो डोईवरचा पदर आणि आता तो लालबुंद मळवट डोळ्यांसमोर चमकुन जायचे !!!!!! शोध घ्यायचा ध्यास मनाने घेतला. खोलीतले दिवे तर कधीच बंद झालेत हे मला जरा उशिरा लक्षात आलं. एका विशिष्ट वेळी तो मळवट. हो त्या नऊ “यो” सपासप प्रश्नं विचारात होत्या आणि त्यामुळे धमाल येत होती. पण इथे तो पदर आणि मळवटचे काय ? त्या नऊ जणींचा सहभाग उठून दिसावा असावा असा होता. ज्यास्तीत ज्यास्त होता. त्यांनीच खरेतर त्या ट्रेनिंगला कमलीचा जिवंत पण आणला. च्यायला, पोरी तेही मेकॅनिकल इंजिनियर ! केवढ्या शार्प !!! जणु बाकीचे सतराजण तिथे नव्हतेच. त्या पोरीं विषयीच्या   भावना आता अभिमाना कडे झुकायला लागल्या. पंधरा मिनिटे होती त्यावेळी भानावर येऊन, खरेतर भानावर आदळून घड्याळाकडे बघितले ना, त्यावेळी एक जोरदार करंट लागुन जाग आली होती. तो करंट अभिमान, कौतुकाचे मिश्रणाने आला होता. पण त्या मिश्रणात आणखी एक धातु होता. उपकृत असल्याचा. ऋणात असल्याचा. त्या तिस-या धातुच्या शोधाच्या वेळीच तो मळवट दिसला. डोई वरती पदर दिसला. एक माउली दिसली. आणि नऊ मुली दिसल्या. माउली त्यांचा पाठ घेत होती. चिमुकल्या मन लावुन शिकत होत्या. आजचा पाठ संपला. नऊच जणींची आजची शाळा संपली. थोड्या पोरीना घ्यायला त्यांचे बाप आले होते. माउलीने त्यातल्या दोघीतिघींना घट्ट पोटाशी धरलं. बाहेर पागोटेवाला उभा होता. त्याने दोघी तिघी चिमुकल्यांना पोचवतो असे सांगितलं आणि पागोटे वाला निघुन गेला. माउली निघाली, लेकरांना घेऊन. थोडी पुढे गेली तो काय, पाठीवर नासके अंडे पडले तिच्या. तेवढ्यात पुढून धोंडा आला डायरेक्ट कपाळावर. सोबत अश्लील शिव्यांची लाखोली. माउली खंबीर पणे पुढे चालली होती. प्रचंड निर्धाराने, माझ्या लेकींना मी शिकवणार. तुम्ही मला दगड मारा. शिव्या द्या. मी सगळं सहन करीन. पण पुण्यातल्याच नाही, तर देशभरच्या माझ्या लेकी शिकल्या पाहिजेत. शिकणं ही काही तुम्हा पुरुषांची मक्तेदारी नाही. तुम्ही ही शिका. पण आम्हालाही ईतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, चाखु द्या. माझ्या समोरच्या या सगळ्या “यो” त्याच  माउलीच्याच  लेकी. बापरे  विषयाची केवढी भक्ती, ……I want to attend this training in any case ”  केवढा हा ध्यास! सावित्रीबाई एकशे त्रेसष्ठ वर्षे झाली तुम्ही तुमच्या नऊ लेकींच्या हाती पाटी पेन्सिल देवून. आणि आज त्याची फळे बघा !!  आज या नऊ “यो” क्लिष्ट तंत्रज्ञानाचा अभ्यास करू शकताहेत कारण बाई तुम्ही अंगावर चक्क दगड झेलले, नासक्या अंड्यांचा मार खाल्ला आणि पुण्यात नऊ पोरीना गमभनचे धडे दिले ! तुमच्या ऋणातून हा समाज कसा बरं उतराई होणार ? धन्य  तुम्ही, आणि धन्य तुमच्या लेकी सुद्धा. तुमच्या योगदाना शिवाय भारत एका अतिशय समर्थ मनुष्य बळाला मुकला असता!

Leave a comment

Filed under Uncategorized

सदमा

                     बडीशेप चघळत बाहेर पडलो तेव्हा रात्रीचा जवळ जवळ एक वाजला होता. नाशिक पुणे रस्त्यावर संगमनेरच्या थोडे अलीकडे असणाऱ्या या ढाब्या कडे आजवर मी कधी ढुंकून बघितलं नव्हतं. पण आज इतका वैतागलो होतो, थकलो होतो की आता गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. एक तर सक्काळी चार वाजता नाशिकहून निघालो होतो. पुण्यातले काम आटोपून पुन्हा परत निघायला उशीर झालेला. पुण्याला बहुदा आजवर चालक घेऊन जावसं वाटलं नाही. त्यामुळे मी पुण्याला आलो की चालक नाशकात ऐश करतो. आम जनता बहुतेक नाशिक पुणे रस्त्याला कावलेली असते. पण मला हा रस्ता आवडतो. फुल रोमांटिक रस्ता आहे. गेली कित्येक वर्षे चाका खालून जाणारा आणि नाकासमोरून मागे सरकणारा हा रस्ता आता इतका परिचयाचा झालाय की कोणत्याही वळणावर बाहेर गावी असल्याचे जाणवत नाही. आणि एक झाली की दुसरी खुण कधी येते या वाट पाहण्याची मजा आज ही येते. जाताना आणि येताना दोन्ही बाजूला. सोबतीला, फक्त माझ्यासाठी गाणारा राहतफत्तेह किंवा गुलामअली किंवा अभिषेकीबुवा किंवा आता आनंद भाटे. मध्ये मध्ये तोंडी लावायला अजय अतुल. सॉलिड किक !! बरोब्बर मध्ये येणारे दौलत रेस्तरां तर मजेचा कहर असतो. क्लायमॅक्स. तिथे काही खाणं, रेंगाळणं, नंतर पान, मग पुस्तकं, हे नेहमीच. सगळे दुकानदार आता परिचित असल्याने जरा टाकाटाक्या. शीण निघून जातो. आज पुण्यातूनच निघालोच उशिरा त्यामुळे दौलत मिळणं अशक्य होतं. म्हणुन या धाब्याचे पाय धरले. शी: वाईट आहे. बडीशेप पण फालतु होती. ” नयनोंको तो डसने का चस्का लगा रे ….!” राहत सुरु झाला. या वेळेला संगमनेर च्या आसपास गाड्यांवर चोर लुटारू धाडी टाकतात – असं म्हणतात. म्हंजे आपला त्याच्याशी काय सबंध ! फक्त त्यामुळे रस्ता आता सुस्साट रिकामा होता. दाल फ्रायचा एक घाणेरडा ढेकर आला म्हणुन काचा थोड्या खाली केल्या तेव्हढाच स्पीड कमी झाला. काच वर करून पुन्हा बुम्बाट सुटलो. दिवसाच्या प्रकाशाला लाजवेल असला लखलखीत प्रकाश पडतो हा आपल्या गाडीच्या दिव्यांचा. बहुतेक वेळा ट्रकवालेही त्यांचे दिवे पकपक करून आपल्याला इशारा देतात. समोर लांबपर्यंत म्हंजे दृष्टी पलीकडे रस्ता खेचला होता. सुनसान. लांब एक तांबडा स्पॉट दिसत होता. पुसटसा. असेल काही. पूर्ण डाव्या बाजूला नाही. पण अगदी मध्येच सुद्धा नाही. थोडे बाजूला. पण बऱ्यापैकी रस्त्यात. थोडे पुढे आल्यावर रिफ्लेक्टर चमकले. च्यायला. भर रस्त्यात गाडी उभी करून कुणी शूला उतरला वाटतं. काही जण अ‍ॅक्चुली बावळट असतात. बहुदा पुढले दिवे चालू आहेत. मग मागचे कसे बंद ? ऑ !! ? आपोआप माझ्या उजव्या पावलाने पाया खालची पट्टी आणखी जोरात दाबली.

“आई शप्पत………….! हा घुसलाय वाटतं !!!!
राहतला बंद केलं.
हॉर्न वाजतोय त्याचा एक सारखा. समोरून धूर येतोय. आईच्चा, हा ट्रकच्या मागे घुसलाय !!! कसा काय ?
काच्च कन्न ब्रेक दाबले. एकदम डाव्या बाजूला, जरा ज्यास्तच डाव्या बाजूला गाडी उभी केली. बाहेर पडलो आणि गाडीचे टुकटुक करून त्या लाल गाडी कडे पळत सुटलो. पण विसरलो. पुन्हा पळत मागे आलो. टुकटुक. माझी गाडी उघडली. पार्किंगचे पकपक चालू केले. टुकटुक. पण इथे त्या दोन्ही गाड्यांजवळ कुणीच कसे नाही! या पिटुकल्या लालीचा हॉर्न तर वाजतोय. ट्रकच्या मागे घुसलाय. म्हंजे ट्रक सावकाश चालला असेल. हा मागून फास्ट घुसला असेल. पण तो आहे कुठे ? पहिल्यांदा का कोण जाणे ट्रक ड्रायव्हर च्या केबिन कडे पळालो. चढलो. केबिन बंद आत अंधार. आत मध्ये कुणीच नाही. एक वाजून पस्तीस मिनिटं. उतरलो. मागे अडकलेल्या लालीकडे पळालो. लालीचा ड्रायव्हर……*****
आयचा घो !!! हा आत मध्ये काय करतोय ? ओ हलो ……!!! काय झाले ? हलो हलो. उत्तर नाही दिले. म्यला की काय !!! जे काही झालंय ते अगदी आताच झालायं. एकदम फ्रेश. काचेवर त्याच्या थाप जोरात मारली. उत्तर नाही. दगड घेतला आणि फोडली ड्रायवर शेजारची काच. काच बाजूला केली. हलो. खांद्याला हात लावला. ढकलला. त्याने मान माझ्याकडे वळवली. मायला जिवंत आहे. मग बोल्ला. जोरात.
” I am dying ………….! ” ओक्साबोक्शी. आयला फिरंगाए !! वाटत तर नाही. नाई नाई केस काळे भोर आहेत ना. मिश्या पण आहेत. म्हंजे हिंदी तर नक्की येत असेल. साला दुखाताना पण बेनी इंग्रजीत बोलतात. बहुतेक आयटीवाला असणार.
” हलो, चिंता मत करो. मैं हु ना.
पैले गाडी तो बंद करो. गाडी चालू ही रक्खा है.”
हा सॉलिड घाबरला होता. त्याची प्रचंड फाटली होती. घामाने डबडबला होता.
उधरकी काच खोलो. त्याने बटन दाबून काच खाली केली. हा. म्हंजे गाडी बऱ्यापैकी अजुनी नियंत्रणात आहे.
गाडी बंद करो ना. त्याने बंद केली. हॉर्न आपोआप बंद झाला.
पानी है क्या ? डोलला. नाही.
माझ्या गाडीकडे पळालो. पाणी आणलं. त्याला पिऊ दिलं. मला आता टेन्शन होतं त्याचे पायांचं. पाय तर गेले नसतील ? बाजूने गाड्या जात होत्या अधून मधून. ट्रक जात येत होते. थांबत नव्हते कुणी. याला डायरेक्ट कसं विचारायचं ? पाय ठीक आहेत ना ? नको. गेले असतील आणि त्याला जाणवलं तर हार्ट फेल होऊन मरायचा.
“गाडी शुरू होता है क्या देखेंगे” जरा स्टार्टर मारो. त्याने गाडी सुरु केली.
बॉस अब एक काम करेंगे. रिव्हर्स मार के गाडी पीछे लेंगे.
अरे नाई साब. एकदम माझ्यावर किंचाळला. I am dying. पुन्हा तेच तुणतुणं.
“Can you organise a crane ?”
“Crane …..!” आता मी किंचाळलो. २ वाजून दहा मिनिटं.
माझ्या डोळ्या समोर दोन वर्षापूर्वी जावळेवस्ती म्हंजे जवळजवळ संगमनेर मध्ये भर रात्री साडेनऊ वाजता एका दुचाकी वरच्या दोघांना एका ट्रकने उडवलं होतं तो अपघात आठवला. आजही थरकाप होतोय असा तो अपघात होता. तिथे कशाला हात लावायची सोय नव्हती.भयंकर अपघात होता. वेगाने मी संगमनेरच्या पोलीस ठाण्यात गेलो. पण मला प्रतिसाद देऊन घटनास्थळी पोचायला पोलिसांनी तब्बल एक तास लावला होता. भर साडेनऊ वाजता. आत्ता सव्वादोन वाजता रात्री इकडे कोण येणार.
“क्रेन मिलना मुमकिन नही है मेरे दोस्त, अगर मिलेगी भी तो काफी वक्त लगेगा यहाँ पहुँचने में.
” O God ……” पारच खचला तो !
” अरे दोस्त चिंता मत करो. मैं हुना. एक काम करो. रिव्हर्स डालो.”
त्याने नाईलाजाने रिव्हर्स टाकला.
“अब जितने जोरसे पीछे जा सकते हो उतने जोरसे पीछे जाओ.” मी त्याला समजावलं.
” मुझसे नही होगा, सर ” पोहायच्या कोच ला पोरं विनवतात ना तसे हा मला विनवत होता.
” बिवी को फोन किया ?”
बोलला ” नही ”
“क्यो ?”
“She is pregnant, Sir”
“तो उसको मिलना नही ? ”
काही बोल्ला नाही.
एक विचार आला. माझ्या गाडीला बांधून …..!
अशक्य. मला माझ्या मर्सिडीजला ओरखडाही चालत नाही आणि माझी गाडी मी या माठ्याला खेचायला अजिबात वापरणार नाही.
” चलो मारो रिव्हर्स. एक काम करो. पैले धीरे से ले लो. ”
त्याने गाडी मागे घायचा प्रयत्न केला. आणि मी ” येस्स” केलं. पाय आहेत.
“अब लेलो जोरसे. गाडी पीछे जा सकती है.”
त्याने अलगद गाडी मागे घेतली. ड्रायव्हर समोरची काच धप्पकन आत त्याच्या अंगावर मोडून पडली.
” नो प्रॉब्लम, उसको आरामसे निकालेंगे. पैले गाड़ी ट्रक से बाहर लो.”
आली एकदा गाड़ी बाहेर आली. मला कोण आनंद !!!!
त्याच्या अंगावरच्या काचा काढल्या. त्याला म्हटलं ये बाहेर. तो बाहेर आल्या वर माझी खात्रीच पडली. हा नक्की आयटीवाला आहे. म्हंजे ती ते घालतात तशी चड्डी. थोडा पातळ, जीर्ण टी शर्ट, पायात चप्पल. म्हंजे फ्लोटर्स. आणि सचिन तेंडुलकर सारखं हिंग्लिश. म्हंजे सचिन ची हल्ली एक जाहिरात येते ना, मीर्चीवर बहुदा. “लाइफ मध्ये ऑल्वेज इम्प्रोव्हमेंट पाहिजे……” मसाला पानात एखादा वेलदोड्याचा दाणा लागावा तसा मराठीचा एखादा शब्द पण पूर्ण वास मात्र उग्र वेलचीचा.” तसे शब्द सगळे इंग्रजी पण वाक्यरचना मराठी आणि एखादा शब्द मराठी.अशी सचिनची जाहिरात हल्ली वाजते आहे. हा असेच हिंग्लिश बोलत होता. त्यामुळे आयटीवाला असल्याची खात्री पटत होती.
” हलो, मैं सुधीर. सुधीर मुतालीक.”
“हाय, I am Amit Wagh ”
अरे, हा तर आईचा लेकरू निघाला. अरे पण मघाशी मी पहिल्यांदा मराठीत सुरु केल्यावर हा इंग्रजी मध्ये आणि हिंदीत का बरं घुसला.
“नाशिकचा ?”

” नाई, इन लॉज, नाशिक चे ! तिकडे चाललो होतो. वाटेत पार्क केलेला ट्रक दिसला नाही. Idiot, he has not even kept the parking lights on, you know ”
तीन वाजून दहा मिनिटं .
“बर, मित्रा आता एक काम कर तुझ्या गाडीला काही फार गंभीर प्रोब्लेम दिसत नाही. मी तुझ्या गाडीच्या पुढे हळूहळू माझी गाडी चालवतो. तु माझ्या मागे ये. हा माझा मोबाईल नंबर घे. मला ही रिंग दे. मध्ये काही अडचण आली तर मला फोन करत रहा. हा, हो आणि तु काय काम करतो ?
” आय टी इंजिनियर आहे. ”
मी mute दाबून ” येस्स ….!”
“नाशकात राहतो कुठे ? ”
“महात्मा नगर”.
“मग छान मी तुला ABB चौका पर्यंत सोबत करतो, म्हंजे अगदी घरा पर्यंत”.
गडी खुश. मध्ये मी सारखं त्याला फोन करत होतो. तो म्हणायचा ” आल इज वेल”
इप्सित चौकात पोहोचलो. सहा वाजून वीस मिनिटे.
त्याला शेवटचा फोन केला.
” मित्रा आता निघू का मी ?”
म्हटला ” हो मी आता इथून जातो. बाय. ”
संध्याकाळी निवांत वेळ मिळाल्यावर बायकोला सगळं सांगितलं.
” तु थांबलास म्हणुन बरं, नाई तर त्याचं काय झालं असतं कोण जाणे. त्याचा फोन आला दिवस भरात काही ?”
म्हटलं “नाही. झोपला असेल गं काऊन जीवाला.”
“मग त्याच्या घरच्यांचा ”
“नाही”
ही घटना घडून सात महिने झाले. त्याचा कधीच फोन आला नाही. पुण्याला जाता येता त्या घटनेची आणि आणि त्या हिरोची आठवण व्हायची. आणि उगीचच जाणवायचं की याचा फोन नाही आला. एकदा ठरवलं मीच त्याला फोन करून त्याची विचारपूस करावी. म्हंजे आपल्याला शांती लाभेल. माझ्याकडे त्याचा नंबर होताच.
रिंग केली’
तिकडून आवाज ” येस…”
” हलो अमित ?”
“Yes, Amit. Who is this …………………?”
मी फोन बंद केला.

Leave a comment

Filed under Uncategorized

A Great Karadian ….!

                                                           I can very much imagine that my Grand Grand Son say Rohan is getting a call from his client on an evening ! Call from the client to visit his office next day morning at 10 am to discuss an important order finalisation. Rohan before going to bed asks his wife – as an additional care – to wake him up  at 5.30 am. ‘Being wife’ she asks Rohan the reason for getting up an hour before the routine time. In explanation Rohan says ” I have to see a customer tomorrow for a finalisation. The customer is at MG Road in the Bharat province on the Moon. I have to leave home atleast at 7.30 am ..! Good Night.

                                                           Don’t scratch your head much. I can very well see that reaching on the moon in an hours time, in fact in a few minutes- from anywhere on the earth will be easily possible, may be after 50 years, 100 years. Laughed at me ? Hey, chill. It was not possible to reach Singapore within 5 hours in the year 1912 ! 100 years ago. In 1912 an imagination of reaching Singapore in five hours was a cause of scratching head, was a teaser, isn’t it ? On Wednesday, 4th July this year thousands of scientists from the world gathered in Geneva have given a sense to my imagination. They had a discovery. Discovery of a particle similar  (they call it “consistent”)  to that particles which have given existence to the universe. Higgs boson as these particles are called. I don’t like the other popular name. The popular name is God’s Particles. Higgs boson exist, but they can not be seen. So Higgs boson is a theoretical particle but  Peter Higgs said in 1964 that the particle was responsible for Mass. Without the particle no Gravity is possible ! And my imagination starts here, Now that they have seen Higgs Boson & may be after experiments for 50 years or may 100 years if they are successful in detaching the particle from the matter, matter can travel with the speed of light !!! Yes, then will it not be possible to reach the Moon within a few seconds ?

                                                         My imagination is not important, what is important is the relentless efforts of the entire scientific community in the discovery. The Large Hadron Collider built by the scientists at European Center for Nuclear Research ( CERN)  in Geneva itself is a miracle of this century. Without this 27 km long underground ringed tunnel with ultra complex control systems it would not have possible for the world to do the experiments. And here comes the matter of pride for all Indians and especially those who are associated with College Of Engineering Karad. I feel so proud that our friend Ms Anupama Kulkarni was one of the team members of the scientists at Geneva to contribute for this experiment. Anupama works with BARC. She did her Bachelors In Electrical Engineering in 1993 from COEK. She was deputed to work at CERN in Geneva for two years. I am happily sharing with you herewith her pictures while working at CERN, Geneva.
After the phenomenal achievement of the scientists on 4th July, Anupama wrote to me in an email :

“…..As an Indian, we all feel proud due to association of Shri Bose, but after him or Dr. Bhabha, who is next? On the horizon of particle physics, we are very small. The question  is how, as an Individual, I (every Indian) am going to change the situation? (Lack of united national feeling)………….Oh, my mail is flowing to some other direction!! (But, I couldn’t resist this) . Any news coming from LHC, I go to the same state of mind as if I am in CERN Control Centre and enjoying the all lively atmosphere forgetting EVERYTHING else and then wish “Kash, ye Bharat me kyu nahi hota?…….”

Anupama, with young scientists like you in India, I am confident one day ” Ye Bharat mein bhi Hoga”.

Here are a few pictures of Anupama :

 

Above Anupama with her colleagues at the CERN Control Laboratory

In the Underground Tunnel of LHC.

You made us all Proud, Anupama.

by Sudhir Mutalik

6 Comments

Filed under Uncategorized

उद्योगाची झिंग

अलीकडे कॅम्लिन वर कोकुयो या जपानी कंपनीने मिळविलेल्या ताब्यासंदर्भात मिपावर टाकलेल्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया मी आज ५ जुलै रोजी वाचल्या. छान, अभ्यासपूर्ण आणि खुल्या दिलाने लिहिलेल्या प्रतिक्रिया वाचुन बरं वाटलं. प्रतिक्रिया मिळण्याने उमेद वाढते. मिपावर काही मंडळी कदाचित त्यांच्या भविष्यात स्वत:चा उद्योग उभा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतील त्यामुळे त्या प्रतिक्रिये मध्ये आलेल्या काही मुद्यांचा परामर्ष घेण मला क्रम प्राप्त वाटते, कर्तव्य म्हणुन. कारण मी स्वत: उद्योजक असल्याचा उल्लेख केला आहे आणि स्वत:चा उद्योग करताना भारतीय उद्योगांचा फैलाव होण्यासाठी शक्य ती सगळी मदत करणे हे मी स्वीकारलेलं व्रत आहे. लिखाणामध्ये काही वैयक्तिक बाबींचा उहापोह होण्याची शक्यता आहे. त्या मागील उद्देश माझी स्वत:ची टिमकी वाजविण्याचा नसून फक्त माझे अनुभव आपणास लिखाणाच्या ओघात कथन करण्याचा आहे. कृपया गैरसमज नसावा. इथे सुदैवाने मला कुणीच ओळखत नाही , मीही कुणाला अगदी एकाही व्यक्तीला भेटलो नाही वा ओळखत नाही. मिपाकरांच्या identity ची अद्याक्षरे आणि लेखनातुन झालेली अभिव्यक्ती व्यतिरिक्त काही माहिती नाही, हे छान.

आज एक मस्त योगायोग आहे. ५ जुलैचा. बरोबर पंधरा वर्षापूर्वी पाच जुलै ला मी माझा उद्योग सुरु केला. माझा उद्योग हा एक संपूर्ण उद्योग आहे. म्हंजे फक्त उत्पादन किंवा फक्त विक्री किंवा अन्य कुठली सेवा असे नसून संशोधन, उत्पादन, विक्री, विक्री पश्चात सेवा, अर्थ असे सर्व विभाग एकाच वेळी धो धो कार्यरत असणारा उद्योग आहे. उद्योग सुरु करण्याचे स्वप्न तसं विद्यार्थी असतानाच बघितलं होतं. ठिणगी इयत्ता सातवीत असताना पडली होती. खेळायला एका श्रीमंत मित्राकडे रोज जायचो. बहुतेक दिवशी खांद्यावर फाटलेलेच असणा-या माझ्या सदऱ्या कडे पाहुन माझ्या मित्राची आई एकदा मित्राचा एक जुना पण व्यवस्थित इस्त्री केलेला शर्ट घेऊन आली आणि म्हणाली हा घे तुला, वापर उद्या पासुन. XXXX चाच आहे त्यामुळे तुला छान येईल. तो शर्ट न घेता मी जोरात बाहेर पडलो. त्या माउलीचा हेतु चांगलाच होता, भाबडा होता हे आज ही मी सांगू शकतो. तिचा मला कधीच राग आला नाही. पण त्या दिवशी त्या विनंती वजा आदेशाने त्या चिमुकल्या जीवाला ब्रम्हांड आठवले होते. रात्रभर हुलकावणी देणारी झोप एका अजस्त्र निर्णयाला माझ्यात प्रसवत होती आणि पहाटे चौकातल्या दर्ग्यात अजान झाली तेव्हा निश्चय झाला होता, आपण श्रीमंत व्हायचं. श्रीमंत होण्याचे स्वप्न हे त्यानंतरच्या माझ्या संपूर्ण आयुष्याचे इंधन बनलं आणि जळी स्थळी काष्टी पाषाणी माझ्यात एक धग जागवतं होतं. आयुष्यातल्या सुस्तावलेल्या वा सुखासीन क्षणात ही धग अंगाची सालट काढायची आणि उर्मी जिवंत ठेवायची. पुढे इंजीनियरिंगला असताना तिसऱ्यावर्षी श्रीमंत व्हायचे म्हंजे स्वत:चा उद्योग करायचे असा एक मार्ग सापडला आणि चौथेवर्ष संपल्यावर धगीचे रुपांतर आगी मध्ये झाले होते जी पुढे सहा वर्षे मला उद्योग सुरु होईतोवर झपाटून जायला मदत करत होती. त्या झपाटलेल्या अवस्थेत मला फक्त बेभान होऊन धावायचं एवढंच माहिती होतं. जो प्रकल्प मला सुरु करायचा होता त्याच्या विषयी मी पाहिलांदा मला एका अत्यंत आदरणीय असणाऱ्या आणि पितृतुल्य असणाऱ्या अभियंत्याला सोळा वर्षापूर्वी सांगितले त्यावेळी त्यांनी माझी जोरदार टिंगल केली होती. खरे तर टिंगल करण्यासारखेच मी वदलो होतो. ज्या प्रकल्पाच्या अगदी सूक्ष्मतम आकाराला सुमारे चाळीस लक्ष्य रुपये लागणार होते त्यासाठी माझ्याकडे एखादा हजार ही शिलकीत नव्हते. त्यांनी बऱ्यापैकी मोठी जागा लागेलसं सांगितलं होतं आणि माझ्याकडे माझी खुर्ची ठेवण्याची ही जागा नव्हती. पण माझ्या बेभान मनाला ते काय आणि कशासाठी बोलले हे ध्यानात घ्यायचे कारण नव्हते आणि एवढे प्रचंड पैसे आणि जागा लागणार म्हणुन दडपून ही जायचे नव्हते. त्यांच्या विधानानंतर एक वर्षात माझी सुरुवात झाली होती आणि गेल्या पंधरावर्षात माझा व्यवसाय शंभरहून अधिकपट वाढलाय. रुटीन कामामधून बाराव्यावर्षी पूर्ण मुक्त झालोय. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून पुढल्या भराऱ्या मारणं चालू आहे. अन्यान्य वाहनाच्या ताफ्यात मर्सिडीज तेराव्या वर्षीच आली आहे आणि उत्पादनाला उपलब्ध असणारी जागा दीडदोन एकर आहे. देशभर सेवा आणि विक्रीचे स्वत:चे जाळे विणले आहे आणि माझ्या उत्पादनाच्या स्पर्धेत असणाऱ्या विदेशी आणि भारतीय कंपन्यांच्या तुलनेत आता माझी कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लीज माफ करा, मला माझी टिमकी अजिबात वाजवायची नाही हे मी आधीच सांगितलंय आणि मी इथे कुणाला इम्प्रेस करणं शक्य नाही हे ही सांगितलंय. कारण मला इथलं कुणीच माहिती नाही. मला ज्यांना इम्प्रेस करायचे आहे आणि ज्यांच्या साठी मी प्रयत्न करतोय ते इथे मिपावर नाहीत आणि त्यापैकी कुणी इथे येणे केवळ अशक्य आहे. मला इम्प्रेस करायचं आहे इराण मधल्या एका oil कंपनीच्या अध्यक्ष्याला कारण मला त्याच्याशी ताबडतोब व्यवसाय चालू करायचं आहे. मला इम्प्रेस करायचे आहे शकिराच्या गावातल्या म्हणजे कोलाम्बियातल्या बगोटागावातल्या अलीशियाला. या अर्थतज्ञ आणि उद्योग-व्यावसाईक असणा-या अलीशियाच्या नेतृत्व कौशल्यावर मी कमालीचा फिदा असून तिने माझ्या उत्पादनांचा पसारा तिकडे वाढवावा असा तिला माझा आग्रह आहे. इत्यादी. त्यामुळे इथे मला कुणाला इम्प्रेस करायचे नाही पण हे ठामपणे सांगायचे आहे की व्यावहारिक गणितं करत व्यवसाय सुरु करता येत नाही आणि वाढवता येत नाही. उद्योग सुरु करणं, जिवंत ठेवणे आणि वाढवणं ही एक झिंग असते. इंग्रजीत ज्याला – passion – म्हणतात. डिस्ने पासुन धीरुभाईपर्यंत कोणत्याही महान उद्योजकाने व्यवसायाला कलाटणी देणारे, गगन भरारी घेणारे निर्णय व्यावहारिक गणितं मांडून घेतले नाहीत. त्या त्या वेळी त्या व्यवसायाच्या नेत्याच्या हृदया मध्ये एका विशिष्ट निर्णयाचे नगारे वाजत असतात, शेकडो घंटा आदळत असतात. त्यांना मेंदूतल्या सल्लागाराच्या चेतना जाणवतच नाहीत. असा माझा ही अनुभव आहे. निर्णय जन्माला आल्यावर जग त्याचे व्याहारिक आलेखावर विच्छेदन करत रहात. हिरकणीने बुरुजाची लांबी रुंदी मोजून मग वर जायचे ठरवले असते तर मराठी इतिहासाला हिरकणी मिळाली नसती. कुमार केतकरांच्या त्रिकाळवेध लेख मालिकेत एका माउली चा उल्लेख आहे. आपल्या तान्हुलावरून गाडीजाणार हे जाणवताच विजेच्या वेगाने येवून तिने गाडी उचलून फेकून दिल्याची एक घटना घडली आहे. ती झाल्यावर मानसोपचार तज्ञ त्या घटनेचा गेले कित्येक वर्षे आज अभ्यास करताहेत. व्यावहारिक गणित मांडत बसले की रिस्क घेता येत नाही आणि रिस्क घेता येत नसेल तर व्यवसाय करता येत नाही. नोकरी करण्या ऐवजी तेवढेच पैसे मिळवण्याचे अन्य काही तरी करणं एवढीच व्यवसाय करण्याची व्याख्या असेल तर ती उद्यमशीलता नव्हे. उद्यमशीलता ही झिंग आहे. जीवनाचा पराकोटीचा आनंद मिळवणे हा त्याचा उद्देश आहे आणि तो आनंद सातत्याने मिळावा, मिळत राहावा म्हणून त्याचा व्यवहार सांभाळावा. एवढाच त्यातल्या व्यवहाराला अर्थ आहे. उद्योग सुरु केल्यावर पैसा तसा लवकर मिळतो. हो मिळतोच. पैसा मिळतो याचे अप्रूप फार काळ रहात नाही तर त्यात होणाऱ्या निर्मितीचा कैफ धोधो चढत जातो. व्यवहार आणि ती झिंग (भावना) याचा सबंध भक्ती आणि ध्यानासारखा आहे. रामाचे सगुण रूप हे भक्तीचे निमित्त आहे ध्यानासाठी! म्हणजे मुळात मूर्ती हा हेतुच नाही. भक्ती हा ही फक्त मार्ग आहे. हेतू नाही. बहुतेक जनता मूर्ती मध्ये आणि भक्ती मध्येच अडकलेली दिसेल. “ध्यान” हा हेतु असतो. आणि एकदा का ध्यान लागलं की सगळी कडे प्रभू राम दिसू लागतो. व्यवहार हा मार्ग आहे. हेतु व्यवहार नाही. त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठीच धंदा केला जातो. तो मिळत राहावा म्हणुन व्यवहारी असायचे. कैफ महत्वाचा

( क्रमश ……)

Leave a comment

Filed under Uncategorized

सत्याग्रही……

                ‘सत्याग्रही’ मोर्चांचा वणवा पसरलाय देशभर. जल्लोष आहे. चीड आहे. उन्मादही आहे. सरकारी खजिन्यातल्या करोडो रुपये लंपास करणा-या बदमाषांच्या  बातम्या कानावरून वा डोळ्यासमोरून जाताना प्रत्येक वेळी जो संताप झाला होता आणि जो असहाय्यपणे, हतबल होऊन दाबून ठेवला होता त्याला अहिंसक मार्गाने मोकळे करण्यासाठी समस्त भारतीयांना एक नेतृत्व मिळालंय. त्यामुळे प्रत्येकाच्या कुकरची शिट्टी आपापल्या परीने होते आहे.
कालच एक मोर्चा निघाला होता. विशिष्ट व्यावसायिकांचा. मोर्चा संपला. प्रत्येकजण सुरुवात केली तिथे गेला. त्यांच्या गाड्या लावल्या होत्या, त्या घ्यायला. सगळे तिथे पोहोचल्यावर बुचकळ्यात. सगळ्यांच्याच गाड्या गायब. हुई उठली. तपास चालु झाला. कुणीतरी पोलिसांकडे वर्दी दिली. गाड्या मिळाल्या. सगळ्या गाड्या पोलिसांनी रस्त्यावरून उचलल्या होत्या. त्यांच्या कडे जमा होत्या. गाड्या अवैध पद्धतीने लावल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी उचलल्या. त्यात गैर काहीच नव्हतं. सत्याग्रहीना वाद घालायला चान्सच नव्हता. मुकाट्याने गाड्या सोडवून आणाव्या लागल्या. सत्याग्रहिनी गाड्या सोडवल्या दोनशे रुपये दंड भरून नव्हे – चिरीमिरी देऊन. जय हो !!!!! 
जनलोकपाल बिल कदाचित येईल. कायदा होईल. कारण अण्णांचा निग्रह आणि त्या निग्रहाला  असणारे नैतिक अधिष्ठान वादातीत आहे. दिपून टाकणारे आहे. आम जनतेच्या मानसिकतेच काय? आम्हाला ‘सत्याग्रहाचा’ अर्थ कळतो का? आपल्यावरही एक कठोर जबाबदारी येते हे कळलंय का? किती सत्याग्रही आईबाबांनी आपल्या अकरावीतल्या परवाना नसलेल्या सुपुत्रांकडून तो शिकवणीला जाण्यासाठी अवैधपणे वापरत असणारी फटफटी काढून घेतली?  ज्यांचा देशभर बोलबाला होतोय त्या किती युवकांकडे सत्याग्रहाचा फटफटी मोर्चा काढताना वाहनधारक परवाना होता? भ्रष्टाचाराचा अर्थ फक्त पैसे देवाण घेवाण असा लावला जाणार असेल तर कायदा किती परिणामकारक होईल? अन्य कायदे दिसतात का समाजात उतरलेले? म्हंजे ते हरामखोर डॉक्टर! पाडतात ना खून पोरींचे खुलेआम , पैशासाठी ! ती नालायक आई किंवा षंढ बाबा,  त्यांना माहिती नाई का की पोटाच्या अंकुराला  खरवडणं  अमानवी आहे, हिंस्र पणाचा कळस आहे आणि कायद्याने ही गुन्हा आहे. लाल लागला की किती सत्याग्रही इमाने इतबारे थांबतात ? पिवळा पडला की किती जण हल्ली स्वत:ला रोखतात? असे अनेक प्रसंग. अहो ही भ्रष्ट मानसिकता काय नव्याने ओळख करून द्यावी इतकी अनोळखी आहे का आपल्याला?   जागोजागी दिसते, आपल्यातही असते. कायद्याने कदाचित राजकारण्यांचे, वेगवेगळ्या सत्ताधीशांचे पैसे खाणे थांबेल पण आपल्या भ्रष्ट मानसिकतेला आपण स्वच्छ करणार का?  म्हंजे अण्णांच्या योगदानाचे मोल कमी करण्याचे पाप नाही हं मला करायचे. त्या ऋणात तर हा समाज अखंड राहील. ते बिल, त्या साठी झगडणा-या लोकांचे योगदान ही थोर आहेच. दुसऱ्या बाजुला, सत्याग्रह करून क्रांती करता येईल पण आपल्या मनाचे परिवर्तन करण्याची लढाई आपण आपल्याशी कठोरपणे लढलो नाही तर प्रत्येकाची धुलाई करायला एवढे अण्णा आणणार कोठून ?  

Leave a comment

Filed under Uncategorized

आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ….!

काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, “अरे, आज इतका उशीर का ?” त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. ” काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत ‘बसलो’ होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच  ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला.”  मी ” ओके, गुड डे.” एवढंच म्हणालो. मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं  आणि गाडी कडे सटकलो.

                            गाडीत नेमका  गुलाम अली ‘ हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पीली है ..’ ची अर्धवट राहिलेली गझल संपवत होता. त्यामुळे मित्राच्या काल पर्यंत दाटून आलेल्या कंठाची पुन्हा एकदा आठवण झाली. प्यायची तर बिनधास्त प्यायची ना. श्रावण किंवा गणपती साठी स्वत:वर बलात्कार कशाला ? दहा दिवस आधी प्लानिंग म्हंजे त्याही वेळी इच्छा झालीच असेल ना. प्यावेसे वाटले असेलच ना. आणि गणपती यायच्या आधी एकच दिवसाचा चान्स मिळाल्यावर आधीच्या महिना भराची आणि नंतरच्या दहा दिवसांची एकत्र पिऊन घ्यायची हा केव्हढा त्रास ? आणि कशासाठी ? आणि त्या दिवसांमध्ये इच्छा होऊन प्यायची का नाही ? तो एकच दिवस जो मध्ये होता त्या दिवशीच का चालते ? माझा मान्सीक त्रास असा होता की त्या महिन्यात आणि नंतरच्या दहा दिवसात असा काय फरक असतो ज्यामुळे आपल्या इच्छांचे दमन माझ्या मित्रांना करावे लागते? या श्रद्धाळू लोकांची गणितं मला कधीच कळत  नाहीत. वर्ष भर कुणाचा ना कुणाचा  असा त्रास असतोच. परवा पार्टी करू असं ठरवायचं असेल तर एकजण तरी म्हणतोच ‘ मित्रा परवा गुरुवार आहे बरं का, दत्ताचा वार आहे. दुसरा दिवस निवडा.’ श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ?

                 गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. या पिण्याच्या पार्श्वभूमीवर तर एक भारी किस्सा आहे माझ्या कडे. आमच्या गावात म्हंजे निपाणीला एक देवी असते. बहुतेक ग्राम देवता वगैरे असते. कारण ती एका किल्ल्यात असते. जुना भुईकोट किल्ला असतो. नवरात्रतात मोठा उत्सव असतो. असणारच. देवी आहे. दसऱ्याच्या पूजेला देवीला चक्क दारूचा नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य म्हंजे असं छोट्याश्या वाटीत चमचाभर वाढून नाई देत. डायरेक्ट बाटली – म्हंजे क्वार्टर – उघडतात आणि देवीच्या नाकाला लावतात. तशी पद्धतच आहे. आणि मग तिचा चेहरा भक्तांना दाखवतात. पुण्यवान लोकांना  म्हणे तिचा झिंगता चेहरा आरशात दिसतो. खूप लहान असताना मला खूप टेन्शन यायचं. कारण मला ती झिंग कधीच दिसली नाही. आता बोला.  देवाला हवी की नको ? त्याच्या समोर चालते की नाही ?
माझा त्याचा फारसा सबंध भर यौवना पासुन नाहीच. म्हंजे त्यांच्या पैकी – गणपतीआदी – कुणाचाच  संपर्क नाही, फारसा परिचय ही नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या – म्हंजे दिवाबिवाच्या – काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने  चराचर  व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही  आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना मीहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू ” चोरून” एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं.

शिर्डीच्या एका भक्ताने कमाल केली. एक सोन्याने मढवलेली शाल बनवली. किमती हिऱ्यांचा भराव असलेली.एकदम महागडी. तशी सगळी कडे बातमी फुटली. टीवी वर, पेपरात, इमेल वर दणका चालु झाला. करोडो रुपयाची शाल. भल्या भल्या भक्तांना फ़्रस्ट्रेट करून टाकलं. त्याना वाटलं हा सगळ्यात जवळ जाणार बाबांच्या. आपल्या पुढे. आपण तर फक्त चांदीचा मुकुटच चढवलाय. पण थोड्याच दिवसात गम्मत झाली.ती  सोन्याची शाल   खोटी असल्याची देवस्थानाला कुणीतरी सांगितलं. तो हिरो हे ‘प्रामाणिक’ पणे कबुल करून रिकामा झाला. मला तेच म्हणायचंय. देवावर आहे ना तुमचा विश्वास? मग तो सगळी कडे आहे हे कसं काय बुवा ही जनता विसरू शकते ? कित्येक चोरांच्या बातम्या टीवी वर वगैरे असतात ना. अमकी चादर चढवली. तमकी पूजा बांधली. या जनतेवर भ्रष्टाचाराचे, धमकी दिल्याचे वा अन्य कसले तरी हमखास आरोप कसे असतात?  त्या जेडे च्या मारेक-या चा कुठल्यातरी देवावर विश्वास होता. खून केल्यावर तो पहिल्यांदा त्या देवाला गेला असे कुठेतरी वाचलं. म्हंजे येडं कोण आहे ? जनता की देव ?
                          भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. तो एकतर नसावाच किंवा असला तर अत्यंत अकार्यक्षम म्हंजे ढिम्म असावा. कुठे दिसला नाही त्यामुळे आपण नाई त्याच्या मागे धावणार असे म्हटलं तर हमखास एक टोमणा कानावर येतो की तो पापी लोकांना दिसत नाही. हो पण माझे जाऊ द्या हो. तो असेल तर काही ठिकाणी त्याने त्याचा प्रताप दाखवायलाच हवा होता. पंधरा वीस दिवसापूर्वी असेल,  एका कार्यालयात वाट बघत मुंबईत बसलो होतो. वेळ घालवायला समोर टेबलावर पडलेला टाइम्स ऑफ इंडिया चाळायला घेतला. ती बातमी वाचायची नव्हती पण परत परत तिकडे डोळे जात होते. शेवटी डोळ्यांनी माझ्या मनाला घट्ट पकडलं आणि त्या बातमीवर घेऊन गेले. घटना मुंबईतली. एक चिमुरडी सुमारे  आठ नऊ वर्षाची. बिस्कीट आणायला घराजवळच्या दुकानाकडे उड्या मारत चाललेली. वाटेत तिचा बाप भेटला. तो हल्ली फारसा घरी नसतो. बाबा भेटल्यावर चिमुरडीला आनंद झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. तश्याच उड्या मारत ती बाबा बरोबर गेली. एक २० – २१ वर्षाच्या पोराकडे तो बाप तिला घून गेला. त्याला म्हणाला ही घे तुला. हिचे काय करायचं ते कर. त्या हरामखोर बापाला आई ने घराबाहेर काढलं होतं. कारण आपल्याच तीस वर्षाच्या पोरीबरोबर त्याला झोपायचं होतं. घराबाहेर काढलं म्हणुन तो बायकोवर चिडला होता. तिचा बदला घ्यायचा होता. तो २० – २१ वर्षाचा गुंड तिला एका स्टेशन वर घेऊन गेला. वारंवार तिच्यावर बलात्कार त्याने केला. काम झाल्यावर रुळा शेजारच्या एका नाल्यात तिला फेकून दिली. वेदनेनं बेजार झालेली चिमुरडी आक्रोश करत त्या दलदली मध्ये गटांगळ्या खाऊन मेली. मला वाचुन दरदरून घाम फुटलेला. शरीर प्रचंड थरथरत होतं. पळत फ्रेश रूम मध्ये जाऊन उलटी होते का पाहिलं. जमलं नाई. धावत गाडी कडे गेलो. बसलो. सुरु केली. लांबवर गेलो. काचा बंद केल्या जोरजोरात पाच मिनिटं. किंचाळलो. थोडा मोकळा झालो. ……. मला आकाशातला मायबाप दिसत नाही. हे मान्य. पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच.

Leave a comment

Filed under Uncategorized

Why “Sambhar Rice …” ?

                    I just love Sambhar Rice ! I can eat it any time in a day or in night. Sambhar Rice is a simple & a wonderful answer to Life’s greatest need – Hunger. You may get surprised knowing a fact                   that I never used to eat bread ( Chapati/ Roti/ Bhakari ) till I was almost 18 year old. I exclusively used live on Sambhar Rice (or आमटी भात ). I used to enjoy it a lot. It was a complete food for me & used to get full ! Apart from its taste, Sambhar Rice is easy to eat. Doesn’t take much energy to finally push it into the Tube below throat. Just taste it n Push after couple of bites !

Sambhar Rice is all about Simplicity. Taste. Need of Life . It’s  an interesting mixture of  many ingredients which make it delicious & a complete food.

I want to share my Samhar Rice with you often. I don’t expect anything in return. But I will be very happy if I get feedback from you. So please join me to have delicious dish of life, ” Sambhar Rice”! 22.6.2010

1 Comment

Filed under Uncategorized