भारतात आयटी क्षेत्रातला सेवा उद्योग बराच आधी म्हणजे १९६७ साली मुंबईत टाटांनी सुरु केला असला तरी तो चर्चेत आला आर्थिक उदारीकरणानंतरच. १९९१ ते ९४ या तीन वर्षाच्या कालावधीत तत्कालीन सरकारने काळाचा ओघ ओळखून अतिशय वेगाने पावले उचलली हे कौतुकास्पदच. त्यातही सगळ्यात महत्वाची कार्यवाही सरकारने केली ती सॉफ्टवेअर पार्क्सची निर्मिती. मुंबई, बेंगलोर, पुणे, कलकत्ता, हैदराबाद, चेन्नई अशा देशातल्या अनेक महत्वाच्या शहरात या पार्क्समधून अब्जवधी रुपयांच्या सॉफ्टवेअर्सची आणि आयटी सेवांची निर्यात सुरु झाली, लाखो लोकांना या नव्याने निर्माण झालेल्या क्षेत्रात भल्यामोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या आणि संपूर्ण देशाचे अर्थकारणच बदलून गेले. पुढे बदललेल्या अर्थकारणातून भारतीय समाजजीवन बऱ्याच अंशांनी बदलून गेले. जगण्याचे बहुतेक संदर्भ बदलले आणि दृष्टिकोनही बदलला. त्यामुळे प्रत्येक शहराला आता आयटी पार्क हवा होता. आयटी उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येक गावाला, शहराला बदलायचे होते, ‘समृद्ध’ व्हायचे होते. जनतेच्या या हव्यासाचा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारांनी उपयोग करून घेतला.

नाशिकलापण आयटी शहर होण्याचे डोहाळे सुरु झाले. त्यात गैर काहीच नाही. नाशकात मोठाले आयटी उद्योग यावेत आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा असे स्वप्न बघण्यात किंवा तशी तीव्र इच्छा असण्यात काहीच चुकीचे नव्हते. त्यामुळे २००२च्या सुमारास महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नाशिकातल्या एका कार्यक्रमात जाहीर घोषणा केली की पुण्यानंतर आता महाराष्ट्रात नाशिक माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे केंद्र होणार. नाशिककर हुरळला. मोहरला. ज्या समृद्धीचे स्वप्न आपण पहात होतो ते साकार करण्याचे आश्वासन दस्तूरखुद्द राज्याच्या मुख्यमंत्रांकडूनच आयते मिळत होते. वातावरण चैतन्यमय झाले. तातडीने काही दिवसात तिडके कॉलनीमध्ये एका मुंबईच्या बांधकाम व्यावसाय समूहाचे होर्डिंग लागले, “नाशिक, नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन.” ….
हा हा म्हणता सुरुवातीला नाशिक नाशकातच गाजू लागले. साडेसहाशे रुपये प्रतिचौरस फूट किमतीचा फ्लॅट खरेदी करण्याची तजवीज गेली दोन तीन वर्षे करणारा नाशिककर गरजवंत प्रत्यक्ष खरेदी करायला इथल्या बांधकाम व्यावसायिकाकडे गेला तर त्याला काहीबाहीच ऐकून परतावे लागले. त्याच फ्लॅटचा दर अचानक काहीच कारण नसताना तोच व्यावसायिक अकराशे रुपये प्रति चौरस फूट सांगू लागला. योगायोगाने एका वर्ष भरात कोल्हापूरच्या वास्तव्यात तशीच एक आरोळी ऐकू आली आणि साताठ महिन्यात शिवाजी विद्यापीठाच्या मागच्या बाजूला टोलेजंग घरकुलाच्या योजना तयार झाल्या. कोल्हापूरकरांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती असा दर – प्रति चौरस फुटाला तीन हजार !!
घोषणा झाल्यावर बारा पंधरा वर्षांनी नाशिक आज तरी आयटी डेस्टिनेशन वगैरे झाले नाही. गेल्या पंधरावर्षात देशभरात बहुतेक ठिकाणी झाले तेच नाशकातही झाले. जागांचे भाव वाढवून बांधकाम व्यवसायात तेजी निर्माण झाली आणि आज मितीस ती विझली. आजही काही संस्था आणि गटांना नाशिक सिलिकॉन व्हॅली होणार असल्याचे स्वप्न पडते. आयटी व्यवसायाच्या भरभराटीच्या पंधरावर्षात नाशकात आयटी व्यवसाय का बहरला नाही याचे सिंहावलोकन करताना मात्र नाशिककर दिसत नाहीत.
आयटी हा फक्त मनुष्यबळावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. एका आयटी कंपनीचा एकूण व्यवसाय हा त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक डोक्याने केलेल्या कामाचे आर्थिक मुल्याकंन असते. त्यामुळे अशी हजारो, लाखो डोकी महत्वाची आहेत. पुण्याला आयटी आयती मिळाली नाही. देशातली पहिली सॉफ्टवेअर कंपनी मुंबईत स्थापन झाल्यावर चारच वर्षांनी १९७२ साली नरेंद्र पटणी नामक अमेरिकेमध्ये कॉम्प्युटर उद्योगात काम करणाऱ्या एका उद्योजकाने आपल्या व्यवसायाचे एक कार्यालय मायदेशात भारतात थाटायचे ठरविले. आख्या देशात त्यांनी आपल्या व्यवसायासाठी पुण्याची निवड केली कारण पुण्यामध्ये असलेला आणि वाढत चाललेला औद्योगिक माहोल.
या व्यवसायाला सर्वात महत्वाचे असणारे मनुष्यबळ पुण्यात मिळणार याची खात्री असल्यामुळे स्वाभाविकपणे पुण्याची निवड झाली. पटणींनी त्यांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या उद्योगासाठी एका उमद्या तरुणाची निवड केली त्याचे नाव होते नारायण मूर्ती. पुढे नारायण मूर्तींनी त्यांच्या सहकाऱ्यांची कंपनीसाठी निवड केली ते होते गोपालकृष्णन, शिबूलाल, नंदन निलकेणी, के दिनेश, अशोक अरोरा वगैरे. पटणी कम्युटर सर्व्हिसेस या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या होती फक्त २०. पण आज भारतातल्या ज्या आयटी उद्योगाची आपल्याला साधारणपणे ओळख आहे त्या उद्योगाचे उगमस्थान ही क्रांतिकारी कंपनी आहे ज्यांनी अमेरिकेतल्या उद्योगांना भारतातून सेवा पुरविण्याचा उद्योग सुरु केला. पुढे सुमारे १९८० साली नारायण मूर्ती आणि त्यांनी निवडलेले सर्व सहकारी यांनी पटणी कंपनी एकत्रित राजीनामे देऊन मोकळी केली आणि पुण्यातच मॉडेल कॉलनी मध्ये स्वतः;ची तशीच सेवा देणारी इन्फोसिस नावाची कंपनी उभी केली. या इतिहासाची उजळणी करताना महत्वाच्या दोन मुद्यांकडे लक्ष दिले पाहिजे : एक तर भारतातला आयटी उद्योग अचानक एकदोन लाख लोकांचा झाला नाही. अतिशय हुशार आणि कर्तबगार उद्योजकांनी वीस पंचवीस लोकांना घेऊन सुरु केला आणि काही दशकांनी तो मोठा केला. दुसरी सर्वात महत्वाची बाब आयटी उद्योगाला आवश्यक असणारे मनुष्यबळ जिथे उपलब्ध आहे तिथेच तो सुरु झाला आणि बहरला. या पार्श्वभूमीवर नाशिकला आयता आयटी उद्योग का सुरु व्हावा ? आज नाशकात एकूण सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध असणारे मनुष्यबळ आहे सुमारे दीड लाखाच्या घरात. या दीड लाखात कामगार, अधिकारी, अभियंते इत्यादी सगळे आले. एकट्या इन्फोसिस कंपनीमध्ये पुण्यात काम करणाऱ्या लोकांची संख्या आहे चाळीस हजार ! ज्या आयटी डेस्टिनेशनचे स्वप्न नाशिककर बघत आहेत त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ गुणात्मक किंवा संख्यात्मक दृष्ट्या नाशकात पुरेसे नाही. नागपूर हल्ली वाढण्यासाठी किती धडपडते आहे आणि त्यासाठी असणारे पाठबळ किती आहे याचा इथे उहापोह करायची गरज नाही. पुण्यातल्या एका नामांकित आयटी कंपनीने नागपूरमध्ये आपला पसारा वाढविण्याचा निर्णय करून तिकडे आपले कार्यालय थाटले. स्वतःच्याच कंपनीतल्या हजारो लोकांना नागपूरमध्ये काहींनी विस्थापित व्हावे असे आवाहन केले, किमान कंपनीतले नागपूरकर त्या आवाहनाला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा होती. पण दीडदोन वर्षानंतर कसेबसे खच्चून पाचशे लोक तिथे आज काम करतात. तीच गोष्ट गोव्यासारख्या आकर्षक ठिकाणाची. पुण्यासारख्या ठिकाणी काही दशकांच्या तपश्चर्येने आयटी उद्योगाला आवश्यक असणारे मनुष्यबळ आज उपलब्ध आहे. त्यामुळे तिथे एकाचे चार आयटी उद्योग उभे राहू शकतात. शिवाय या उद्योगांना पूरक असणारे बाकी काही उद्योग प्रचंड मोठ्याप्रमाणात पुण्यात आहेत.
एखाद्या आयटी उदयोगाला एखाद्या नवीन प्रकल्पाची संधी मिळाली की तातडीने विशिष्ट क्षेत्रातले हजार बाराशे अभियंत्यांची आवश्यकता भासते. ते मनुष्यबळ पुरवण्याची क्षमता आज पुण्यासारख्या शहराने कमावली आहे. नाशिकने या पार्श्वभूमीवर आपली पायरी ओळखली पाहिजे आणि आपल्या आयटी डेस्टिनेशन या स्वप्नाला वास्तवाचा बांध घातला पाहिजे. नागपूर किंवा अहमदाबादला देखील बलाढ्य राजकीय पाठबळ असून देखील आयटी डेस्टिनेशन अजुनी होता नाही आले. दुर्दैवाने आयटी उद्योगाला आवश्यक असणाऱ्या सुविधांचा आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचे असणाऱ्या मनुष्यबळाचा आणि आयटी उद्योगाला आवश्यक असणाऱ्या एकूण भावविश्वाचा विचार नाशिककरानी आयटीचे स्वप्न बघताना केला नाही. फक्त विस्तृत प्रमाणावर जागा उपलब्ध असणे ही आयटी उद्योगाची गरज नाही.
नाशिकने आयटी उद्योगासाठी आकर्षक बनण्यासाठी किमान आठ दहा वर्षे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. विशेषतः मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीजचा फैलाव अधिक तगडा करावा लागेल. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ देशभरातून आकर्षित करावे लागेल. देशात आणि परदेशात सुद्धा नाव लौकिक असणाऱ्या शेक्षणिक संस्था ही पुण्याची जमेची बाजु आहे. दोन वर्षांपूर्वी IIMs ची संख्या वाढवणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला एक मिळणार असे स्पष्ट नमूद केले होते. औरंगाबादकरांनी सह्यांची मोहीम राबवली, निवेदने दिली, प्रचंड धडपड केली. पण ती घोषणा नाशिककरांच्या खिजगणतीत ही नव्हती. अशा अनेक संधीसाठी टपून बसावे लागेल. उत्तम मनुष्यबळ उभे करण्यासाठी उद्योगांनी नाशकातल्या शैक्षणिक संस्था दत्तक घाव्या लागतील. फक्त पदवीदानाचे व्यावसायिक कार्य न करता त्यांना उद्योगांना आवश्यक असणारे कुशल विद्यार्थी घडविण्याचे सामाजिक कामही करायला भाग पाडावे लागेल. छोटे आयटी उद्योग प्रयत्नपूर्वक रुजवावे लागतील त्यातूनच कदाचित उद्याचा इन्फोसिस किंवा विप्रो सारखा एखादा उद्योग जन्माला येईल. नाशिकला आयटी आयता मिळणार नाही.
©सुधीर मुतालीक,नाशिक.



नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाला घसघशीत यश मिळाले पण त्याचा फायदा करून घेण्याची संधी स्थानिक भाजप नेत्यांनी वाया घालवली. पहिला धक्का दिला तो महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीने. सध्याच्या महापौर आणि उपमहापौरांवर वैयक्तिक टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. पण इतक्या भक्कम जनाधाराचा नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांना उपयोग करून घेता नाही आला. जुन्या पुराण्या राजकारणातच ही मंडळी पूर्ण अडकलेली दिसत आहेत. मुळात देशाच्या नकाशात आता नाशिक उठून दिसेल असे काहीतरी भरीव करून दाखवू असे स्वप्नतरी यांनी बघितले असेल का याची शंका वाटते.
एका पर्यावरणवादी संस्थेने आता औद्योगिकरणाच्या आधीचे जीवनमान माणसाने जगायला सुरुवात केली पाहिजे, पैसे आणि मशिन्स ह्या जगायला अनावश्यक बाबी आहेत असे समजवणारी चळवळ सुरु केली आहे.

