नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाला घसघशीत यश मिळाले पण त्याचा फायदा करून घेण्याची संधी स्थानिक भाजप नेत्यांनी वाया घालवली. पहिला धक्का दिला तो महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीने. सध्याच्या महापौर आणि उपमहापौरांवर वैयक्तिक टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. पण इतक्या भक्कम जनाधाराचा नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांना उपयोग करून घेता नाही आला. जुन्या पुराण्या राजकारणातच ही मंडळी पूर्ण अडकलेली दिसत आहेत. मुळात देशाच्या नकाशात आता नाशिक उठून दिसेल असे काहीतरी भरीव करून दाखवू असे स्वप्नतरी यांनी बघितले असेल का याची शंका वाटते.
नवा भारत, नवे जग, युवा पिढीच्या आकांक्षा, संतुलित विकास किंवा अन्य काही विषयांची जाण तरी यांना असेल की नाही कोण जाणे. पहिल्या वर्षातच नाशिकच्या विकासाचे एखादे आकर्षक मॉडेल तयार करून ते नाशिककरांसमोर ठेवायला हवे होते. त्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी नाशिककरांना आपल्या भजनी लावायला हवे होते. त्यासाठी नाशिकमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नागरिकांच्या अनेक बैठका घ्यायला पाहिजे होत्या. ते उद्दिष्ट नाशिककरांच्या गळी उतरविण्यासाठी अखंड मेहनत घ्यायला पाहिजे होती जेणे करून पुढील चार वर्षे प्रत्येक नाशिककर त्या उद्दिष्टपूर्ती साठी वैयक्तिक पातळीवर देखील झटायला उद्युक्त झाला असता. हे सगळं फार पुस्तकी वाटत असले तरी समर्थनेतृत्वाने हेच करायचे असते. आपल्याला आज अशी काही कार्यवाही पुस्तकी वाटते हाच सद्य नेतृत्वाचा पराभव आहे. अब्राहाम लिंकन म्हणायचे “एखादा रचनात्मक मुद्दा शोधून लोकांच्या भल्यासाठी लोकांना त्या मुद्यामध्ये गुंतवून ठेवणारी व्यक्ती उत्तम लोकनेता असते.” नाशिक विषयीच्या कोणत्या अशा मुद्यामध्ये नाशिककर मनोमन गुंतले आहेत ?
मी स्वतः उद्योजक आहे. नाशकात गेली तेवीस वर्षे उद्योग करतो. मला तरी महापौर किंवा उपमहापौर यांच्या उद्योजकांबरोबर बैठका झाल्यात आणि त्यामध्ये काही महत्वाच्या मुद्यांविषयी विचार मंथन सुरु आहे असे दिसले नाही. शेतकरी, कामगार, वकील, डॉक्टर, शिक्षक, शिक्षण संस्थाचालक, चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी, इत्यादी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये गटागटाने आणि वारंवार काही विचार मंथन किंवा नाशिकच्या विकासाची चर्चा, किंवा अन्य काही जनहिताच्या चर्चा असे होताना दिसत नाही वा ऐकिवात नाही. नाशिकमधल्या किती नागरिकांना आपल्या महापौर किंवा उपमहापौरांविषयी आपुलकी आहे – त्यांचे कार्यकर्ते सोडून ? पक्षीय राजकारण सोडून ? नाशकातल्या किती युवकांना, महिलांना, नागरिकांना आपल्या महापौर आणि उपमहापौरांविषयी अभिमान वाटतो ? वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात काम करणारी मंडळी अभ्यासासाठी, व्यवसायासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी अन्य देशातल्या एखाद्या शहराच्या महापौराला नक्की भेटली असतील. बैठकीमध्ये त्या शहरात गुंतवणुकीसाठी वगैरे त्या महापौराने अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन केले असेल. त्यावर चर्चा केली असेल. अशी अपेक्षा नाशिककर आपल्या महापौरांकडून करू शकतील का ? अन्य देशातून येणाऱ्या एखाद्या शिष्टमंडळांसमोर एखादा विषय अभ्यासपूर्ण मांडू शकतील काय ? आलेल्या मंडळींमध्ये नाशिकविषयी कुतूहल निर्माण करू शकतील काय ?
स्मार्ट सिटीच्या उद्दिष्टांमध्ये नाशिकचे नागरिक कुठे आहेत ? स्मार्ट सिटीचे काय चाललंय, काय होणार हे किती नागरिकांना माहिती आहे ? स्मार्ट सिटी म्हणजे काय हे तरी किती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला आहे ? या अवाढव्य प्रकल्पामध्ये प्रत्येक नागरिकाची काही जबाबदारी आहे अशी जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची ? जाणीव -कोणतीही- जवळच्या नातलगामध्ये तरी चार सहा महिने प्रयत्न करता येते का ?
स्मार्ट सिटीचे थोडे बाजुला ठेवूया, तो भविष्यातला प्रकल्प आहे. भविष्यात जे होईल ते होईल. आजच्या नाशिकच्या समस्यांच्या बाबतीत नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरांचे कार्यवाहीचे आराखडे कसे आहेत ? उदाहरणार्थ सातपूर अंबड सारख्या संपूर्ण जगाला परिचित असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पन्नास वर्षात सांडपाण्याची निर्मिती होते हेच महानगरपालिकेला कदाचित माहिती नसावे. आश्चर्य वाटेल पण स्मार्ट होऊ बघणाऱ्या नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये इतिहासातल्या इसवी सन 2019 सालापर्यंत तरी सांडपाण्याचे विल्हेवाट लावायची सोय नाही. म्हणजे ड्रेनेज सिस्टीम नाही. इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी सांडपाण्याची विल्हेवाट लावायची व्यवस्था मोहेंजदरो आणि हडप्पामध्ये होती ! कॉलेज रोड सारख्या झगमगीत भागात रस्त्यावर फुटपाथ नाहीत. तिथे पायी चालणारी जनता फिरकतच नाही आणि सगळेच गाड्या घेऊन फिरतात असा काहीसा समज आपल्या महानगरपालिकेचा असावा. मोठ्या उत्साहाने नाशकात वेगवेगळ्या वसाहतींमध्ये महानगरपालिका बागा तयार करते. सहा सात महिन्यानंतर किती बागा या बाग म्हणून जिवंत राहतात ? नाशकातल्या अशा शेकडो समस्या नक्की सांगता येतील. पण त्या नागरिकांच्या मनात आणि वैयक्तिक चर्चेमध्ये आहेत. त्या शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी कुणाची ?
एकाच पक्षाचे सगळे – म्हणजे तीनही आमदार भाजपचे असताना आणि महापालिकेत दणदणीत बहुमत मिळून संपूर्ण सत्ता असताना, भाजपचा महापौर आणि उपमहापौर असताना देखील नाशिकमध्ये काहीच भव्यदिव्य होताना का दिसत नाहीय ? आपले नाशिक सर्वांगसुंदर करण्याचे प्रयत्न का होत नाहीत? नाशिक आपल्याआपण नैसर्गिकपणे – कदाचित पूर्वी सारखेच – का चाललंय ? इतकं सगळं नागरिकांनी भाजपला देऊन मग फायदा काय ? आजही महापालिकेच्या कामकाजाबाबत नाशिककर निरिच्छ का बरे राहतो ? की नाशिकरानी तिकडे काय चालले आहे हे बघूच नये अशीच अपेक्षा आजही आहे ? महानगरपालिका आणि नाशिककर रेल्वेचे रुळासारखे का आहेत ? भाजपमधल्या स्थानिक नेते मंडळींना हा दुरावा दूर करून लोकसहभाग तेवत ठेवावा असे का नाही वाटत ? की अजुनी नागरिक हे फक्त मतदारच आहेत असे वाटते ?
२०१४ सालानंतर देशात संपूर्ण वेगळ्या धाटणीचे राजकारण सुरु झाले आहे. आता कुठे देशात सामान्य प्रजेचे राज्य आहे असे वाटते आहे. खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक झाल्याचा फील येतो आहे. दिल्लीतला एकही मंत्री एकही पैसा न खाता देशाची सेवा करण्यासाठी काम करतो आहे अशी खात्री आता देता येऊ लागली आहे. पण दुर्दैवाने नाशकातली स्थानिक भाजपची मंडळी अजुनी जुन्याच स्टाईलच्या राजकारणात अडकली असल्याचे दिसते आहे. ज्या पद्धतीचे महापौर आणि उपमहापौर नाशिकसाठी दिले त्यावरून ते सिद्ध होतेच आहे. लोकांनी दिलेल्या जनादेशाचा काडीमात्र विचार न करता नव्या भारताला साजेसे नेतृत्व न देता अँटीचेंबर मध्ये बसून आपापल्या सोईची मंडळी पुढे केली आहेत. पुरावे जाऊ द्या. पण महानगरपालिकेत चिरीमिरी न देता घेता आपले लोकप्रतिनिधी काम करतात असे किती नाशिककर ठामपणे सांगू शकतात ?
नाशिक महानगपालिकेत स्वच्छ कारभार चालतो याची ग्वाही देणारा महापौर आम्हाला पाहिजे. नाशिककरांमध्ये तसा विश्वास निर्माण करणारा महापौर आम्हाला पाहिजे. नाशिकमध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे स्वप्न बघणारा महापौर आम्हाला पाहिजे. स्वप्नातले ते नाशिक उभी करण्याची क्षमता असलेला महापौर आम्हाला पाहिजे. नव्या भारताला साजेसा, उच्चशिक्षित महापौर आम्हाला पाहिजे. बाहेर देशीचे पाहुणे गुंतवणुकीचे प्रपोजल घेऊन आल्यावर त्यांच्याबरोबर समर्थपणे चर्चा करणारा महापौर आम्हाला पाहिजे. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन, गरीब श्रीमंत हा भेद न ठेवता समस्त नाशिककरांना आपलेसे करणारा महापौर आम्हाला पाहिजे. विज्ञानाची कास धरणारा महापौर आम्हाला पाहिजे. नाशिककरांनी अभिमानाने मिरवावा असा महापौर आम्हाला पाहिजे.
हे स्वप्न बघताना आम्हाला भाजपशी बंडखोरी नाही करायची. राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र यांचेच नेतृत्व अधिकाधिक बळकट करायचे आहे. पण या दोघांना साजेसे नेतृत्व – महापौर, उपमहापौर आणि वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले तीन ही आमदार – नाशकात असावे अशी माफक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होई पर्यंत प्रामाणीकपणे, संवादाच्या माध्यमातून झटू. आता आम्हाला बदल हवाच आहे.