आपण नालायक नाही !

एका पर्यावरणवादी संस्थेने आता औद्योगिकरणाच्या आधीचे जीवनमान माणसाने जगायला सुरुवात केली पाहिजे, पैसे आणि मशिन्स ह्या जगायला अनावश्यक बाबी आहेत असे समजवणारी चळवळ सुरु केली आहे.

मला हे खुप आततायी वाटतं. अतिरेक आहे हा. पर्यावरणवाद्यांचा रोख चुकतोय. बऱ्याचदा अतिरेकी होतोय. औद्यगिकरण झालच नसतं तर काय स्थिती असती हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. म्हणजे उदाहरणार्थ इसवी सन १७००. या सुमारास अनेक आजार ज्यावर आज सहज उपाय आहेत किंवा जे आजार आज किरकोळ वाटतात त्या आजारांनी एखादा लोक समूह वा आख्खा देश गारद व्हायचा. उदाहरणार्थ हगवण. स्वीडन मधले ९०% लोक हागवणीमुळे हालहाल होऊन या सुमारास मेले. माणसाने कावळे चिमण्या हत्ती वाघ यांच्या प्रमाणे समस्त सृष्टीचा एक घटक म्हणून जीवन व्यतीत केले असते तर सृष्टीच्या नियमानुसार ” *Lifelessness is a rule, life is an accident* ” अशी परस्थिती निर्माण झाली असती. ९०% वनस्पती जन्मून लगेच न वाढता मरण पावतात वगैरे. सिंधू संस्कृती लुप्त झाली त्यावेळी कुठे औद्योगिकरण झाले होते ? ती लुप्त होण्यामागे कारण पर्यावरणाचेच होते – अनेक वर्षे दुष्काळ ! हजारो माणसे मेली. औद्योगिकरणाने खरेतर अशा समस्यांवर उपाय शोधले. क्वचित पाऊस पडणारे किंवा पाण्याचे स्रोत दुर्मिळ असणारे लोकसमूह आज समृद्ध जीवन जगतात. एका बाजुला पर्यावरणाचा माणसाकरवी विध्वंस होतो हे मान्यच आहे. त्याला माणसातली त्याच्या उत्पत्तीपासून तगून राहिलेली रानटी वृत्ती कारणीभूत आहे. ती खूप मोठ्याप्रमाणात खरीतर शमली आहे – ते ही औद्योगिकरणामुळेच. माणसाला माणूस म्हणून जगण्याची आणि जगवण्याची मुभा यांत्रिकीकरणा नंतर जोमाने फोफावली. कारण उद्योगातून अर्थ निर्मिती करण्याची संधी मिळाली. पैसा हे विनिमयाचे साधन माणसाने शोधून नसते काढले तर गुलामगिरी नाहीशी नसती झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी आणि वितभर कपड्यासाठी पोरीबाळी माणसे आजही माणसांनीच जनावरासारखी वापरली असती. औद्योगिककरणानंतर श्रमाचे मूल्य देऊन वस्तू खरेदीकरण्याची मुभा निर्माण झाली आणि आम माणसाला माणूसपण बहाल झालं. धोके माणसातल्या आजही उरलेल्या रानटीपणामुळे आहेत. पर्यावरणाला औद्योगिकरणामुळे धोका निर्माण झाला ही ओरड काही अंशी बरोबर असली तरी त्याचे उत्तर आणि उपाय माणूस अखंड शोधतो आहे, काही शोधांमुळे त्यातले बरेच धोके टळले आहेत. इथूनपुढेही टळतील. आता माणुस हरण्यासाठी जन्माला येत नाही. जगून काही भलं करण्यासाठी जगतो. डायनासोर नाहीसे झाले ते माणसामुळे नाही. आणखी कुठले प्राणी जे आज अस्तित्वात नाहीत ते खूप पूर्वी औद्योगिकरणाच्या पूर्वी नाहीसे झाले. पण आजचा प्रगत मानव वाघ नाहीसे होऊ नयेत म्हणून अतोनात प्रयत्न करतो ना ? कुत्री आजारी पडली की पदरचे पैसे खर्च करून दवाखान्यात नेतो ना ? गेल्या अडीचशे वर्षात माणसातला माणूस जागा झालाय. छान जगायचं. मजा करायची. आपण नालायक नाही.

©सुधीर मुतालीकq

Leave a comment

Filed under Uncategorized

Leave a comment