Monthly Archives: February 2018

उध्वस्त इराक…

*उध्वस्त इराक* sudhir mutalik

२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली. १९ मार्च २०१३ रोजी म्हणजे अमेरिकेने इराकवर “इराकी जनतेला मुक्त करण्यासाठी” केलेल्या हल्ल्याला बरोबर दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या लष्कराला “इराकी जनतेला मुक्त केल्याबद्दल” सलाम ठोकला. इराकी जनतेच्या आजच्या जीवनमानाचे वास्तव काय आहे ? गेल्या वर्षी नाशिक मध्ये माझ्या ऑफिसमध्ये आलेला आणि गेली काही वर्षे परिचित असलेला एक अत्यंत कर्तबगार उद्योजक “मी आणि माझ्या कुटुंबीयांना इराकमध्ये परमेश्वराने जन्माला घालण्याऐवजी अन्य कोणत्याही देशात कुत्र्याचा जन्म दिला असता तरी चालले असते” असे धक्कादायक आणि काळीजाचा थरकाप उडवणारे विधान करताना अतिशय हताश झालेला मी बघितला. सात आठ वर्षापूर्वी अतिशय वैभव संपन्न आणि सुखासीन आयुष्य जगणा-या कुटुंबांतला हा इसम ” रोज सकाळी उठल्यावर आणि परमेश्वराच्या कृपेने उठलो तर आज झोपे पर्यंत दिवसभर सुरक्षित जगायचे एवढेच आम्ही कुटुंबीय ठरवू शकतो. अमेरिकेला आम्हाला मुक्त करायचे होते. २००३ सालच्या आधी आम्ही मुक्त नसू कदाचित पण सुरक्षित नक्की होतो. आता मुक्त झालो की नाही माहिती नाही पण आम्ही सुरक्षित नक्की नाही ! ” अमेरिकेने २००३ साली इराकमध्ये घुसखोरी केल्या नंतर इराक गेल्या दहा वर्षांत संपूर्ण उध्वस्त झालंय. या विधानात सर्वात महत्वाची बाब अशी आहे की इराक युद्धामुळे उध्वस्त झालेलं नाही. इराक, युद्धानंतर अमेरिकेने आपल्या ताब्यात ठेवल्यानंतर बेचिराख झालंय.


जवळ जवळ सदतीस हजार इराकी जनता तुरुंगात डांबली गेली आहे ज्यांच्यावर काय आरोप आहे हे कुणाला माहिती नाही किंवा कित्येक जणांवर काहीच आरोप नाही. अबू घरिब इथला तुरुंग तर छळ छावणी आहे. इथल्या बंदिवानांवर कुत्री सोडणे, बेदम मारहाण, विवस्त्र अवस्थेत ठेवणे,लैंगिक अत्याचार असे प्रकार नियमित होत आहेत. अबु घरिब मधली थरकाप उडवणारी छायाचित्रे संपूर्ण जगाने पाहिल्यावर जी खळबळ उडाली ती बघून अमेरिकेचे तत्कालीन संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफिल्ड यांनी अमेरिकी काँग्रेस समोर झालेले अत्याचार मान्य केले होते आणि आवश्यक ते बदल इराक मध्ये करू अशी ग्वाही दिली होती. अर्थात त्याचा वास्तवावर आजतागायत फरक पडला नाही आणि अत्याचार सुरूच आहेत – अमेरिकेचे लष्कर तिथून निघाले असले तरी. या ग्वाही नंतर बंदिवानांच्या तोंडात प्लास्टिकचा पाईप आत मध्ये खोचून मारहाण असे नवीन प्रकारच्या तक्रारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात प्रसिद्ध केल्या आहेत. या सुमारे सदतीस हजार बंदिवानांपैकी अर्ध्या महिला आहेत आणि त्यांची परिस्थिती आणखी भीषण आहे. हे बंदिवान आहेत कोण ? त्यांचा गुन्हा काय असतो ? चोर, डाकू , देशद्रोही , अतिरेकी ? नाही. सबाह हसन हुसेन नावाची एकेचाळीस वर्षाची महिला पत्रकार आपल्या नातेवाइकाची चोरीला गेलेली गाडी परत आणण्यासाठी गेली असता तिला २९ फेब्रुवारी २०१२ रोजी अटक झाली. तिची रवानगी तीक्रीतच्या तुरुंगात केली. सबाहची २३ जानेवारी २०१३ रोजी निर्दोष मुक्तता झाली पण तरीही तिला २८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत तुरुंगात ठेवले होते. सबाह बाहेर आली ती संपूर्ण उध्वस्त होऊन. तिच्या शरीरभर सिगरेटचे चटके होते. प्रचंड मारहाणीच्या खुणा शरिरभर होत्या. तिला विवस्त्र करून पुरुष पोलिसांसमोर उभे केले जायचे. बर्फाच्या पाण्याचा मारा तिच्यावर व्हायचा.
इराकबरोबरचे युद्ध सुरु झाल्यापासून एका महिन्याच्या आतच खरेतर संपले होते. पण युद्ध संपल्यानंतरचा नरसंहार अभ्यासला तर एक देश पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या प्रयत्नांच्या खुणा नक्की सापडतील. बहुदा इराकच्या मध्यम वर्गाला जो शिक्षित आहे, बुद्धिवादी आहे आणि व्यावसाईक आहे अशा पूर्ण वर्गाला नेस्तनाबूत करण्याचे वेगवेगळे प्रकार इराक मध्ये आजही चालु आहेत हे दिसते. विशेषत:शिक्षण क्षेत्रात आणी वेगवेगळ्या विद्यापीठांशी संबंधित काम करणा-या मध्यम वर्गीयांना उध्वस्त करणारी आकडेवारी अंगावर शहरा आणणारी आहे. हत्या करण्यात आलेल्यात ५०% प्राध्यापक आहेत, १२% डीन आहेत, २% कुलगुरू वा उपकुलगुरू आहेत, ६% अन्यान्य विभाग प्रमुख, ६% सह प्राध्यापक आणि १३% शिक्षण क्षेत्राशी संबंधित बुद्धिवंत आहेत. शिक्षण क्षेत्रच मोडकळीला आणण्याचा एक कट दिसतो. २००३ सालच्या आधी इराक मधली १००% मुलं शाळेत जायची युद्ध संपल्यावर तीन वर्षे उलटून गेल्यावर म्हणजे २००६ साला पासून पस्तीस लाख मुलांपैकी खच्चून ३०% मुलं प्राथमिक शाळेत जातात. सतरा वर्षावरील सुमारे २५% युवा विद्यार्थी परीक्षा देऊ शकले. २००३ सालानंतर सुमारे ७०० प्राथमिक शाळा बॉम्ब फेक करून उध्वस्त केल्या गेल्यात, २७०० शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, ७४% शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय आजही नाही.

इराकची आजची एकूणच आरोग्य व्यवस्था भयानक आहे. नोंदणीकृत सुमारे १८ हजार डॉक्टरां पैकी सुमारे २५% डॉक्टर गेल्या दहा वर्षात इराक सोडून निघुन गेले. उर्वरित पैकी २५० डॉक्टरांना पळवून नेण्यात आले आहे आणि त्यांचा आजतागायत पत्ता नाही. अल जझीराचा जगप्रसिद्ध पत्रकार दहेर जमाईल याने इराकचा प्रवास करून आल्यावर १५ मार्च २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात प्रत्यक्षात युद्ध संपले असले तरी युद्धाने इराकला तहहयात रुद्र तांडव करणा-या अनेक जीवघेण्या बाबींचा शाप दिला आहे असे म्हटले आहे. कॅन्सर हा एक अत्यंत खतरनाक शाप. युद्धात प्रचंड मोठ्या प्रमाणात विषारी अस्त्रे वापरली गेली त्यातही मुख्यत: डीप्लीटेड युरेनियम आणि व्हाईट फॉस्फरस हे अत्यंत विषारी आणि दूरगामी परिणाम करणारे पदार्थ वापरले गेले. त्यांचा परिणाम हिरोशिमा आणि नागासाकी पेक्षा कितीतरी भयानक आहे. इराकच्या फ़ल्लुजह भागात झालेले आणि
होणारे जनुकीय नुकसान हे आजवर मानवी जीवनात झालेले सगळ्यात ज्यास्त नुकसान आहे. मिशिगन विद्यापीठात संशोधन करणा-या डॉ मोहघन बाईंचे म्हणणे आहे की बॉम्बिंग आणि गोळीबाराचा अति वापर झालाय इराक मध्ये त्यामुळे पारा, युरेनियम आणि शिसे या विषारी धातूंचा प्रचंड फैलाव बसरा आणि फ़ल्लुजह झालाय. पण लोक पुन्हा त्याच भागात आपले बस्तान बसवायचा प्रयत्न करत आहेत. आज या भागात कॅन्सरचे प्रमाण चाळीस पटीने वाढलंय. महिलांमध्ये प्रचंड गर्भपाताचे प्रमाण वाढलंय. शारीरिक विकृती असलेली संतती जन्माला येण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढलंय. या भागात सहाशे करोड विषारी गोळीबारूद ओतले गेले आहे !

गेल्या दहा वर्षात पंधरा लाख इराकी जनता मारली गेली. त्यात सुमारे निम्म्या स्त्रिया आणि जवळ जवळ पाच लाख लहान मुले मारली गेली. इराक मध्ये सुस्थितीत जगणा-या कुटुंबाना रेशनचे धान्य मिळवण्यासाठी आज मारामारी करावी लागते. प्रत्यक्ष हल्ल्याच्या आधी पंधरा दिवस ६ मार्च २००३ रोजी बुश साहेबांनी मोठी आरोळी ठोकली होती की इराकी जनतेच्या अन्नपाण्याची आणि औषधाची जबाबदारी अमेरिकेची असेल, आम्ही त्यांना सर्वकाही पुरवु. पण प्रत्यक्षात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज आणि मलनिस्सारण व्यवस्था या बाबी इराण मध्ये आज स्वप्नवत आहेत. नोकरी करणा-यां पेक्षा नोकरी नसलेली जनता जास्त आहे. एके काळी बघदादच्या रस्त्यावरून स्वत:च्या गाडीतून फिरणा-या महिलेचे उर्वरीत सगळे कुटुंब आणि मालमत्ता उध्वस्त झाल्यामुळे जगण्याचे साधन म्हणून तिला वेशा व्यवसाय करावा लागतो. महिलांना घरात सुद्धा सुरक्षित रहाता येत नाही. आधी आम्ही फक्त सद्दामचा मुलगा उदयला घाबरायचो. आज प्रत्येकाची भीती वाटते असे तिथल्या महिलांचे म्हणणे आहे. घटस्फोट आणि बाल विवाहांचे प्रमाण प्रचंड वाढलंय. इराक आज विधवांचा आणि घटस्फोटीतांचा देश आहे.एकूण महिलांच्या दहा टक्के महिला युद्धामुळे झालेल्या विधवा आहेत. एसटी बस सारख्या चाके असलेल्या घरांमध्ये या विधवांना एकत्रित कोंबून आपले दैनदिन जीवन कंठावे लागते. २००८ साली बुश साहेबांवर बुट फेकणारा पत्रकार ” मी हा मारा इराकी विधवांच्या वतीने करतो आहे” असे ओरडला होता. त्या पत्र्याच्या गाडी मध्ये राहणारी नोरीया खलफ़ म्हणते “मला काही ही करून लग्न करायचे आहे. मला नवरा हवा आहे आणि माझ्या मुलाला बाप !”

सुधीर मुतालीक

Leave a comment

Filed under Uncategorized