बडीशेप चघळत बाहेर पडलो तेव्हा रात्रीचा जवळ जवळ एक वाजला होता. नाशिक पुणे रस्त्यावर संगमनेरच्या थोडे अलीकडे असणाऱ्या या ढाब्या कडे आजवर मी कधी ढुंकून बघितलं नव्हतं. पण आज इतका वैतागलो होतो, थकलो होतो की आता गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. एक तर सक्काळी चार वाजता नाशिकहून निघालो होतो. पुण्यातले काम आटोपून पुन्हा परत निघायला उशीर झालेला. पुण्याला बहुदा आजवर चालक घेऊन जावसं वाटलं नाही. त्यामुळे मी पुण्याला आलो की चालक नाशकात ऐश करतो. आम जनता बहुतेक नाशिक पुणे रस्त्याला कावलेली असते. पण मला हा रस्ता आवडतो. फुल रोमांटिक रस्ता आहे. गेली कित्येक वर्षे चाका खालून जाणारा आणि नाकासमोरून मागे सरकणारा हा रस्ता आता इतका परिचयाचा झालाय की कोणत्याही वळणावर बाहेर गावी असल्याचे जाणवत नाही. आणि एक झाली की दुसरी खुण कधी येते या वाट पाहण्याची मजा आज ही येते. जाताना आणि येताना दोन्ही बाजूला. सोबतीला, फक्त माझ्यासाठी गाणारा राहतफत्तेह किंवा गुलामअली किंवा अभिषेकीबुवा किंवा आता आनंद भाटे. मध्ये मध्ये तोंडी लावायला अजय अतुल. सॉलिड किक !! बरोब्बर मध्ये येणारे दौलत रेस्तरां तर मजेचा कहर असतो. क्लायमॅक्स. तिथे काही खाणं, रेंगाळणं, नंतर पान, मग पुस्तकं, हे नेहमीच. सगळे दुकानदार आता परिचित असल्याने जरा टाकाटाक्या. शीण निघून जातो. आज पुण्यातूनच निघालोच उशिरा त्यामुळे दौलत मिळणं अशक्य होतं. म्हणुन या धाब्याचे पाय धरले. शी: वाईट आहे. बडीशेप पण फालतु होती. ” नयनोंको तो डसने का चस्का लगा रे ….!” राहत सुरु झाला. या वेळेला संगमनेर च्या आसपास गाड्यांवर चोर लुटारू धाडी टाकतात – असं म्हणतात. म्हंजे आपला त्याच्याशी काय सबंध ! फक्त त्यामुळे रस्ता आता सुस्साट रिकामा होता. दाल फ्रायचा एक घाणेरडा ढेकर आला म्हणुन काचा थोड्या खाली केल्या तेव्हढाच स्पीड कमी झाला. काच वर करून पुन्हा बुम्बाट सुटलो. दिवसाच्या प्रकाशाला लाजवेल असला लखलखीत प्रकाश पडतो हा आपल्या गाडीच्या दिव्यांचा. बहुतेक वेळा ट्रकवालेही त्यांचे दिवे पकपक करून आपल्याला इशारा देतात. समोर लांबपर्यंत म्हंजे दृष्टी पलीकडे रस्ता खेचला होता. सुनसान. लांब एक तांबडा स्पॉट दिसत होता. पुसटसा. असेल काही. पूर्ण डाव्या बाजूला नाही. पण अगदी मध्येच सुद्धा नाही. थोडे बाजूला. पण बऱ्यापैकी रस्त्यात. थोडे पुढे आल्यावर रिफ्लेक्टर चमकले. च्यायला. भर रस्त्यात गाडी उभी करून कुणी शूला उतरला वाटतं. काही जण अॅक्चुली बावळट असतात. बहुदा पुढले दिवे चालू आहेत. मग मागचे कसे बंद ? ऑ !! ? आपोआप माझ्या उजव्या पावलाने पाया खालची पट्टी आणखी जोरात दाबली.
“आई शप्पत………….! हा घुसलाय वाटतं !!!!
राहतला बंद केलं.
हॉर्न वाजतोय त्याचा एक सारखा. समोरून धूर येतोय. आईच्चा, हा ट्रकच्या मागे घुसलाय !!! कसा काय ?
काच्च कन्न ब्रेक दाबले. एकदम डाव्या बाजूला, जरा ज्यास्तच डाव्या बाजूला गाडी उभी केली. बाहेर पडलो आणि गाडीचे टुकटुक करून त्या लाल गाडी कडे पळत सुटलो. पण विसरलो. पुन्हा पळत मागे आलो. टुकटुक. माझी गाडी उघडली. पार्किंगचे पकपक चालू केले. टुकटुक. पण इथे त्या दोन्ही गाड्यांजवळ कुणीच कसे नाही! या पिटुकल्या लालीचा हॉर्न तर वाजतोय. ट्रकच्या मागे घुसलाय. म्हंजे ट्रक सावकाश चालला असेल. हा मागून फास्ट घुसला असेल. पण तो आहे कुठे ? पहिल्यांदा का कोण जाणे ट्रक ड्रायव्हर च्या केबिन कडे पळालो. चढलो. केबिन बंद आत अंधार. आत मध्ये कुणीच नाही. एक वाजून पस्तीस मिनिटं. उतरलो. मागे अडकलेल्या लालीकडे पळालो. लालीचा ड्रायव्हर……*****
आयचा घो !!! हा आत मध्ये काय करतोय ? ओ हलो ……!!! काय झाले ? हलो हलो. उत्तर नाही दिले. म्यला की काय !!! जे काही झालंय ते अगदी आताच झालायं. एकदम फ्रेश. काचेवर त्याच्या थाप जोरात मारली. उत्तर नाही. दगड घेतला आणि फोडली ड्रायवर शेजारची काच. काच बाजूला केली. हलो. खांद्याला हात लावला. ढकलला. त्याने मान माझ्याकडे वळवली. मायला जिवंत आहे. मग बोल्ला. जोरात.
” I am dying ………….! ” ओक्साबोक्शी. आयला फिरंगाए !! वाटत तर नाही. नाई नाई केस काळे भोर आहेत ना. मिश्या पण आहेत. म्हंजे हिंदी तर नक्की येत असेल. साला दुखाताना पण बेनी इंग्रजीत बोलतात. बहुतेक आयटीवाला असणार.
” हलो, चिंता मत करो. मैं हु ना.
पैले गाडी तो बंद करो. गाडी चालू ही रक्खा है.”
हा सॉलिड घाबरला होता. त्याची प्रचंड फाटली होती. घामाने डबडबला होता.
उधरकी काच खोलो. त्याने बटन दाबून काच खाली केली. हा. म्हंजे गाडी बऱ्यापैकी अजुनी नियंत्रणात आहे.
गाडी बंद करो ना. त्याने बंद केली. हॉर्न आपोआप बंद झाला.
पानी है क्या ? डोलला. नाही.
माझ्या गाडीकडे पळालो. पाणी आणलं. त्याला पिऊ दिलं. मला आता टेन्शन होतं त्याचे पायांचं. पाय तर गेले नसतील ? बाजूने गाड्या जात होत्या अधून मधून. ट्रक जात येत होते. थांबत नव्हते कुणी. याला डायरेक्ट कसं विचारायचं ? पाय ठीक आहेत ना ? नको. गेले असतील आणि त्याला जाणवलं तर हार्ट फेल होऊन मरायचा.
“गाडी शुरू होता है क्या देखेंगे” जरा स्टार्टर मारो. त्याने गाडी सुरु केली.
बॉस अब एक काम करेंगे. रिव्हर्स मार के गाडी पीछे लेंगे.
अरे नाई साब. एकदम माझ्यावर किंचाळला. I am dying. पुन्हा तेच तुणतुणं.
“Can you organise a crane ?”
“Crane …..!” आता मी किंचाळलो. २ वाजून दहा मिनिटं.
माझ्या डोळ्या समोर दोन वर्षापूर्वी जावळेवस्ती म्हंजे जवळजवळ संगमनेर मध्ये भर रात्री साडेनऊ वाजता एका दुचाकी वरच्या दोघांना एका ट्रकने उडवलं होतं तो अपघात आठवला. आजही थरकाप होतोय असा तो अपघात होता. तिथे कशाला हात लावायची सोय नव्हती.भयंकर अपघात होता. वेगाने मी संगमनेरच्या पोलीस ठाण्यात गेलो. पण मला प्रतिसाद देऊन घटनास्थळी पोचायला पोलिसांनी तब्बल एक तास लावला होता. भर साडेनऊ वाजता. आत्ता सव्वादोन वाजता रात्री इकडे कोण येणार.
“क्रेन मिलना मुमकिन नही है मेरे दोस्त, अगर मिलेगी भी तो काफी वक्त लगेगा यहाँ पहुँचने में.
” O God ……” पारच खचला तो !
” अरे दोस्त चिंता मत करो. मैं हुना. एक काम करो. रिव्हर्स डालो.”
त्याने नाईलाजाने रिव्हर्स टाकला.
“अब जितने जोरसे पीछे जा सकते हो उतने जोरसे पीछे जाओ.” मी त्याला समजावलं.
” मुझसे नही होगा, सर ” पोहायच्या कोच ला पोरं विनवतात ना तसे हा मला विनवत होता.
” बिवी को फोन किया ?”
बोलला ” नही ”
“क्यो ?”
“She is pregnant, Sir”
“तो उसको मिलना नही ? ”
काही बोल्ला नाही.
एक विचार आला. माझ्या गाडीला बांधून …..!
अशक्य. मला माझ्या मर्सिडीजला ओरखडाही चालत नाही आणि माझी गाडी मी या माठ्याला खेचायला अजिबात वापरणार नाही.
” चलो मारो रिव्हर्स. एक काम करो. पैले धीरे से ले लो. ”
त्याने गाडी मागे घायचा प्रयत्न केला. आणि मी ” येस्स” केलं. पाय आहेत.
“अब लेलो जोरसे. गाडी पीछे जा सकती है.”
त्याने अलगद गाडी मागे घेतली. ड्रायव्हर समोरची काच धप्पकन आत त्याच्या अंगावर मोडून पडली.
” नो प्रॉब्लम, उसको आरामसे निकालेंगे. पैले गाड़ी ट्रक से बाहर लो.”
आली एकदा गाड़ी बाहेर आली. मला कोण आनंद !!!!
त्याच्या अंगावरच्या काचा काढल्या. त्याला म्हटलं ये बाहेर. तो बाहेर आल्या वर माझी खात्रीच पडली. हा नक्की आयटीवाला आहे. म्हंजे ती ते घालतात तशी चड्डी. थोडा पातळ, जीर्ण टी शर्ट, पायात चप्पल. म्हंजे फ्लोटर्स. आणि सचिन तेंडुलकर सारखं हिंग्लिश. म्हंजे सचिन ची हल्ली एक जाहिरात येते ना, मीर्चीवर बहुदा. “लाइफ मध्ये ऑल्वेज इम्प्रोव्हमेंट पाहिजे……” मसाला पानात एखादा वेलदोड्याचा दाणा लागावा तसा मराठीचा एखादा शब्द पण पूर्ण वास मात्र उग्र वेलचीचा.” तसे शब्द सगळे इंग्रजी पण वाक्यरचना मराठी आणि एखादा शब्द मराठी.अशी सचिनची जाहिरात हल्ली वाजते आहे. हा असेच हिंग्लिश बोलत होता. त्यामुळे आयटीवाला असल्याची खात्री पटत होती.
” हलो, मैं सुधीर. सुधीर मुतालीक.”
“हाय, I am Amit Wagh ”
अरे, हा तर आईचा लेकरू निघाला. अरे पण मघाशी मी पहिल्यांदा मराठीत सुरु केल्यावर हा इंग्रजी मध्ये आणि हिंदीत का बरं घुसला.
“नाशिकचा ?”
” नाई, इन लॉज, नाशिक चे ! तिकडे चाललो होतो. वाटेत पार्क केलेला ट्रक दिसला नाही. Idiot, he has not even kept the parking lights on, you know ”
तीन वाजून दहा मिनिटं .
“बर, मित्रा आता एक काम कर तुझ्या गाडीला काही फार गंभीर प्रोब्लेम दिसत नाही. मी तुझ्या गाडीच्या पुढे हळूहळू माझी गाडी चालवतो. तु माझ्या मागे ये. हा माझा मोबाईल नंबर घे. मला ही रिंग दे. मध्ये काही अडचण आली तर मला फोन करत रहा. हा, हो आणि तु काय काम करतो ?
” आय टी इंजिनियर आहे. ”
मी mute दाबून ” येस्स ….!”
“नाशकात राहतो कुठे ? ”
“महात्मा नगर”.
“मग छान मी तुला ABB चौका पर्यंत सोबत करतो, म्हंजे अगदी घरा पर्यंत”.
गडी खुश. मध्ये मी सारखं त्याला फोन करत होतो. तो म्हणायचा ” आल इज वेल”
इप्सित चौकात पोहोचलो. सहा वाजून वीस मिनिटे.
त्याला शेवटचा फोन केला.
” मित्रा आता निघू का मी ?”
म्हटला ” हो मी आता इथून जातो. बाय. ”
संध्याकाळी निवांत वेळ मिळाल्यावर बायकोला सगळं सांगितलं.
” तु थांबलास म्हणुन बरं, नाई तर त्याचं काय झालं असतं कोण जाणे. त्याचा फोन आला दिवस भरात काही ?”
म्हटलं “नाही. झोपला असेल गं काऊन जीवाला.”
“मग त्याच्या घरच्यांचा ”
“नाही”
ही घटना घडून सात महिने झाले. त्याचा कधीच फोन आला नाही. पुण्याला जाता येता त्या घटनेची आणि आणि त्या हिरोची आठवण व्हायची. आणि उगीचच जाणवायचं की याचा फोन नाही आला. एकदा ठरवलं मीच त्याला फोन करून त्याची विचारपूस करावी. म्हंजे आपल्याला शांती लाभेल. माझ्याकडे त्याचा नंबर होताच.
रिंग केली’
तिकडून आवाज ” येस…”
” हलो अमित ?”
“Yes, Amit. Who is this …………………?”
मी फोन बंद केला.