“….अप्पांनी खास तुमाला आमंत्रन द्याय सांगतलय. नक्की याच.”
सकाळी सकाळी अतुलराज चा फोन. जरा धक्काच. अप्पांच्या एकसष्ठीचा मोठा सोहळा करायचे ठरलंय. त्याचे आमंत्रण करत होता.
” अरे पण अप्पा तयार झाले कसे ? जरा आश्चर्यच वाटतंय. ”
“हा दादा, कमाल झाली खरी. गावाच्यानी या एळी पार हट्ट केला. शेवटी हुकमी एक्का गाठला. ताईसाकड गेले. ताईसा हो म्हणली. म्हणली करू. म्हणली मी मनौते अप्पास्नी.अप्पा म्हणले कुनी राजकारनी नको मंचावर तर तयार हुईल. ताईसा हो म्हणली. मग काय दिवाळीच.कारकान्याच्या मैदानवच ठुलाय पोग्राम. नक्की याव.”
ताईसा अप्पांची धाकटी मुलगी. वय असेल ३२ च्या आसपास. पण अख्ख्या गावची ताई. सोलापुरच्या मेडिकल मध्ये MBBS झाली. आणि पुण्यात बीजेला MD. लग्न ठरलं मुंबईच्या डॉक्टरशी. त्याला हिने पहिल्याच भेटीत अट घातली. मला गावाकडेच राहून लोकांची सेवा करायचीय. तिकडे येणार असाल तर लग्न करेन. अप्पाना तिने अशी अट घालणे आवडलं नव्हतं असं म्हणतात. पण मुलगा भला माणूस. मुंबई सोडली. तिच्या बरोबर गावात राहिला. दोघेही आज पंचक्रोशीतल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करत असतात. ताईसा अप्पांइतकीच सेवाभावी. कणभर सरसच. अप्पांचे अतिशय लाडकं कोकरू. अप्पांचा प्रचंड जीव तिच्यावर. अप्पा एक महान सहकारसम्राट. गावचा विकास हा एकमेव ध्यास. परिसराच्या विकासासाठी तीसेक वर्षापूर्वी आधी साखर कारखाना चालू केला. मग डेअरी, शाळा, बरच काही. राजकारण आणि राजकारणी यांच्या पासून पूर्ण अलिप्त. आता तर कारखान्याचे चेयरमनपदही सोडलंय. आत्ताचा चेयरमन भरतासारखा त्यांच्या खुर्चीवर न बसता कारखाना चालवतो. इतका मान. खरेदीच्या मिटिंग मध्ये माझे प्रेझेन्टेशन झाले. सहा सात वर्षे झाली असतील. पांढरे शुभ्र धोतर आणि कडक स्टार्च केलेली गांधी टोपी घातलेला हा इसम खाडखाड इंग्रजीत प्रश्न विचारात होता. आणि एकदम नेमके प्रश्न. उगीच शोमनशिप नाही.बेहद्द प्रेमात पडलो. तेव्हा पासून आज तागायत आमच्यात व्यावसाईक सबंधापलीकडले छान नाते निर्माण झाले. गेल्या तीनेक वर्षात गावाकडे येऊन भेटणे जमले नव्हते. आज छान योग जुळून आला. गाव इतकं छान नटल होतं की मीठ मोहरी फिरवून दृष्ट काढावी. रांगोळ्या, पताका, तोरणं. वाजंत्री. उत्सवच ! कार्यक्रम मस्तच झाला. अगदी देखणा. ताईसाच्या बोलण्याने सारा गाव हेलावला. तरुण वयात केवढी समज, केवढी प्रगल्भता! मांडवातच जेवणाच्या पंगती बसल्या. सुटातले, बुटातले सगळे मांडी घालून बसले. भात.मटकीची उसळ. गोडाला बुंदी. बेत एकदम फक्कड. अप्पानी सदरा काढला. बंडीवर बुंदीचा हारा घेऊन स्वत: आग्रहाने प्रत्येकाला वाढत होते. वाढताना प्रत्येकाला नावाने बोलत होते. ” कारे, बाईडीने सकाळी नुस्ते फोन वरच दंडवत घातलं. फुडल्या येळला पोरं अन तिला घेतल्या शिवाय याऊ नगो बर का.” मी म्हटलं ” हो अप्पा, नक्की.” सारे काही डोळ्याचे पारणे फेडणारे. हात धुतले. अप्पांचा, ताईसाचा, अतुलराजचा निरोप घेतला. जाताजाता कारखान्यावर चक्कर मारायची होती. निघालो. जितका अप्पांवर तितकाच कारखान्यावर माझा जीव. याच कारखान्याने पहिली ओर्डर दिली होती, उमेदवारीच्या दिवसात. त्यामुळे फुल्ल इमोशनल लागेबांधे. कारखान्यातल्या प्रत्येक माणसाशी सुद्धा. आज कारखान्यात कुणी फारसे दिसत नव्हतं. सगळे तिकडे उत्सवात दंग असणार ना! कुणीच भेटलं नाही. डेरीकडच्या स्टोअर्सकडे जावे की नाही असा विचारच करत होतो. एकतर तिथे ही कुणी नसेल. आणि दुसरे, चालत जायला अंतर बरच होतं. जेवण साधंच असलं तरी सॉलिड रुचकर असल्यामुळे चापून झालं होतं. त्यामुळे चढलं होतं. चालायचा कंटाळा आला होता. पण म्हटलं नको. एकतर तीनेक वर्षांनी आलोय. इथून गेल्यावर चुटपूट लागुन राहील. पुन्हा कधी यायला जमेल कोण जाणे. त्यातच अप्पांनी दम भरलाय. बाईडीला घेतल्या शिवाय येऊ नको म्हणून. त्यामुळे तिच्या बरोबर यायला कधी जमेल सांगता नाही येत. स्टोअर्सकडे जायला निघालो. इकडे नियमित यायचो तेव्हा हमखास स्टोअर्स मध्ये चक्कर व्हायची. त्यामुळे तिथले अनेक जण चांगले परिचित. आत मध्ये खरच सामसूम होतं. कुणी दिसत नव्हतं. स्टोअर्स खूप मोठ. अजस्त्रच. आत मध्ये फिरलो इकडे तिकडे. कुणी भेटतंय का शोधत. आजही तसंच राहिलंय हे. काही बदल नाही. अंधारलेलं. प्रचंड सIमान. इकडे तिकडे मशीन पार्टस. जुन्या मशिनरी. ” कोण ?” एक खोलगट, घोगरा आवाज आला मागुन. मागे चमकून बघितलं. डाव्या बाजूच्या जरा ज्यास्तच अंधारलेल्या कोपऱ्याजवळ खोलीतून आला होता आवाज. मी झपझप पावले टाकत तिकडे गेलो. इथे तरी कुणी भेटेल. आत डोकावले तर बिल्लेकर. काम करत बसले होते. बिल्लेकरच आणि माझे एकदा चांगलंच वाजलं होतं. त्याच्यामुळे माझे एक सहा लाखाचं बिल अडकून पडलं होतं. त्याला क्वालिटी कंट्रोलची सही बिलावर पाहिजे होती आणि क्वालिटी कंट्रोलचे काही तरी वेगळेच म्हणणे होते. माझा जीव कावला होता कारण माझे पैसे अडकले होते.
” नमस्कार, बिल्लेकर साहेब.”
“नमस्कार.” हो तोच खोलगट घोगरा आवाज.
“ओळखलं का.”
“आ, हो, या या.”
“अहो सगळी कारखान्यातली माणसं तिकडे सोहळ्यात आहेत आणि तुम्ही एकटे काय करताय इथे ?”
” हा हा हा हा ” बिल्लेकर नुसतेच हसले, मोठ्याने.
” झाली का आपांची भेट ”
मी हो म्हणालो.
” गेल्या आठवड्यात ते तुमचे मित्र आले होते. ”
” कोण हो ?” मी जरा त्रासून विचारले.
” ते हो, तुमच्या बरोबर पुण्याहून यायचे. पाईपा विकायचे ”
माझ्या चेहऱ्या वरचे भाव बदलले. कारण बिल्लेकरने थाप मारली होती. त्याही वेळी तो मला ढोंगी वाटायचा. त्यामुळे आवडायचा नाही. पण मी आपला अडला नारायण ..
” हा तो झामरे ना ? ”
” हा, झामरे. बरोबर.तो आला होतं, गेल्या आठवड्यात.” पुन्हा साल्याने थाप मारली.
“कसं शक्य आहे, बिल्लेकर साहेब. झामरे गेल्या वर्षी नाई का दिवाळीत अपघातात वारला ?”
“नाई ओ, असं कसं ? मला कॅलेंडर देऊन गेला ना गेल्या आठवड्यात ” पुन्हा, पुन्हा माठ्याने सणसणीत थाप लगावली. मी भिंती वरती पाहिलं इकडे तिकडे. तर बिल्लेकरच्या खोलीत चक्क 2009 चे कॅलेंडर एका कोपऱ्यात लटकत होतं. मी मनाशीच म्हटलं याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. निघावं.
“येतो, भेटू पुन्हा”
हसला. भरल्या बादलीत तांब्या बुडवताना होणाऱ्या आवाजा सारखा हसला.
निघालो. हा बिल्लेकर अगदी तस्साच आहे हं अजुनी. कार्टून. काहीच फरक नाही. भिंगांचा चष्मा.कपाळावर भंडारा. अर्ध्याबाहीचा घाणेरडा मळका शर्ट. शर्ट ला दोन खिसे. दोन्ही खिसे चीठ्ठ्यांनी ठासुन भरलेले. बिल्लेकर खिश्यात फाईलींग कॅबिनेटच घेऊन फिरतो. मी त्याला चेष्टेने म्हणायचो. ” बिल्लेकर, येत्या दिवाळीला निरमाच्यावड्या देणार आहे, भेट वस्तु म्हणून. शर्ट धुवा पांडव पंचमी पर्यंत.” असं एकदा बोलल्यावर माझ्यावर जाम भडकला होता. पण फारसा बोलला नाई. गाडी आता चीफ केमिस्ट साहेबांच्या घराकड वळवली. गावाबाहेर त्यांच्या मळ्यात ते राहतात. छान टुमदार घर आहे. केमिस्ट काकुंशी आपली खास गट्टी होती. म्हंजे आहे. त्यांचा चहा मला फार आवडायचा. सर नाई भेटले तरी काकू भेटतीलच. बापरे, गावाबाहेर बरीच वस्ती वाढलीय. हा बंगलाही इथे नवीनच दिसतोय कुणाचा तरी. सोहळा पूर्ण संपलेला दिसतोय. मंडळी घरी परतताना दिसत होती. गाडी अंगणाशी थांबली तशी अंगणात खेळणारी एक सात आठ वर्षाची पोर घरी आत पळाली. केमिस्टकाकु बाहेर आल्या, त्या पोरी बरोबर.
” अरे, तु व्हय ! ये. कदी आलास ?”
“सकाळी. खास कार्यक्रमाला म्हणून आलो होतो. म्हटलं जाताना तुम्हाला भेटून जावं.”
“व्हय ! बरं झालं की. अन एकटा का ? सुनबाई कुटाय ?”
“नाई आली. पुढल्या खेपेस नक्की घेऊन येईन. ही पोर कोण ?”
” वळकलं न्हाईस ? अरं दादाची !”
” बापरे, गिरीजा ! एव्हढी मोठी झाली ? ”
” व्हय”
” सर कुठायत ?”
” येत्यात, परसाकड गेल्यात. बस, च्या करते. ”
” हो ”
केमिस्ट काकुंचे घर अगदी टापटीप. एकदम आरास मांडल्या सारखं. आजही तसंच. खुप शिस्तीच्या. सर रात्रंदिवस कारखान्यात. काकुने संसार, शेती आणि मुलं छान सांभाळले.
” हं, कायकाय आनी ?” सर आले.
“नमस्कार. मजेत आहे. तुम्ही कसे आहात ? तब्येत ?
” अजुनी धडधाकट आहे ”
” सकाळी दिसला नाहीत, सर, कार्यक्रमात ?”
” होतो की रे, फुडच्या बाजुला बस्लो हुतो. घे, च्या घे. ”
” हो. मी थोडा उशिरा पोचलो. कार्यक्रम संपल्यावर कारखान्यात गेलो होतो. चक्कर मारायला.”
” व्हय ?”
” हो, कुणीच भेटलं नाही”
” हा, सगळे हिकडच अस्नार, कार्यक्रमाला.”
” हो. डेरी कडच्या स्टोअर्स मध्ये पण गेलो होतो.”
” तिकडं आता स्टोअर्स न्हाई. ते बदललं लांब पडाय लागलं म्हुन. तिथ आता काई नाई ”
” आं .. !!
ओके. पण ते बिल्लेकर बसले होते काही काम करत. अजुनी वेडाच आहे तो. काही तरी थापा मारत होता.”
” बिल्लेकर नसेल रे, दुसरं कुनीतर असेल. पन तिथ कुनी नसल बी. ” सर थोडे वैतागून बोलल्यासारखे वाटले.
” नाई नाई, बिल्लेकरच होता. मी ओळखतो ना त्यांना चांगला. भांडला होता तो माझ्याशी. ”
” अरे, बिल्लेकर दोनवर्षापूर्वी कारखान्यातच हार्ट फेल हून मेला. त्यो कसा ………….”

( खल्लास )