त्या “यो” !

काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला होणारा फायदा याचा विचार करून, ती यादी मला आधी कळवुन  वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होता. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर संबधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचलो. औपचारिकता आणि चहापान झाल्यावर मी आणि माझ्या सहका-यांनी धावत पळत जाऊन ट्रेनिंग रूम गाठली. ट्रेनिंग रूम झकपक आणि प्रचंड अद्ययावत होती. दिपुन टाकणारी!  माफक आणि निमंत्रीत लोकांनाच बसायला जागा. भराभर मी bag टेबलवर टाकुन आधी laptop काढला. भल्याभल्या ठिकाणी बहुतेक वेळेला प्रोजेक्टर, laptop आणि ऑडियो यांचा ताळमेळ न जुळल्यामुळे सुरुवातीचा वेळ ते सगळं जुळवून आणण्यात जातो आणि नंतरच्या धम्माल गतीला सुरुवातीलाच ब्रेक मिळतो. माझे सहकारी ट्रेनिंगरूम अधिका-याबरोबर वायरींची खोचाखोची करत असताना एक सुमारे पंचवीस सव्वीस वर्षाची जीन्स टी शर्ट घातलेली एकदम ” यो ” दिसणारी पोरगी हातात एक वही घेऊन धावत धावत धडकन रूम मध्ये घुसली. आल्याआल्या तिथे हजर असणा-या सगळ्यांना खाडकन प्रश्न केला –

 

Is the Program gonna start sharp at 2.30 ?

मी उत्तर दिलं. “Yes, it is,  Sharp at 2.30 !”

ट्रेनिंग अधिकारी पुढे जोडलं “Be on time”

विनवणीच्या स्वरात ती म्हणाली “ Sir, I am a mechanical engineer & I want to attend this training in any case !”

माझाशी तिचा संवाद मग सुरु झाला, मी विचारलं  “You work with which department?”

“Application Engineering, Sir”  

“Ok, if you are invited by your seniors & if your name appears in the list, you will attend.”

That’s what sir, I could not get an email to inform  about the training nor my name appears in the list displayed in the canteen.”

“Without  wasting time rush to your Department Head & convince him, if you can. I am not the person who can decide who should attend !” मी तिची बोळवण केली.

ती झपकन नाहीशी झाली. माझे सहकारी आणि तो ट्रेनिंग अधिकारी जुगाड करण्यात गुंतले होते. थोडेसे मला तिचे कौतुक वाटले. पुढे ते कौतुक वाटणे माझ्यातल्या विवेकी विचार गटांना मिळुन काही Positive चांगले तर्क काढायच्या आत माझ्या मनातील दुस-या म्हंजे अविवेकी विचार गटाने काही तयार  तर्क धडाधड पुढे करून तिची जीन्स, तिचा टी शर्ट, तिचे ते “यो” दिसणे असल्याच बाबींची टिंगल – मनातल्यामनात – केली. म्हणजे ” इतके दिवस झोपली होती का ” ” इथे काय Fashion Show  आहे का ” वगैरे ! पण मला फारसा वेळ नव्हता. तेव्हा तिचा विचार ४०-५० सेकंदानी लॉग आउट करून मी माझ्या कामाला लागलो. पहिल्या सात मिनिटात माझी ओळख आणि काही औपचारिक बाबी संपायच्या सुमारास ती “यो” धावत पळत आली. पंचविसात आठ मुली आधीच होत्या, एकत्रच बसल्या होत्या, त्यात हिने नववी बनून कसबसं स्वत:ला माववुन घेतलं. तिचं आत मध्ये येणं यापलीकडे मी फारसा विचलित झालो नाही. अगदी नकळत ‘प्रवेश मिळवला बुवा पाठ्ठीनं’ एवढंच जाणवलं. माझे बोलणे सुरु झाले, पहिल्या दीड दोन मिनिटात आभार वगैरे संपवुन विषय सुरु केला, दोनच तासांचा अवधी होता, मुद्दे बरेच होते. बेभान होऊन एकएक स्लाईड पुढे सरकवत होतो. प्रत्येक स्लाईडवर बोलत होतो. सुरुवातीच्या काही स्लाईडस संपल्यावर बोलण्याच्या ओघात जशी वातावरणातील भीड मी जाणीवपूर्वक चेपवली तसे एकएक जण माझ्याशी बोलु लागला.  सटासट प्रश्न येवु लागले होते. मला खूप धमाल येत होती. कधीतरी भानावर येवून घड्याळ बघितलं तर सुरु केल्याला पाउणे  तीन तास उलटून गेले होते. पुढल्या पंधरा    मिनिटात मी संपवले. प्रोग्राम संपल्यावरची आवरा आवर आणि भेटीगाठी वगैरेची जबाबदारी माझ्या सहका-यांवर सोपवुन मी सटकलो. भाषण संपवल्यावर किंवा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम संपवल्यावर बोलताना चढलेली ती झिंग मला जास्ती ज्यास्त अंगावर ल्यालेली आवडते. त्या बेभान अवस्थेत मला खुप वेळ राहायला आवडतं. विषयाशी संपूर्ण तादात्म्य पावल्यावर ऐकणा-यांनी त्यांची तंद्री  जर   माझ्या बोलण्याशी संपुर्ण मिळविल्याचे दिसले तर लहानपणी  निपाणीतल्या  समाधी मठात व्हायचे तसं होतं.   समाधी मठातल्या गाभा-यातला तो  ढामढीम  करणारा प्रचंड नगारा,  लहान मोठ्या त्या कित्येक घंटा आणि त्यातुनही  ऐकू येणारे आरतीचे कानडी स्वर  हे सगळे एकत्रित ऐकताना मी बेभान व्हायचो, दिवसेंदिवस रात्रोरात्र त्या आवाजांचे धोधो कोसळणे थांबू नये असे वाटायचे, खर तर त्यातल्या प्रत्येक स्वराचा उगम स्वतंत्र पणे ऐकला असता ना तर तो ओरबडणारा, चावरा असायचा. शास्त्रीय संगीताच्या अंगाने तपासाला तर प्रत्येक स्वर म्हणजे नाग-याचा, आरतीचा, घंटांचा , टाळ्यांचा  अगदी वेगवेगळ्या पट्ट्यांमधला असायचा. बेसूर वाटावा तसा. पण का कोण जाणे त्या सर्वांच्या एकत्रित आदळणा-या स्वरांनी माझी समाधीच लागायची. सॉलिड झिंग चढायची.  अगदी तशीच झिंग  असं एखादे  भाषण  दिल्यावर  येते. ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तर कहर होतो कारण सहभागी मर्यादित असतात. वीस. पंचवीस. फार तर फार तीस. चाळीस किंवा पन्नास किवा साठ डोळे आणि तितकेच कान अगदी जवळून  आपल्यावर सुरुवातीला त्यांच्या बंदुका रोखून उभ्या असतात. बंदुका अपेक्षांच्या, तिरस्काराच्या, उतावळेपणाच्या, कंटाळलेल्या वगैरे. आपला आवाज, देहबोली, माहिती, ज्ञान यांच्या माध्यमातुन त्या सगळ्या बंदुका  विरघळवून टाकण्यात आणि शेवटी समोरच्या सगळ्यांना भजनी लावण्यात भलती झिंग असते.  ती झिंग अंगावर चढते. आणि अशावेळी त्या समाधी अवस्थेत काही तरी दृष्टांत होतो. त्याच विषयातला किंवा काहीतरी  एकदम वेगळाच शोध  लागतो. किंवा लक्खकन एकदम  वीज चमकावी  तसे काही तरी सुचते, म्हणजे काहीही सुचते. अशा धोधो अवस्थेत मी लिफ्ट मध्ये उभा राहिलो. अगदी सुदैवाने एकटाच होतो. लिफ्ट चे  “G” दाबलं.  लीफ्ट खाली सरकायला लागली. आणि अचानक एक चेहरा डोळ्यासमोर चमकुन गेला.   मी मला थोडं, अगदी थोडंच भानावर आणुन समोर बघितलं. लिफ्ट तर पूर्ण बंदिस्त होती. काचेचे दरवाजे वा अन्य काही ज्यातून त्या त्या मजल्यावरचे दिसेलसे काही नव्हते.  कुणाचा तरी चेहरा मी बघीतला. डोक्यावरून पदर  असणारा. कोणाचा….? जाऊदे ना, मघाशी अचानक उपटला तसा एखादा अविवेकी  विचार  पुन्हा उसळी मारून वर आला असेल. या अविवेकी विचार गटांचा फार त्रास असतो बुवा. एकतर त्यांना काही चांगलंचुंगलं चालत नाही. विवेकीविचारगटांवरती यांची सतत दादागिरी चालते. आणि चांगल्या दृष्टीकोनाची प्रचंड नासधूस ते करतात. मला या अविवेकी विचारगटांचा फार त्रास होतो. आणि आगदी च्यायला नको त्यावेळी मनात उपटतात. झुरळ मारण्याचे कसं ते HIT वगैरे असते. तसं काही फुसफुस औषध पाहिजे. किंवा तशी एखादी मच्छरदाणी. जाऊदे. रेटा बाजुला जोर लावुन. झिंग उतरायला लागलीय.  तो चेहरा कुणाचा बरं ?   आणि असा अचानक समोर का आला असावा! वरती ट्रेनिंगरूम मध्ये त्या सगळ्या ललना अगदी  ” यो” होत्या. म्हंजे जीन्स, टी शर्ट वगैरे.  त्यात ही डोक्यावर पदर काय भानगड आहे  काही क्लु मिळेना त्यामुळे पुन्हा एकदा मी आपली डुबकी मारली. कैफ उतरल्यावर राहिला मात्र तो डोकीवरचा पदर. त्यात एक भर पडली होती ती कपाळावरल्या  लालबुंद मळवटाची! त्या तीन तासांची उजळणी करताना मध्येच कुठेतरी तो डोईवरचा पदर आणि आता तो लालबुंद मळवट डोळ्यांसमोर चमकुन जायचे !!!!!! शोध घ्यायचा ध्यास मनाने घेतला. खोलीतले दिवे तर कधीच बंद झालेत हे मला जरा उशिरा लक्षात आलं. एका विशिष्ट वेळी तो मळवट. हो त्या नऊ “यो” सपासप प्रश्नं विचारात होत्या आणि त्यामुळे धमाल येत होती. पण इथे तो पदर आणि मळवटचे काय ? त्या नऊ जणींचा सहभाग उठून दिसावा असावा असा होता. ज्यास्तीत ज्यास्त होता. त्यांनीच खरेतर त्या ट्रेनिंगला कमलीचा जिवंत पण आणला. च्यायला, पोरी तेही मेकॅनिकल इंजिनियर ! केवढ्या शार्प !!! जणु बाकीचे सतराजण तिथे नव्हतेच. त्या पोरीं विषयीच्या   भावना आता अभिमाना कडे झुकायला लागल्या. पंधरा मिनिटे होती त्यावेळी भानावर येऊन, खरेतर भानावर आदळून घड्याळाकडे बघितले ना, त्यावेळी एक जोरदार करंट लागुन जाग आली होती. तो करंट अभिमान, कौतुकाचे मिश्रणाने आला होता. पण त्या मिश्रणात आणखी एक धातु होता. उपकृत असल्याचा. ऋणात असल्याचा. त्या तिस-या धातुच्या शोधाच्या वेळीच तो मळवट दिसला. डोई वरती पदर दिसला. एक माउली दिसली. आणि नऊ मुली दिसल्या. माउली त्यांचा पाठ घेत होती. चिमुकल्या मन लावुन शिकत होत्या. आजचा पाठ संपला. नऊच जणींची आजची शाळा संपली. थोड्या पोरीना घ्यायला त्यांचे बाप आले होते. माउलीने त्यातल्या दोघीतिघींना घट्ट पोटाशी धरलं. बाहेर पागोटेवाला उभा होता. त्याने दोघी तिघी चिमुकल्यांना पोचवतो असे सांगितलं आणि पागोटे वाला निघुन गेला. माउली निघाली, लेकरांना घेऊन. थोडी पुढे गेली तो काय, पाठीवर नासके अंडे पडले तिच्या. तेवढ्यात पुढून धोंडा आला डायरेक्ट कपाळावर. सोबत अश्लील शिव्यांची लाखोली. माउली खंबीर पणे पुढे चालली होती. प्रचंड निर्धाराने, माझ्या लेकींना मी शिकवणार. तुम्ही मला दगड मारा. शिव्या द्या. मी सगळं सहन करीन. पण पुण्यातल्याच नाही, तर देशभरच्या माझ्या लेकी शिकल्या पाहिजेत. शिकणं ही काही तुम्हा पुरुषांची मक्तेदारी नाही. तुम्ही ही शिका. पण आम्हालाही ईतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, चाखु द्या. माझ्या समोरच्या या सगळ्या “यो” त्याच  माउलीच्याच  लेकी. बापरे  विषयाची केवढी भक्ती, ……I want to attend this training in any case ”  केवढा हा ध्यास! सावित्रीबाई एकशे त्रेसष्ठ वर्षे झाली तुम्ही तुमच्या नऊ लेकींच्या हाती पाटी पेन्सिल देवून. आणि आज त्याची फळे बघा !!  आज या नऊ “यो” क्लिष्ट तंत्रज्ञानाचा अभ्यास करू शकताहेत कारण बाई तुम्ही अंगावर चक्क दगड झेलले, नासक्या अंड्यांचा मार खाल्ला आणि पुण्यात नऊ पोरीना गमभनचे धडे दिले ! तुमच्या ऋणातून हा समाज कसा बरं उतराई होणार ? धन्य  तुम्ही, आणि धन्य तुमच्या लेकी सुद्धा. तुमच्या योगदाना शिवाय भारत एका अतिशय समर्थ मनुष्य बळाला मुकला असता!

Leave a comment

Filed under Uncategorized

Leave a comment