सत्याग्रही……

                ‘सत्याग्रही’ मोर्चांचा वणवा पसरलाय देशभर. जल्लोष आहे. चीड आहे. उन्मादही आहे. सरकारी खजिन्यातल्या करोडो रुपये लंपास करणा-या बदमाषांच्या  बातम्या कानावरून वा डोळ्यासमोरून जाताना प्रत्येक वेळी जो संताप झाला होता आणि जो असहाय्यपणे, हतबल होऊन दाबून ठेवला होता त्याला अहिंसक मार्गाने मोकळे करण्यासाठी समस्त भारतीयांना एक नेतृत्व मिळालंय. त्यामुळे प्रत्येकाच्या कुकरची शिट्टी आपापल्या परीने होते आहे.
कालच एक मोर्चा निघाला होता. विशिष्ट व्यावसायिकांचा. मोर्चा संपला. प्रत्येकजण सुरुवात केली तिथे गेला. त्यांच्या गाड्या लावल्या होत्या, त्या घ्यायला. सगळे तिथे पोहोचल्यावर बुचकळ्यात. सगळ्यांच्याच गाड्या गायब. हुई उठली. तपास चालु झाला. कुणीतरी पोलिसांकडे वर्दी दिली. गाड्या मिळाल्या. सगळ्या गाड्या पोलिसांनी रस्त्यावरून उचलल्या होत्या. त्यांच्या कडे जमा होत्या. गाड्या अवैध पद्धतीने लावल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी उचलल्या. त्यात गैर काहीच नव्हतं. सत्याग्रहीना वाद घालायला चान्सच नव्हता. मुकाट्याने गाड्या सोडवून आणाव्या लागल्या. सत्याग्रहिनी गाड्या सोडवल्या दोनशे रुपये दंड भरून नव्हे – चिरीमिरी देऊन. जय हो !!!!! 
जनलोकपाल बिल कदाचित येईल. कायदा होईल. कारण अण्णांचा निग्रह आणि त्या निग्रहाला  असणारे नैतिक अधिष्ठान वादातीत आहे. दिपून टाकणारे आहे. आम जनतेच्या मानसिकतेच काय? आम्हाला ‘सत्याग्रहाचा’ अर्थ कळतो का? आपल्यावरही एक कठोर जबाबदारी येते हे कळलंय का? किती सत्याग्रही आईबाबांनी आपल्या अकरावीतल्या परवाना नसलेल्या सुपुत्रांकडून तो शिकवणीला जाण्यासाठी अवैधपणे वापरत असणारी फटफटी काढून घेतली?  ज्यांचा देशभर बोलबाला होतोय त्या किती युवकांकडे सत्याग्रहाचा फटफटी मोर्चा काढताना वाहनधारक परवाना होता? भ्रष्टाचाराचा अर्थ फक्त पैसे देवाण घेवाण असा लावला जाणार असेल तर कायदा किती परिणामकारक होईल? अन्य कायदे दिसतात का समाजात उतरलेले? म्हंजे ते हरामखोर डॉक्टर! पाडतात ना खून पोरींचे खुलेआम , पैशासाठी ! ती नालायक आई किंवा षंढ बाबा,  त्यांना माहिती नाई का की पोटाच्या अंकुराला  खरवडणं  अमानवी आहे, हिंस्र पणाचा कळस आहे आणि कायद्याने ही गुन्हा आहे. लाल लागला की किती सत्याग्रही इमाने इतबारे थांबतात ? पिवळा पडला की किती जण हल्ली स्वत:ला रोखतात? असे अनेक प्रसंग. अहो ही भ्रष्ट मानसिकता काय नव्याने ओळख करून द्यावी इतकी अनोळखी आहे का आपल्याला?   जागोजागी दिसते, आपल्यातही असते. कायद्याने कदाचित राजकारण्यांचे, वेगवेगळ्या सत्ताधीशांचे पैसे खाणे थांबेल पण आपल्या भ्रष्ट मानसिकतेला आपण स्वच्छ करणार का?  म्हंजे अण्णांच्या योगदानाचे मोल कमी करण्याचे पाप नाही हं मला करायचे. त्या ऋणात तर हा समाज अखंड राहील. ते बिल, त्या साठी झगडणा-या लोकांचे योगदान ही थोर आहेच. दुसऱ्या बाजुला, सत्याग्रह करून क्रांती करता येईल पण आपल्या मनाचे परिवर्तन करण्याची लढाई आपण आपल्याशी कठोरपणे लढलो नाही तर प्रत्येकाची धुलाई करायला एवढे अण्णा आणणार कोठून ?  

Leave a comment

Filed under Uncategorized

Leave a comment